या मुस्लिम राष्ट्रात दोन हजार वर्ष जुन्या मंदिराचे अवशेष सापडलेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इजिप्त म्हटले की सर्वप्रथम आठवतात ते इथले पिरॅमिड. इजिप्त देशाच्या संस्कृतीबद्दल जगभरातील इतिहासकारांना कुतूहल आहे. पिरॅमिड, पपायरसवरील हस्तलिखिते, रोसेटा स्टोनवरील प्राचीन शिलालेख अशा अनेक ऐतिहासिक पुराव्यांमुळे या देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय इतिहासाबद्दल वेळोवेळी बराच उलगडा झाला असला तरी, या देशाच्या इतिहासात जसे खोलवर जाऊ तसे अधिकाधिक गूढ माहिती हाती लागत आली आहे. ज्यामुळे या देशाबद्दलचे कुतूहल वाढतच आहे.

इजिप्त हा आज मुस्लीम देश असला तरी एकेकाळी इथे ग्रीक संस्कृती नांदत असल्याचे पुरावे सापडतात. ऐतिहासिक समृद्धीचा खजिनाच या देशात लपलेला आहे. भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यातील सिंधू संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. तसेच आफ्रिका खंडातील नाईल नदीच्या खोऱ्यातील इजिप्शियन संस्कृतीही अतिप्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते.

इजिप्तच्या समुद्रात हेराक्लीयान नावाच्या एका पुरातन शहराचे अवशेष सापडले आहेत. या पुरातन शहरात जवळपास २,२०० वर्षापूर्वीच्या एका ग्रीक मंदिराचा शोध लागला आहे.

या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. इजिप्तमधील हेराक्लीयान हे शहर हजारो वर्षांपूर्वी त्सुनामीमुळे समुद्रात बुडाले होते. त्याकाळात हे शहर मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. यशिवाय त्याकाळात हे शहर इजिप्तच्या राजधानीचे शहर म्हणूनही विकसित करण्यात आले होते.

इजिप्त आणि युरोपच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी या मंदिराचा शोध लावला आहे. या शास्त्रज्ञांच्या मते हे मंदिर इजिप्तच्या उत्तरेला असलेल्या अटलांटिस भागात सापडले आहे. मंदिरात तांब्याची नाणी आणि दागिने देखील सापडले आहेत. हे मंदिर तिसऱ्या आणि चौथ्या शतकात बांधले गेले असावे असा तज्ञांचा अंदाज आहे.

यासोबतच इथे काही युद्धनौकाही सापडल्या आहेत. या युद्धनौकांवर सापडलेली तांब्याची नाणी राजा क्लाडीयस टॉलमी दुसरा याच्या कार्यकाळातील आहेत. या युद्धनौकांवर हत्यारे, क्रॉकरी, नाणी आणि दागिन्यांनी भरलेली भांडी सापडली आहेत. या सगळ्या वस्तू चौथ्या शतकातील आहेत.

राजा क्लाडीयस टॉलमी दुसरा याच्या कार्यकाळात या शहराचा चांगलाच उत्कर्ष झाला होता. त्याकाळी या शहराला इजिप्तची व्यापारी राजधानीही मानले जायचे. आज हे शहर अबू-किर खाडी म्हणून ओळखले जाते.

राजा क्लाडीयस टॉलमी हा एक सुशासन असलेला राजा तर होताच शिवाय तो एक तज्ञ ज्योतिषी देखील होता. चंद्राला पृथ्वी भोवती फिरण्यास जो कालावधी लागतो तो त्यांनीच निश्चित केला होता. याच कालावधीच्या आधाराने त्यांनी इजिप्शियन संस्कृतीचे चांद्रमासावर आधारित कॅलेंडर बनवले होते.

खगोल विज्ञानाचा त्याचा अभ्यास फारच सखोल होता. त्याने प्रकाशाविषयीही काही सिद्धांत मांडले. भूगोल आणि विज्ञानाच्या क्षेत्रातही त्याने मौलिक भर घातली.

आपल्या कार्यकाळात त्याने इजिप्तचा खूपच विकास केला होता. त्याने आपल्या राज्यात अनेक मंदिरे बांधली होती. त्याच्या काळात इजिप्तची अर्थव्यवस्थाही भरभराटीस आली होती. हेराक्लीयन शहराचा संपूर्ण चेहरामोहराच या राजाने बदलून टाकला होता. हे शहरही त्यानेच वसवले होते. समुद्रात भर घालून हे समुद्र वसवले होते. त्यामुळे नैसर्गिक संकटापुढे या शहराचा टिकाव लागला नाही. त्सुनामीच्या लाटेत हे शहर बुडून गेले. तरीही समुद्राच्या तळाशी आजही या शहराने आपले अस्तित्व जपून ठेवले आहे. 

सुमारे बारा वर्षापूर्वी पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. फ्रेंक गोडीयो यांना इजिप्तच्या समुद्री किनाऱ्यावर फ्रेंच युद्ध नौका आढळल्या होत्या. या युद्धनौका अठराव्या शतकातील होत्या. या समुद्री किनाऱ्यावर सुमारे चार वर्षे त्यांनी संशोधन केले तेंव्हा कुठे या युद्धनौकांचा शोध लागला होता. यासाठी डॉ. फ्रेंक गोडीयो आणि त्यांच्या टीमने बरीच मेहनत घेतली होती.

समुद्राच्या तळाशी जेंव्हा हे शहर सापडले तेंव्हा या शहराचा अंदाजित नकाशा बनवण्यासाठीच एक वर्षाचा कालावधी लागला. समुद्राच्या काठावर हे शहर वसवण्यात आले परंतु सातत्याने किनाऱ्यावरील पाणी वाढत गेल्याने हे शहर बुडून गेले.

इजिप्त आज एक मुस्लीम राष्ट्र म्हणून ओळखले जात असले तरी कधी काळी इथे ग्रीक मंदिरे होती याचाच पुरावा या शहरावरून मिळतो. नाइल नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या अतिप्राचीन संस्कृतीचे अनेक अवशेष या देशाने आपल्या उदरात गडप केलेले आहेत.

सर्वात प्रथम नेपोलियनने या देशावर हल्ला केला तेंव्हा युरोपीय लोकांची नजर या देशाकडे वळली आणि तिथूनच इथल्या संस्कृतीचा अभ्यास सुरु झाला.

इजिप्तच्या संस्कृती आणि इतिहासाबद्दलची गूढता आजही वाढतच जाते आहे. सुएझ कालव्याच्या वरच्या टोकाशी असणारा हा देश नाइल खोऱ्यातील एक महत्वाचा देश आहे. याठिकाणी ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षे आधीच्या काळात शेती सुरु झाली. इजिप्तच्या इतिहासात ख्रिस्तपूर्व साडेतीन हजार वर्षांपूर्वीपासून मोठमोठ्या ३१ राजवंशाच्या सम्राटांनी इथे राज्य केले आहे. या सर्वांच्या कार्तृत्वातून इथला इतिहास तयार झाला आहे.

भारतीय संस्कृती आणि इजिप्शियन संस्कृती यातही बरेच साम्य आढळते. इजिप्तच्या संस्कृतीला सहा हजार वर्षांचा लिखित इतिहास आहे. हजारो वर्षे इजिप्तने गुंतागुंतीची तरीही स्थिर अशी संस्कृती जोपासली आहे. युरोप, मध्यपूर्व आशिया आणि आफ्रिकन संस्कृतीवरही इजिप्शियन संस्कृतीचा प्रभाव आढळतो.

इजिप्तच्या संस्कृतीत गायीला पवित्र मानले गेले होते. इझीस ही इजिप्शियन देवी गायीचेच प्रतीकात्मक रूप होती. नाइल नदीला इजिप्तची गंगा मानले जाते. तिथेही देवतांना जलाभिषेक करण्याची प्रथा होती. इजिप्तच्या प्रत्येक गावाची एक ग्रामदेवताही होती.

अलीकडच्या काळातही कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यासाठी अनेक देश इजिप्तवर अवलंबून आहेत. पिरॅमिडसाठी प्रसिद्ध असल्याने पर्यटन हाही इजिप्तमधील एक मोठा व्यवसाय आहे. सुवेझ कालव्यातील जहाज वाहतुकीतूनही या देशाला आर्थिक फायदा मिळतो. इजिप्तची राजधानी कैरो हे आफ्रिकेतील सर्वात मोठे शहर आहे. अरब संस्कृतीत नव्या प्रवाहांची सुरुवात इजिप्त पासूनच झाली. अरब संस्कृतीवर इजिप्शियन संस्कृतीचा मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते.

अशा अनेक साम्य विविध देशांतील जुन्या संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात! इतिहास तुम्ही जितका उलगडत जाल तितक्या या गोष्टी समोर येत जातील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!