‘हमारा बजाज’ च्या जाहिरातींनी भारतीयांच्या भावनेला अलगद हात घालत आपलं मार्केट पक्कं केलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इंटरनेट आणि दूरसंचार क्रांतीच्या आधी भारतात टीव्हीहेच एक माहिती पोहोचवण्याचे आणि मनोरंजनाचे साधन होते. त्यामुळे १९८०-९०च्या दशकात टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या प्रत्येक माहिती आणि मनोरंजनाच्या विषयाचा समाजावर मोठा प्रभाव पडत असे आणि त्यातून समाजमन बदलतही होते.

आधुनिक जीवनशैलीचा सर्वमान्य स्वीकार होण्याच्या काळात टीव्हीने खूप मोठे योगदान दिले आहे. टीव्हीनेच सामान्य लोकांना एका नव्या, तांत्रिक आणि वेगाने बदलत्या जगाची ओळख करून दिली. भारतीय खेड्यापाड्यातील जीवनशैली आजच्या पेक्षा फारच वेगळी होती, या जीवनशैलीत टीव्हीने आपल्या प्रभावातून भरपूर हस्तक्षेप केला होता. त्याकाळात टीव्ही वर येणाऱ्या जाहिरातींनीही समाजात बरेच बदल घडवून आणले.

खेड्यातील माणूसही आधुनिक सुख-सुविधांकडे आकर्षित झाला तो या जाहिरातींमुळेच.

या जाहिरातींनी ग्राहकांची स्वप्रतिमा उंचावली. स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात करत असताना भारतीय संस्कृतीच्या मूळ तत्वांचा यांनी हुशारीने वापर करून घेतला. एकत्र कुटुंब पद्धती हे भारताचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे.

पिढ्यानपिढ्या एकत्र राहिलेली आणि राहत असलेली कुटुंबे आजही इथे पाहायला मिळतात. जीवनशैली कितीही प्रगत झाली असली तरी, कुटुंब हा आजही भारतीय माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि प्राधान्यक्रमाचा विषय आहे.

कुटुंबाचा कर्ताधर्ता असणाऱ्या कुटुंब प्रमुखाला ८०-९०च्या दशकात अनेक बदलांना सामोरे जावे लागत होते. काळाने कात टाकली होती. जग वेगाने गती घेत होते. अशा काळात कामाच्या ठिकाणी, जाणे-येणे सुलभ होणे ही निकडीची गरज होती. भारतीयांच्या याच गरजेवर रामबाण उपाय दिला बजाज स्कूटरने.

जमनालाल बजाज यांच्या राजस्थानमधील बजाज ग्रुपने बजाज ऑटो लिमिटेड नावाची एक नवी कंपनी सुरु केली. स्कूटर, ऑटोरिक्षा आणि मोटरसायकल निर्मितीच्या क्षेत्रातील त्याकाळातील ही एक आघाडीची कंपनी होती. भारतीय रस्त्यांवर एकेकाळी बजाजच्याच वाहनांचे राज्य होते.

भाजी आणण्यासाठी असो की आठवड्याची सुट्टी घालवण्यासाठी असो जवळ किंवा दूरच्या अंतरावर जाण्यासाठीही स्कूटरचा वापर केला जात होता.

बरं ही स्कूटर जरी दोन चाकी असली आणि तिच्यावर एकावेळी दोनच व्यक्तींना बसता येण्याची सोय असली तरी, त्यावर नवरा-बायको आणि दोन मुले अशी एका कुटुंबातील चार मंडळी आरामात सैर करू शकत असत. म्हणूनच ही बजाज एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी महत्वाची बाब बनली.

लहान मुलांनाही यामुळे आठवड्याची सुट्टी बोरिंग वाटत नव्हती. आठवड्याच्या सुट्टीचीही त्यांना आतुरता असयाची कारण, स्कूटरची सैर करण्याची संधी मिळत होती. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गावापासून थोड्या अंतरावर राहाव्या लागणाऱ्या माणसांना घरातील प्रौढ व्यक्तींशी यानिमित्ताने भेटून बोलता येत होते. कुटुंबांपासून दूर असूनही जोडलेले असल्याची भावना टिकवून ठेवता येत होती.

या स्कूटरमुळे प्रत्येकालाच एक आरामदायी सुविधा पुरवली होती. कामावर जायचे तर बस पकडण्याचे टेन्शन त्यातही धक्के खात खात होणारा प्रवास, सहप्रवाशांच्या, कंडक्टरच्या कटकटी, अशा अनेक दमछाक करणाऱ्या गोष्टींपासून या स्कूटरने सुटका करून दिली. गावी जाऊन मस्त सुट्टी एन्जॉय करायची ठरवले तरी त्यातही फारशी अडचण येत नसे. अगदी चाळीस-पन्नास किमी अंतरावरील गावांना जाणे-येणे फार सुलभ होते. खूप दुरचा प्रवास शक्य नसला तरी, अशी छोटी ट्रीप या स्कूटरने सामन्यांच्या आवाक्यात आणली.

‘हम दो हमारे दो’च्या जमान्यात या स्कूटरने प्रत्येक कुटुंबाशी अनोखे बंध निर्माण केले. टीव्हीवरील बजाजच्या जाहिरातीतही ‘हमारा बजाज’ या गाण्याने लोकांच्या मनाला साद घातली. कारण या गाण्यातून स्पष्ट होत होते की, ही स्कूटर एकट्याची नाही, ‘हमारा बजाज’ म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आहे.

खरेच ‘हम दो हमारे दो’ अशा चौकोनी कुटुंबासाठी ही स्कूटर अगदी परफेक्ट होती.

या स्कूटरमुळे कुटुंबासह विनाकटकट प्रवास करण्याचा आनंद मनमुरादपणे लुटता येत होता. मध्यमवर्गीयांसाठी तर स्कूटर म्हणजे फक्त एका वाहनाहूनही खूप काही होते. शेवटी, वस्तू असो की माणूस त्यात जीव गुंतवणे ही भारतीय माणसाचे एक खास वैशिष्ट्य आहे.

हमारा बजाज या टॅगलाईनने भारतातील एकत्रित, सामुहिक, सामाजिक जीवनशैलीला अधोरेखित केले होते. मेरा बजाज म्हटले असते तर एवढा फरक जाणवला नसता. पण, हमारा बजाजने कुटुंब आणि समाजातील एकोपा अधिक गडद केल्याने घराघरात या जाहिरातीच्या या ओळी खूपच अभिमानाने गुणगुणल्या जात.

बजाज स्कूटर ही कुटुंबासाठी उपयोगी पडणारी वस्तू आहे, हेही नकळतपणे या जाहिरातीने लोकांच्या मनावर इतक्या प्रभावीरीत्या बिंबवले की, कुटुंबाचा विचार करून वस्तू घेणारा एक मोठा ग्राहक वर्ग या जाहिरातीकडे आपसूक खेचला गेला. त्यामुळे बजाज हा संपूर्ण भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबाचा आवडता ब्रँड बनला होता. म्हणूनच रस्त्यावर बजाजच्या स्कूटरवरून जाणारे नोकरदर, गृहिणी हे एक सामान्य चित्र झाले.

त्याकाळी महिलासुद्धा ही स्कूटर चालवत होत्या. आत्ता कुठे घराबाहेर पडू लागलेल्या भारतीय महिलांना तर या स्कूटरने फारच सहकार्य केले. नोकरी आणि कुटुंब यांच्यातील समतोल सांभाळताना होणारी ओढाताण या स्कूटरने थोडी सुसह्य केली.

दरम्यान बजाज चेतकची आणखी एक जाहिरात टीव्हीवर झळकू लागली होती. ज्यात भारतीय माणसाची चांगली गुण वैशिष्ट्ये प्रकर्षाने दाखवली गेली. हा जाहिरातीत प्रामाणिक, विवेकी आणि चणाक्ष भारतीयाचे दर्शन घडवण्यात आले. ज्यामुळे हा ब्रँड भारतीयांच्या जिव्हाळ्याचाच विषय बनला.

भारतातील जात-धर्म-पंथ अशा अनेक बाबतीत विविधता आहे. पण, या सर्व विविधतेला एकत्र बांधणारी गोष्ट होती, बजाज स्कूटर. या जाहिरातीने भारतीयांच्यातील एकतेला हळुवारपणे चेतवले. कितीही भेदाभेद असला तरी बजाज स्कूटर हीच एक अशी गोष्ट आहे, जी या विविधतेच्या आणि भेदाभेदाच्याही पलीकडची आहे. या जाहिरातींनी नुसताच वस्तूंचा खप वाढवला असे नाही तर या जाहिरातींनी भारतीयांना त्यांच्यातील खऱ्याखुऱ्या आणि अभिमानास्पद मुल्यांची जाणीवही करून दिली.

‘हमारा बजाज’ ही ट्यून त्याकाळी खूपच प्रसिद्ध झाली होती. आजही ‘हमारा बजाज’ हे शब्द कुणीही गद्यात वाचणारच नाही. जिथे जिथे ‘हमारा बजाज’ हे शब्द दिसतील तेंव्हा ते वाचताना त्याच धूनमध्ये ते शब्द उच्चारले जातील. इतका या जाहिरातींनी जनमानसावर प्रभाव टाकला होता.

बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांनी देशात निर्माण झालेल्या अंधाधुंदीबद्दल जेंव्हा गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्र्यांना काही प्रश्न केले. या निमित्ताने सिनेतारका उर्मिला मातोडकरने बजाज ग्रुपचे अभिंनदन केले आणि तिने पुन्हा एकदा ‘हमारा बजाज’ यातील एकतेच्या भावना अधोरेखित करण्यासाठी ही हॅशटॅग वापरली. ट्रोल ब्रिगेडने लगेचच या टगलाईनवर हल्ला चढवला आणि पुन्हा एकदा ही ट्यून चर्चेचा विषय बनली.

याकाळात काही वेगळ्या कारणाने ही जुनी ट्यून पुन्हा नव्याने आळवली जात आहे. अर्थात त्यामागे कारण काही वेगळे असले तरी, या जाहिराती लोकांच्या मनातून पुसल्या गेल्या नाहीत हेच यातून स्पष्ट होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!