आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१५ ऑगस्ट १९४७.
सुमारे १३० वर्षांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्ती मिळाली ती तारीख. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य लोकांचे योगदान आहे. परंतु हे स्वातंत्र्य मिळताना भारताचे दोन तुकडे करावे लागले ज्याच्या झळा आजही अनेक कुटुंब भोगतायत. फाळणीने झालेली हानी कधीही न भरून निघणारी आहे.
मोहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची एक मोठी चळवळ उभी राहिली होती. याचेच रुपांतर पुढे पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये झाले. सर्वसाधारण समज असा आहे की जिन्नांमुळेच आज स्वतंत्र पाकिस्तान निर्माण होऊ शकला. पण अजून एक व्यक्ती होती जिचा पाकिस्तानच्या निर्मितीत मोठा हात होता. ज्या मुस्लीम लीगचं नेतृत्व मोहम्मद अली जिन्ना करत होते, त्या मुस्लीम लीगने सुरुवातीला धर्माच्या आधारावर वेगळे मतदारसंघ आणि नंतर स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली होती.
याच लढाईतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुलतान मोहोम्मद शाह आगा खान तिसरा. भारतात जरी यांच्याबद्दल फार माहिती नसली तरी पाकिस्तानात मात्र त्यांचं नाव काही प्रभावशाली व्यक्तींमध्ये घेतलं जातं.
लीग ऑफ नेशन्सचे चेअरमन राहिलेल्या आगा खानचा जन्म २ नोव्हेंबर १८७७ रोजी कराची येथे झाला. निझारी इस्माईल पंथाचे ते ४८वे इमाम होते. त्यांनी मुसलमानांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आपलं आयुष्य वाहिलं होतं. मुस्लीम लीगच्या संस्थापकांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे आगा खान!
सर सय्यद अहमद खान यांच्याप्रमाणेच आगा खान यांनाही मुसलमानांनी आधी शिक्षण घेऊन मग राजकारण करावं असं वाटायचं. यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले. आगा खान १९३७ साली भरलेल्या लीग ऑफ नेशन्सच्या (ज्याचे पुढे संयुक्त राष्ट्र संघात रुपांतर झाले) चेअरमन पदी विराजमान झाले होते. या पदावर पोहोचणारे ते पहिले मुस्लीम ठरले. तुर्की, इराक, अफगाणिस्तान आणि इजिप्तसारख्या मुस्लिमबहुल देशांना लीग ऑफ नेशन्सचं सदस्य बनवण्यामागे त्यांचेच प्रयत्न होते असं म्हणतात.
मुस्लीम लीगची स्थापना
मुस्लीम लीगच्या स्थापनेतही त्यांचं मोठं योगदान होतं. १९०६च्या उन्हाळ्यात व्हाइसरॉय जेव्हा सिमल्यात आले त्यावेळी मुस्लिमांसाठी एक राजकीय संघटनेची आवश्यकता त्यांनी व्हाइसरॉयला बोलून दाखवली. ब्रिटीश सरकारच्या बरोबरीने ही संघटना भारतातील मुस्लिमांच्या हितार्थ काम करेल असा त्यांचा मानस होता.
हा प्रस्ताव मांडण्यासाठी ते एक शिष्टमंडळ घेऊन गेले होते, ज्यात मोहसीन-उल-मुल्क आणि नवाब वकार-उल-मुल्क यांसारखे सन्मानित मुस्लीम नेते सहभागी झाले होते.
या बैठकीनंतरच मुस्लीम लीगची स्थापना झाली आणि एका अर्थाने पाकिस्तानची पायाभरणीसुद्धा!
आज आगा खानच्या नावानं एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली ज्याच्या माध्यमातून जगभरातील वेगेवेगळ्या भागांत शिक्षण आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणार्थ काम चालतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.