आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
दिवसभर टिव्हीवर सुरु असलेल्या घरगुती मुद्द्यांवर आधारित असणाऱ्या मालिकांना इंग्रजीत ‘सोप ऑपेरा’ असे का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे नाव रशियन ऑपेराशी संबंधित असू शकते असा अंदाज येईल, पण हे कितपत खरे आहे याचाच आढावा आपण आज घेणार आहोत.
या ‘सोप ऑपेरा’ची सुरुवात झाली ती १९३० च्या दशकात. रेडिओ चॅनेल चालवणाऱ्या काही व्यक्ती जाहिरातींमधून मिळणारा पैसा कसा वाढवता येईल यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत होते. त्यात त्यांनी घरगुती वस्तू विकणाऱ्या उद्योगांना जाहिरातदार म्हणून लक्ष्य केले. या उद्योजकांना जाहिरात द्या म्हणून मनवणे त्यांच्यासाठी सोपे होते, कारण बहुतेक लोक हे दुपारभर रेडिओ ऐकत असत. त्यात बहुतेक श्रोते स्त्रिया असल्याने ही उत्पादने थेट त्यांच्यापर्यंत जाहिरातीमार्फत पोहोचू शकतील असे ते या उद्योजकांना सांगत.
यात अग्रेसर होते ते प्रॉक्टर आणि गँबल हे दोन रेडिओ स्टुडिओ. रोज रेडीओवर लागणाऱ्या मालिकांमध्ये त्यांनी एका मोठ्या ऑक्झिडॉल साबणाच्या पावडरची जाहिरात केली. ज्याचे प्रतिसाद बघून बाकीच्या रेडिओनेही आपल्याकडच्या कार्यक्रमांत या जाहिराती सुरु केल्या.
कालांतराने रेडिओचे कार्यक्रमच या जाहिरातींसाठी ओळखले जाऊ लागले आणि साबणाच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात लागत असल्याने या कार्यक्रमांना नाव पडले-सोप ऑपेरा.
पहिली सोप ऑपेरा बनवण्याचे श्रेय दिले जाते ते अर्ना फिलीप्स या नायिकेला. “पेंटेड ड्रीम्स” नावाची मालिका तिने १९३० साली सीजीएन या शिकागोमधील रेडिओ स्टेशनसाठी बनवली होती. एक विधवा आणि तिच्या अविवाहित मुलीबद्दल असलेली ही एक १५ मिनीटांची मालिका होती. फिलिप्सनेच टिव्हीवरची पहिली सोप ऑपेराही बनवली होती. १९४९ साली तिने “दिज आर माय चिल्ड्रन” नावाची सोप ऑपेरा बनवली होती. फिलिप्सनेच पुढे जाऊन प्रसिद्ध अशा “गायडीँग लाईटस”, “द वर्ल्ड टर्न्स” आणि “अनादर वर्ल्ड” या दैनंदिन मालिका बनवल्या.
सोप ऑपेरा हे नाव पहिल्यांदा वापरले गेले ते १९३९ साली. ‘लॉस एंजेलीस टाइम्स’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वर्तमानपत्रांत पहिल्यांदा या मालिकांचा उल्लेख ‘सोप ऑपेरा’ म्हणून केला गेला. साबण कंपन्यांनी या मालिकांमधे आपल्या जाहिराती दाखवणे सुरुच ठेवले.
बोल्ड अँड ब्यूटीफुल, डेज ऑफ अवर लाईव्ज, जनरल हॉस्पिटल, यंग अँड रेस्टलेस या जागतिक वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या काही सोप ऑपेरा आजही तग धरून आहेत.
भारतातही बऱ्याच सोप ऑपेरा आता बघायला मिळतात. भारतीय सोप ऑपेरा मुख्यत: घरगुती आयुष्य आणि त्यातील नात्यांत असणारी गुंतागुंत दाखवण्याचा प्रयत्न करतात. प्रेम, धोका, काही रंजक गुपिते आणि घरातली घरातच एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोड्या हे भारतीय सोप ऑपेराजच्या मुख्य कथानकाचे भाग असतात.
दैनंदिन सुरु असलेल्या मालिका आजही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या उत्पादन कंपन्यांसाठी जाहीरातीचे मुख्य साधन आहेत. भारतातल्या गृहिणी तर या मालिका न चुकता बघतात, आपल्या घरातही. त्यात असणारी रंजक कथानकं महिलांच्या मनावर अगदी घट्ट असा ताबा मिळवण्यात यशस्वी होत आहेत.
कमाल आहे ना! एखाद्या जाहिरातीवरून एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीला नाव मिळालं! आता जेव्हा संध्याकाळी घरच्या बायकांसोबत “सोप ऑपेरा” बघाल तेव्हा त्यांना हा इतिहास नक्की सांगा, तेवढाच त्या ‘सोप ऑपेरा’ बघण्याचा वेळ जाईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.