The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल बजाज यांनी स्वदेशी स्कुटरसाठी थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता…!

by द पोस्टमन टीम
8 February 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाचे नायक आणि बजाज ऑटोचे माजी अध्यक्ष राहुल बजाज १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्यातून कायमचे निघून गेले. राहुल बजाज यांचं वयाच्या ८३व्या वर्षी पुण्यात निधन झालं. ते दीर्घकाळापासून कॅन्सरनं त्रस्त होते. याशिवाय त्यांना न्युमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होता. ते पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट होते.

२०२१ च्या मे महिन्यात एक्झिक्युटिव्ह आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह अशा दोन्ही पदांचा राजीनामा देऊन राहुल बजाज यांनी प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती घेतली होती. जवळपास अर्धशतकीय (४९ वर्षांच्या) काळात त्यांनी बजाज ऑटोचं स्टिअरिंग समर्थपणे सांभाळलं. राहुल बजाज ही अशी व्यक्ती होती जिनं कायम व्यापारी समुदाय, कर्मचारी, पुरवठादार आणि अगदी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचाही आदर केला.

बजाजला जे स्थान भारतीय ग्राहकांच्या मनात मिळालं ते आतापर्यंत फारच कमी ब्रॅण्ड्सच्या वाट्याला आलं आहे. उदारीकरणापूर्वीच्या काळात बजाज आणि त्याची चेतक स्कूटर ही नावं घरोघरी पोहचली होती. दिवंगत भारतीय उद्योगपती जमनालाल बजाज यांचे वारसदार असलेल्या राहुल बजाज हे ‘मेक इन इंडिया’मधील योगदानासाठी आणि भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा लेख…

१० जून १९३८ रोजी कोलकाता येथील मारवाडी उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांच्या घरी राहुल यांचा जन्म झाला. बजाज कुटुंब सुखवस्तू होतं आणि त्यांना समाजात प्रतिष्ठा होती. बजाज आणि नेहरू कुटुंबात तीन पिढ्यांपासूनची मैत्री होती. राहुल यांचे वडील कमलनयन आणि इंदिरा गांधी यांनी तर काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतलं होतं. राहुल यांचे आजोबा जमनालाल बजाज यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. त्यांनी आपला मुलगा कमलनयन आणि राहुल यांच्या मनात देशप्रेमाची भावना रुजवली होती.



राहुल हे बालपणापासून करारी स्वभावाचे होते. एकदा त्यांना शिक्षकांनी वर्गातून बाहेर काढलं होतं. त्यांनी आपल्या शिक्षकाला ‘यु जस्ट कान्ट बीट अ बजाज’ असं ठणकावून सांगितलं होतं. राहुल बजाज कोणाच्याही हाताखाली काम करू शकणार नाही, याची झलक त्यावेळी दिसली होती.

राहुल बजाज यांचे आजोबा आणि स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांनी १९२६ मध्ये बजाज ग्रुपची स्थापना केली होती. पुढे बजाज आणि फिरोदिया कुटुंबात व्यवसायाच्या विभाजनावरून वाद झाला. सप्टेंबर १९६८ मध्ये दीर्घ कायदेशीर लढाईनंतर फिरोदियांना ‘बजाज टेम्पो’ मिळाला आणि राहुल बजाज यांना ‘बजाज ऑटोचं’ अध्यक्षपद आणि व्यवस्थापकीय संचालकपद मिळालं. त्यावेळी एस्कॉर्ट, एनफिल्ड, एपीआय, एलएमएल आणि कायनेटिक हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींवर पोहोचली. स्कूटर विकणारी ‘बजाज’ ही देशातील आघाडीची कंपनी बनली.

सध्या बजाज एक आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असली तरी तिची सुरुवात मात्र, फारच कठीण परिस्थितीमध्ये झाली होती. वरती सांगितल्याप्रमाणं बजाजची मुळं स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत आहेत. जमनालाल बजाज हे त्यांच्या काळातील एक यशस्वी उद्योगपती होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता. १९२६ मध्ये त्यांनी ‘सेठ बच्छराज’ नावाची एक फर्म स्थापन केली. १९४२ मध्ये वयाच्या ५३व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

त्यानंतर त्यांचे जावई रामेश्वर नेवातिया आणि दोन मुलं कमलनयन आणि रामकृष्ण बजाज यांनी ‘बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ची स्थापना केली. १९४८ मध्ये, कंपनीनं आयात केलेल्या घटकांमधून बांधलेल्या दुचाकी आणि तीन चाकी वाहनं बाजारात आणली. पहिली बजाज व्हेस्पा स्कूटर गुरुग्राममधील एका गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती.

यानंतर बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशननं मुंबईतील कुर्ला येथे प्रॉडक्शन फॅक्टरी उभारली व नंतर ती पुण्यातील आकुर्डी येथे शिफ्ट करण्यात आली. याच ठिकाणी बजाज कुटुंबानं फिरोदियांसोबत भागीदारी करून दुचाकी आणि तीनचाकी वाहनं तयार करण्यासाठी स्वतंत्र प्लांट्स उभारले. १९६०मध्ये कंपनीचं नाव बदलून ‘बजाज ऑटो’ असं करण्यात आलं.

पुढे जेव्हा वडिलांच्या निधनानंतर राहुल बजाज यांच्या हातात कारभार आला तेव्हा त्यांनी अतिशय कुशलपणे कंपनीची मार्केटिंग केली. चौकोनी कुटुंबांसाठी आणि लहान व्यापार्‍यांसाठी अतिशय योग्य, कमी किमतीच्या आणि कमी देखभालीसह मिळणाऱ्या बजाज ब्रँडच्या वेस्पा स्कूटर अल्पावधीत लोकप्रिय झाल्या. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ७० आणि ८०च्या दशकात बजाज स्कूटर खरेदी करण्यासाठी लोकांना १५-२० महिने वाट पहावी लागत होती. असं म्हणतात, त्या काळात अनेकांनी बजाज स्कूटरचं बुकिंग नंबर विकून लाखो रुपये कमवले.

१९७२ मध्ये वडिलांच्या निधनानंतर राहुल यांनी बजाज ऑटोचं काम हाती घेतलं. या दशकात कंपनीनं बजाज सुपर आणि चेतकसारखी मॉडेल्स बाजारात आणून यश मिळवलं. इटालियन कंपनी पियाजिओच्या परवान्याखाली स्कूटरची निर्मिती करण्यात आली होती, परंतु, त्या कंपनीनं परवान्याचं नूतनीकरण करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत राहुल यांनी भारतीय स्कूटर बनवण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा इंदिरा सरकारच्या निर्बंधांमुळे उत्पादन आणि परवाने मर्यादित होते. अनेक महिने लोकांना डिलिव्हरीची वाट पाहावी लागली. याला कंटाळून बजाज यांनी सरकारवर टीका केली. जनतेला लागणाऱ्या वस्तू बनवण्यासाठी सरकारनं मला तुरुंगात टाकलं तरी चालेल, पण मी उत्पादन घेणार, असं त्यांनी गांधींना ठणकावून सांगितलं होतं. यानंतर त्याच्या कंपनीवरही छापा टाकण्यात आला होता.

राहुल बजाज एक धाडसी आणि निर्भय उद्योगपती होते. समोर कुणीही असो ते न घाबरता आपलं म्हणणं मांडायचे. नोव्हेंबर २०१९मध्ये मुंबईतील एका मीडिया इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमातही याचा नमुना दिसला, जेव्हा त्यांनी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर सरकारला प्रश्न विचारले होते.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी त्यांना २००१मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान देखील मिळालेला आहे.

२००६ ते १० या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांच्यातील उद्योजकतेनं देशातील बहुतेक घरांमध्ये दुचाकी वाहन उभं राहिलं. ज्यामुळं लोकांमध्ये अभिमान आणि स्वाभिमान निर्माण झाला. सुमारे पाच दशकांपासून भारतीय व्यावसायिक जगतात एखाद्या ताऱ्याप्रमाणं राहुल बजाज चमकत राहिले. ते देशातील अशा महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, ज्यांच्या कर्तृत्वाची उंची त्यांच्या आयुष्यापेक्षा खूप मोठी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

साऊथ आफ्रिकेचा ‘बेबी एबीडी’ आता आयपीलमध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे

Next Post

क्रिप्टोकरन्सीवर सरकारने कर लावला म्हणजे क्रिप्टोकरन्सीला मान्यता मिळाली का..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

क्रिप्टोकरन्सीवर सरकारने कर लावला म्हणजे क्रिप्टोकरन्सीला मान्यता मिळाली का..?

Explainer: शार्क अशनीर ग्रोव्हर आणि भारतपे यांच्यातील वाद नेमका काय आहे?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.