लिथियम बॅटरीचा शोध लावून या शास्त्रज्ञाने ९७व्या नोबेल पटकवलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. कारण, आजपर्यंत तरी या पुरस्काराने आपली प्रतिष्ठा आणि गौरव सांभाळला आहे. आपापल्या क्षेत्रात नुसतीच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नव्हे तर त्यांच्या या कामाचा सामान्य माणसाच्या जगण्यावर सकारात्मक परिणाम होईल अशाच शोधासाठी आणि कामासाठी हा पुरस्कार दिला जातो.

गेल्याच वर्षी म्हणजे २०१९ मध्ये जॉन गुडइनफ यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने नोबेल पारितोषिक मिळवणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.

२०१९ सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आला. रसायनशास्त्रातील नोबेल मिळवणाऱ्या दुसऱ्या दोन शास्त्रज्ञांमध्ये अमेरिकेचे एम स्टेनली विटिंगम आणि जपानचे अकिरा योशिना यांच्या नावाचाही समावेश आहे. या तिघांना लिथियम बॅटरीचा शोध लावण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

जॉन गुडइनफ यांच्या आधी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्यांत सर्वात जास्त वयस्क व्यक्ती म्हणून ऑर्थर अस्कीन यांचे नाव घेतले जायचे. अस्कीन यांना वयाच्या ९६ व्या वर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ऑर्थर अस्कीन यांना २०१८ मध्ये भोतिकशास्त्रातील नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा हा विक्रम जॉन गुडइनफ यांनी मोडीत काढला.

जोन गुडइनफ वयाच्या ९७व्या वर्षीही संशोधन कार्यात मग्न असतात. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी जर्मनी येथे झाला होता. त्यांचे वडील येल विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते. जॉन गुडइनफ यांचे शिक्षणही याच विद्यापीठातून पूर्ण झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी लष्करात वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम पहिले. नंतर शिकागो विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पीएचडी मिळवली.

भौतिकशास्त्रात पीएचडी केल्यानंतर त्यांनी रसायनशास्त्रातही संशोधन सुरु केले. ऑक्सफर्ड विद्यापीठात काही काळ त्यांनी इनऑर्ग्यानिक केमिस्ट्री लॅबोरेटरीचे प्रमुख पदही सांभाळले. १९८६ पासून ते टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

जॉन गुडइनफ यांनी या वयातही संशोधनाच्या कार्यात कधी खंड पडू दिला नाही.

टेक्सास विद्यापीठात ते मेकॅनिकल इंजिनियरिंग आणि मटेरियल सायन्सचे प्राध्यापक आहेत.

जेंव्हा त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेंव्हा आपल्या भवना व्यक्त करताना ते म्हणाले, “टेक्सास विद्यापीठाच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यांची एक चांगली गोष्ट म्हणजे या विद्यापीठात कुणालाही निवृत्त केले जात नाही. त्यामुळे मला संशोधनासाठी आणखी ३३ वर्षे मिळाली. या दरम्यान मला कामचा चांगला अनुभव आला.”

हल्ली सर्वत्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला आहे. या वस्तूंना चालवण्यासाठी बॅटरीची किती गरज असते याचा अंदाज आपण आपल्या मोबाईलवरूनच लावू शकतो. अधिक सक्षम आणि अधिक काळ चालणारी बॅटरी ही आजची नितांत गरज बनली आहे. म्हणून जॉन गुडइनफ यांच्या लिथियम बॅटरीचा शोध हे आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील एक खूपच महत्वपूर्ण योगदान आहे.

या आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व यामुळे कमी झाले. जॉन गुडइनफ यांनी अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे, ज्यामुळे ही बॅटरी हाय व्होल्टेजवरही चालेल. या बॅटरीत उर्जा साठवण्याची क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांचा हा शोध खूपच महत्वाचा आणि क्रांतिकारी असल्याचे मानले जाते.

जास्त काळ मोबाईल चार्जिंग केला किंवा मोबाईल जास्त काळ स्वीच ऑफ ठेवला तरी बॅटरीला प्रॉब्लेम हा येतोच. ही समस्या फक्त मोबाईल बॅटरी पुरतीच मर्यादित आहे असे नाही. तर ज्या कुठल्या साधनात बॅटरीचा वापर केलेला असतो त्या सगळ्याच साधनांत ही समस्या थोड्याजास्त प्रमाणात उद्भवतेच.

जॉन गुडइनफ यांच्या या शोधाने या समस्येवर कायमचा तोडगा काढला आहे. म्हणूनच त्यांचा हा शोध एक क्रांतिकारी शोध असल्याचे मानले जाते.

त्यांनी हा शोध ९०च्या दशकातच लावला होता. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि छोट्या आकाराच्या बॅटरीज निर्माण करणे शक्य झाले.

या बॅटरीज जास्त काळ चालतात. फक्त मोबाईल फोन, लॅपटॉप, पेसमेकरच नाही तर या बॅटरीजचा वापर करून इलेक्ट्रॉनिक वाहनांचीही निर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे पेट्रोल डीझेलसारख्या पारंपारिक इंधनाचा वापर कमी होईल. पर्यायाने वायू प्रदूषणाची समस्या थोड्याफार प्रमाणात आवाक्यात येईल.

लिथियम बटरीमध्ये उर्जा साठवण्याची क्षमता जास्त असल्याने या बॅटरीज खूप काळ चालू शकतात. इतर प्रकारच्या बॅटरीज पुन्हा चार्ज करण्यासाठी त्यांना आधी पूर्ण रिकामे करावे लागते. पण, लिथियम बॅटरीला पूर्ण रिकामे करावे लागत नाही, थोड्या थोड्या अंतराने जरी बॅटरी चार्ज केली तरी चालते.

समजा तुमची बॅटरी आता ६०% चार्ज आहे, तरी तिला तुम्ही पुन्हा चार्ज करू शकता. अगदी सेंकदा सेकंदालाही चार्ज करत राहिल्यास या बॅटरीला नुकसान पोहोचत नाही. परंतु हाय व्होल्टेजचा या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.

प्रत्येक गोष्टीचे काही फायदे तसे तोटेही असतातच. त्याला ही लिथियम बॅटरीही अपवाद नाही. इतक्या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरी, या बॅटरीची एक कमतरता अशी आहे की, या बॅटरीला वापरा किंवा न वापरा पण, कंपनीतून तयार होऊन बाहेर पडल्यानंतर यांचे आयुर्मान फक्त दोन ते तीन वर्षाचेच असते.

या बॅटरीज लवकर खराब होतात. या बॅटरीला पूर्णतः डिस्चार्ज केल्यावरही ही बॅटरी खराब होते.

या प्रकारच्या बॅटरीचा वापर मोबाईलपासून पेसमेकरपर्यंत केला जातो. यातूनच या बॅटरीचे महत्व अधोरेखित होते.

जॉन गुडइनफ यांना त्याच्या संशोधनासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या वयातही त्यांचा कामाचा उत्साह कमी झालेला नाही. या वयातही ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिकवतात. नियमित वर्ग घेतात.

नोबेलच्या आधीही त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नॅशनल मेडल ऑफ सायन्स, कोप्ले मेडल, फर्मी ऍवॉर्ड, द ड्रॅपर प्राइज आणि जपान प्राईज असे अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!