आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इलेक्ट्रिसिटी’ – आजच्या काळाची एक मूलभूत गरज. छोट्या दिव्यापासून ते मोठ्या लिफ्ट पर्यंत तिच्या करामती थक्क करणाऱ्या आहेत.
पण ह्याच विद्युत ऊर्जेला तुमच्या घरात पोहोचण्यासाठी एक मोठा प्रवास करावा लागतो. औष्णिक, जल, अणुभट्टी, पवन विद्युत केंद्रातील जनरेटर्सपासून ते तुमच्या घरातील विद्युत उपकरणापर्यंत.
ही वीज वाहून आणण्यासाठी एक मोठी ‘वीज पुरवठा प्रणाली’चा उपयोग होतो. ही आधुनिक वीज पुरवठा प्रणाली विकसित होण्यामागे योगदान होत ते एका होतकरू संशोधकाचं त्याचं नाव ‘ निकोला टेस्ला’.
निकोला टेस्ला हा एक सर्बियन – अमेरिकन विद्युत अभियंता आणि संशोधक होता. लहानपणी विद्युत उर्जेविषयी निर्माण झालेल्या कुतुहुलाने एक महान संशोधक घडवला गेला. समाकलन गणितासारखी (Integral Calculus) अवघड गणिते मनात सोडवण्याची प्रतिभा त्याच्यात होती.
विद्युत ऊर्जा आणि तारांद्वारे होणाऱ्या संदेशवहनाच्या (communication) सैद्धांतिक अभ्यासाबरोबरच त्यांनी प्रात्यक्षिक अनुभवही (practical experience) घेतला. विविध कंपन्यांमध्ये काम करत असतानाच त्यांच्यातील संशोधकवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सरतेशेवटी त्यांनी या नोकरीला राम राम ठोकला आणि तिथूनच संशोधनाच्या पर्वाला सुरुवात झाली.
टेस्लानी न्यूयॉर्कमध्ये एक प्रयोगशाळा सुरू केली ज्याचा उपयोग त्यांनी संशोधनासाठी व नवनवीन उपकरण विकसित करण्यासाठी केला. संशोधनासाठी लागणारी आर्थिक मदत मिळवण्यासाठी त्यांनी गुंतवणूकदार शोधण्याची मोहीमच हाती घेतली.
या प्रयोगशाळेत विकसित केलेल्या AC इंडक्शन मोटारचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. प्रचलित एकेरी फेज आणि दुहेरी तार प्रणालीला पर्यायी नवीन तिहेरी फेज, तिहेरी तार प्रणाली विकसित केली जी तीन पटीने अधिक शक्ती उपलब्ध करून देते.
सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या औदयोगिक उपकरणे जी जास्त शक्ती वा ऊर्जेवर चालतात त्यांना उच्च दाबाने वीज पुरवठा करावा लागतो. या संशोधनामुळे कारखाने, उद्योग इत्यादी उच्च दाब वीजेची गरज भागवणे सोपे झाले.
इंडक्शन मोटार आणि पोलिफेज AC च्या पेटंटने त्यांना भरपूर फायदा कमवून दिला ज्याचा उपयोग त्यांनी खाजगी कामासाठी न करता त्यांच्या भविष्यातील प्रयोग व संशोधनावर गुंतवणूक म्हणून केला.
त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ हा नवनवीन संशोधन करण्यात गेला. त्यांनी विकसित केलेल्या उपकरणांची यादी जर लेखात दिली तर हा लेख मर्यादित शब्दांपेक्षा मोठा होईल.
निकोला टेस्ला स्वतः विकसित केलेल्या उपकरणांची आणि विविध प्रयोगांची प्रात्यक्षिक लोकांसमोर घेत ज्या मध्ये विद्युत ऊर्जेचे नयनरम्य व चमत्कारीक शक्ती बघून लोक अवाक होत.
निकोला टेस्लाना भविष्यवादी म्हणणं ही चुकीचं ठरणार नाही कारण त्यांनी म्हटल्यानुसार “भविष्यकाळ हा बिनतारी संदेशवहनाचा (Wireless Communication) असेल” ही गोष्ट तंतोतंत खरी ठरली आणि आज आपण सर्वजण त्यागोष्टीचा अनुभवही घेत आहोत.
टेस्लानी आपल्या आयुष्यातला एक मोठा भाग हा ‘विद्युत ऊर्जेचे बिनतारी वहन’ या त्यांच्या महत्वाकांक्षी (the transmission of electrical power without wires) संशोधनात घालवला. त्यांना वीज कोणत्याही तारांचा (माध्यमाचा) (Conductor) वापर न करता जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवायची होती. या संशोधनावर त्यांची जवळपास पूर्ण कमाई खर्च झाली.
जर त्यांचं हे संशोधन यशस्वी झालं असत तर आजचं जग वेगळच असतं यात तिळमात्र शंका नाही.
लुई पाश्चर – साथीच्या रोगांपासून मानवजातीला वाचवणारा महान संशोधक
त्यांनी केलेल्या व्यावसायिक चुका, पैशाच फसलेले नियोजन, महत्वाकांक्षी संशोधांनवर केलेला वारेमाप खर्च यामुळे वयाच्या उत्तरार्धात त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.
त्यांचं संशोधनावरच प्रेम हे इतकं निर्भेळ होत की त्यांनी स्वतःकडील एक अन एक रुपया त्याच्यावर खर्च केला. त्यांनी बहुतेक शोधांचं पेटंटही करवून घेतलं नव्हतं. त्यांचे कितीतरी अविष्कार पैशांच्या अभावी सत्यात न उतरता कागदोपत्रीच राहिले.
टेस्लाच्या खूप कल्पना ह्या नंतरच्या काळात संशोधकांनी सत्यात उतरवून दाखवल्या. पैशासाठी त्यांनी हजारो गुंतवणूकदारांचे उंबरठे झिजवले.
आयुष्यतला एक एक क्षण त्यांनी संशोधन करण्यात, समजून घेण्यात-देण्यात, त्याचं नियोजन करण्यात, नवनवीन कल्पना सत्यात उतरवण्यात व्यतीत केला. अशा अवलीयाबद्दल लिहावं तितकं कमीच.
अशा या अनेक अविष्काराच्या जनक असलेल्या ध्येयवेड्या शास्त्रज्ञाने जगाचा निरोपही एकांतात हॉटेलमधील खोलीत घेतला कारण त्यांना पूर्ण हयातीत घर घेणंही योग्य वाटलं नाही. किंबहुना त्यांनी त्याच्यासाठी पैसे खर्च करण टाळलं.
निकोला टेस्लाच्या कामाची परतफेड म्हणून विद्युत-चुंबकीय शास्त्रामधील ‘चुंबकीय प्रवाह घनता’ (Magnetic Flux Density) चे एकक म्हणून ‘टेस्ला’ हे नाव वापरलं जातं.
‘निकोला टेस्ला’ अशा या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्ती बद्दल इतकंच !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.