आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, घरी संगणक किंवा लॅपटॉप आहे. आपली सगळी काम एक बटन दाबून सहज पुर्ण होतात. ऑनलाईन शॉपिंग असो, बिल भरणं असो, ऑनलाईन बँकिंग असो किंवा घरी बसून दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी समोरासामोर संवाद असो. हे सगळं शक्य झाल ते सतत विकसित होत राहणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आणि उपकरणांमुळे!
तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आणलं. सोशल मिडीयाची अनेक माध्यमं आज विविध विषयांवर जागृती निर्माण करणं, समाजमनावर प्रभाव पाडण्यासाठी उपयोगी आहेत.
पैशांचे मोठमोठे व्यवहार बँकेत रांगेत न लागता सहज पुर्ण होऊ शकतात. थोडक्यात या सगळ्या तंत्रज्ञानाने मानवाच्या राहणीमानाचा स्तर उंचावला आहे व आयुष्य सुखकर केलं आहे.
पण याचे देखील दोन पैलु आहेत. आज आंतरजालवर कुठल्याही विषयावर अफाट माहिती उपलब्ध आहे. आपण सगळे या माहितीचा उपयोग चांगल्या कामांसाठी किंवा कुणाच्या मदतीसाठी करतो. पण काही प्रवृत्ती अशा आहेत जे या माहितीचा चुकीचा उपयोग करून लोकांना फसवतात, इजा पोहचवतात. गुन्हेगारीच्या दुनियेत ‘सायबर क्राईम’ हा एक भयंकर प्रकार समाविष्ट झाला आहे. गेल्या काही वर्षांत धक्कादायक प्रकरणं समोर आले आहेत, ज्यात आतंकवादापासून ते खून करण्याचा प्रकरणांतची नोंद केली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा उपलब्ध असलेल्या माहितीचा गैरवापर करून शारीरिक किंवा मानसिक कुठल्याही प्रकारचा छळ करणं यालाच सायबर क्राईम असं म्हणतात.
घरात कुणाला तरी अनोळखी क्रमांकावरून कॉल येतो, आम्ही बँकेकडून बोलतोय असं सांगून बँकेची सगळी माहिती मिळवतात आणि आपलं खातं हॅक करतात, असे अनेक प्रसंग आपण जवळून पाहिले असतील, अनुभवले असतील. तरूण मुलामुलींचे सोशल मीडियावरील विविध माध्यमांचे अकाऊंट हॅक करणं, त्यांना धमकी देणं, पैसे लुबाडणे, मुलींचे अश्लील व्हिडियो बनवून वायरल करणं या सगळ्या प्रकारांच प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय.
अनेक तरूण मुलं या मुळे आपला जीव गमावून बसतात . सामान्य माणूसालाच इतकी माहिती आहे म्हणल्यावर आतंकवादी कारवाई करणारे कसे मागे राहतील. उलट आतंकवाद तंत्रज्ञानाने युक्त आहे आहे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.
बॉंब बनवण्याचे हजारो प्रयोग आंतरजालावर उपलब्ध आहे. मोबाईल ट्रॅकिंग, टँपिंग, या सगळ्या माहितीद्वारे ते आपल्याला हतबल करतात.
वादग्रस्त लेखन, भडकावू भाषणं सोडले जातात व आपण त्यांना बळी पडतो. मागील वर्षांत ‘ब्लु व्हेल‘ नावाच्या एका व्हिडियो गेमने थैमान घातला होतं. अनेक तरूण मुलं-मुली आत्मह*त्या करत होते.
या सगळ्या गतिविधींना व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेला एका वेगळ्या शाखेची गरज भासली. ज्याला सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन सेल म्हणतात. २००० साली ‘आय टी ॲक्ट’सुद्धा लागु केला गेला. कायद्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना कडक शिक्षा सांगितली आहे. २०११ ते २०१४ सालात सायबर गुन्हेगारी ३०० टक्क्यांनी वाढली. २०१५ साली ११,५९२ केसेसची नोंद झाली.
पण तरीसुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. उलट त्यात रोज नवनवीन बदल होऊन प्रत्येक वेळी वेगळ्याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जर अशा गुन्हेगारांना पकडायचं असेल तर पोलिसांनी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहायला हवं.
असं म्हणतात लोखंडच लोखंडाला कापू शकतं. अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांच्याच प्रमाणे विचार करणाऱा व तंत्रज्ञानाला जाणणारा व्यक्ती हवा.
मुंबई पोलिसांना शुभम सिंघ नावाचा तरूण एथिकल हॅकिंगच्या माध्यमातून अशा केसेस सोडवण्यासाठी मदत करतो.
मुंबई येथील रहिवासी, हा २१ वर्षीय तरूण एथीकल हॅकिंग करण्यात पारंगत आहे. कुटुंबात अशी कुठलीही पार्श्वभुमी नसताना त्याने आपल्या बुद्धिमत्ता व मेहनतीने यात यश प्राप्त केलं.
काही वर्षांपूर्वी त्याचं फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं. त्यावेळी त्याने यूट्यूबवर अनेक व्हिडीओ बघितले व माहिती मिळवली. इथूनच त्याला या क्षेत्रात रुची निर्माण झाली व त्याच्या आयुष्याल कलाटणी मिळाली. याच विषयावर विक्रोळी येथील एका विद्यापीठात तो व्याख्यान देत होता. त्यावेळी तिथे उपस्थित एका गृहस्थाने पोलिसांशी त्याचा संपर्क करून दिला. तेव्हा पासून तो पोलिसांना मदत करतोय.
या शिवाय विक्रोळी येथें ‘सायबर वर्ल्ड्स ॲकॅडमी’देखील सुरू आहे. त्याची मैत्रिण सौम्या मोण्डलच्या मदतीने तो ही अकॅडमी चालवतो. सायबर क्राईम इन्वेस्टिगेशनसाठी त्यांनी अभ्यासक्रम तयार केला आहे व या अकॅडमीमधे शिकवला जातो.
अनेक पोलिस अधिकारी त्याच्या या कामामुळे प्रभावित झाले. जवळपास १०० पोलिस या अकॅडमीमधे निःशुल्क हा कोर्स करत आहेत व एथिकल हॅकिंग आणि तंत्रज्ञान शिकून घेत आहेत.
खरंतर, या सगळ्या माहितीचा व आपल्या बुद्धिमत्तेचा गैरवापर तो करु शकला असता. पण तो त्या मार्गाला वळला नाही. चांगल्या हेतू आणि उद्देशाने तो अविरत काम करत आहेत आणि मुंबई पोलिसांना मदत करतो आहे. या गुन्ह्यांना पुर्णपणे संपवणे शक्य नाही, पण कमी करणं आपल्या हातात आहे. आपल्यासोबत किंवा आजूबाजूला अशी कुठली घटना घडताना दिसली तर पोलिसांकडे तक्रार करा.
आजच्या जगात ‘अपडेटेड’ राहणं आवश्यक आहे. योग्य ती काळजी घेऊन, सतर्क राहून, आपण सायबर क्राईमवर आळा घालू शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.