आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या दंतकथा, आख्यायिका असतात. प्रत्येक ठिकाणची दंतकथा वेगळी असते, पण अनेक दंतकथांमध्ये जर काही कॉमन असेल तर ते म्हणजे खजिना. अनेक ठिकाणी खजिन्यांबद्दल दंतकथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात. जगातल्या जवळ जवळ सगळ्यांच भागांत अशा कथा सांगितल्या जातात. अमेरिकाही याला अपवाद नाही.
अमेरिकेच्या काही दंतकथांपैकी ॲझटेकच्या हरवलेल्या प्रचंड खजिन्याच्या दंतकथा सर्वांत जुन्या आहेत. या जुन्या कथांमध्ये अनेक अंधश्रध्दा असून, या कथेमुळे अनेक लोक संपत्तीच्या निष्फळ शोध घेण्यास इथे येतात. एका सम्राटाच्या रक्ताने आणि एका साम्राज्याच्या भग्नावशेषांनी कलंकित असलेला हा खजिना सोने, चांदी आणि रत्नांनी परिपूर्ण असून या खजिन्याने अ*त्याचार आणि हिं*सेला प्रेरणा दिली आहे. हा खजिना आज अमेरिकेत असेल असे काही लोकांचे मत आहे.
सुरुवात झाली ती स्पॅनिश वसाहतवादाच्या प्रयत्नाने
१५१९ साली हर्नन कोर्टीसच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश सैनिकांची एक तुकडी मॅक्सिकोमध्ये आली. या सैन्यतुकडीत ५०८ सैनिक, १०० खलाशी आणि १४ लहान आकाराच्या तोफांचा समावेश होता. स्पॅनिशांचा ‘सुवर्ण’ इतिहास मानवी रक्ताने आणि प्रचंड विध्वंसाने लिहिला गेला आहे. ज्याठिकाणी ते जात असत त्या ठिकाणची संस्कृती नष्ट करून तिथल्या जनतेचे जबरदस्तीने धर्मांतरण करीत असत. अशाच प्रकारे त्यांनी ॲझटेक लोकांचे ख्रिश्चन धर्मांतरण करण्याचा मोठा प्रयत्न केला. यामुळेच कैक प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेली अमेरिकेची महान संस्कृती नष्ट झाली.
स्पॅनिश सेनापती कोर्टीस काहीच दिवसांत ‘टेनोचीटलॅन’च्या (Tenochtitlán) बाहेरील भागात आला. पौराणिक कथांनुसार, स्पॅनिश लोकांनी दाखवलेली शक्ती फक्त दैवी असू शकते आणि कोर्टीस हा एक देव असल्याचंही ॲझटेकच्या अनेक रहिवाशांना वाटलं. कारण ॲझटेक्सच्या देवांचेसुद्धा पांढरे केस असत आणि ते शरीरानेही जाड असत. पण यात कोणतेही तथ्य नसून निदान ॲझटेकच्या राजकीय आणि खानदानी लोकांना तरी कोर्टीस काही देव नाही याची खात्री होती असा अनेक इतिहासकारांचा विश्वास आहे. असे असूनही, त्याला क्वेत्झलकोटचे प्रतीकात्मक ‘पेनाचो’, म्हणजेच पक्ष्यांच्या पंखांपासून तयार केलेला मुकुट अर्पण करण्यात आले. त्याने इस्तपालपा येथून पुष्पाच्छादित रस्त्यांवरून शहरात प्रवेश केला.
स्पॅनिश लोकांचे राजधानीत स्वागत करून त्यांना सुवर्ण अर्पण करण्यात आले. ॲझटेकच्या सम्राटाला मात्र हा स्वागत सोहळा चुकीचा वाटत होता. ॲझटेकचा सम्राट आलेल्या स्पॅनिश लोकांना दूर ठेवण्याच्या प्रयत्नात होता. कोर्टीसच्या मागोमागच स्पॅनिश सैन्य येत असल्याची माहिती त्याला मिळाली होती. तेव्हा शहराचे एका मजबूत सैन्यदलापासून बचाव करणे अवघड आहे हे त्याला समजलेच होते. त्याला त्याच्या शहराच्या विनाशाची भीती होती. कोर्टीसने लवकरच सम्राट मॉन्टेझुमाला अटक केली आणि स्पॅनिशांनी टेनोचिट्लान उ*द्धवस्त करायला सुरुवात केली.
टेनोचिट्लानमध्ये अफाट खजिना होता. मॉन्टेझुमाकडे सोन्याचे दोन गळपट्टे (कॉलर्स) आणि सोन्याचेच एक मोठे मगरीच्या डोक्यासारखे मुकुट होते. इतर शिल्पांच्या बरोबरीने सोन्याने बनलेल्या पक्षांच्या प्रतिकृती होत्या. हे सर्व साहित्य मौल्यवान रत्नांनी सजवले होते. तेथे १०० औंस इतके मौल्यवान धातू, सोने आणि चांदी दोन्हीपासून वेगवेगळ्या आकारात बनवलेली चाके होती. मिळालेली लूट आपापसांत वाटून घेण्यासाठी कोर्टीस आणि त्याच्या सैन्याला तीन दिवसांपेक्षा जास्त काळ गेला.
पुढच्या काही महिन्यांतच या राजधीनीतील लोकांना वसाहतवाद्यांच्या भयानक अ*त्याचारांना सामोरे जावे लागले. अझ्टेक साम्राज्याच्या खजिन्याबद्दल नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेकडो लोक मरण पावले. त्यांच्या कथित “दैवत्वामुळे” स्पॅनिश लोक मुक्त हस्ते काहीही करू शकत होते. १५२० सालच्या मे महिन्यात स्पॅनिश विजेत्यांनी टॉक्सकॅटलच्या सणादरम्यान हजारो अझ्टेक खानदानी आणि यो*द्ध्यांची हत्या केली.
हा सण तेझकॅटलिपोकाच्या देवाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असे. स्पॅनिश लोकांनी मुख्य मंदिरात नागरिकांना बंद करून प्रचंड क*त्तल घडवून आणली. हे ह*त्याकांड मानवी इतिहासातील सर्वांत क्रू*र ह*त्याकांडांपैकी एक आहे. या ह*त्याकांडामुळे विजयी लोकांच्या हुकूमशाही राजवटीविरुद्ध बंड पेटले.
ॲझटेक फाईटबॅक
संपूर्ण शहराने वेढलेल्या स्पॅनिश लोकांनी मोंटेझुमाला ओलिस म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला. स्पॅनिश लोकांनी किंवा ॲझटेकच्या लोकांनी दगडफेक करून सम्राटाला ठार मारले. तेनोचिट्लानवरील त्यांचा ताबा गमावल्याची जाणीव झाल्यावर स्पॅनिश लोक पळून जाऊ लागले. १ जुलै १५२० रोजी, स्पॅनिश लोकांनी लपत छपत पळ काढला.
शहरातील लोकांना याची खबर लागली आणि पळून जाणाऱ्या स्पॅनिश लोकांवर त्यांनी ह*ल्ला केला. स्पॅनिश लोकांनी लुटलेले मोठ्या प्रमाणावरील धन लोकांनी त्यांना ‘टेक्सकोको तलावा’मध्ये टाकण्यास भाग पाडले. एखादा माणूस मृतदेहांवरून कालवे ओलांडून जाऊ शकला असता, एवढे स्पॅनिश लोकांचे मृतदेह पाण्यामध्ये तरंगत होते. याच रात्रीला इंग्रजीमध्ये ‘द सॅड नाईट’ म्हटले जाते.
टेनोचिट्लानमध्ये त्या रात्रीनंतर खजिना कुठे गायब झाला हे एक गूढच आहे. ज्याठिकाणी स्पॅनिश लोकांनी जाताना तो खजिना टाकला होता त्याच ठिकाणी तो आहे असा काहींचा अंदाज आहे. अजूनही टेक्सकोको तलावांमधील सोने आणि खजिना मिळवण्यासाठी खाजगी खजिना शिकाऱ्यांनी आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. पण ते सगळे प्रयत्न विफल ठरले आहेत.
स्पॅनिशांचे आक्र*मण आणि खजिन्याचा शोध
‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ हे युरोपीय वसाहतवाद्यांच्या बाबतीत तंतोतंत खरं आहे. स्पॅनिश लोकांची एवढी क*त्तल होऊनही कोर्टीस १५२१ साली पुन्हा टेनोचिट्लानमध्ये आला आणि त्याने ते शहर ताब्यात घेऊन तेथील नवीन सम्राट कुआहटॉमॉकला कैद केले आणि याआधी त्यांनी लुटलेला खजिना नेमका कुठे आहे याची माहिती मिळवण्यासाठी त्याच्यावर अनन्वित अ*त्याचार केले. इतके अ*त्याचार सहन केल्यानंतर कुआहटॉमॉकने अत्यल्प प्रमाणातील खजिन्याची माहिती कोर्टीसला दिली. बाकीचा खजिना संपला आहे यावरच सम्राट कुआहटॉमॉक जोर देत होता.
एखाद्या व्यक्तीला खजिन्याबद्दल माहिती असेल अशा साध्या संशयावरूनही कोणावरही स्पॅनिशांनी अ*त्याचार केले. यामुळे त्यांना हा खजिना उत्तरेत कुठेतरी तलावात असल्याची माहिती मिळाली. कोर्टीसने सोने पुनर्प्राप्त करण्याच्या प्रयत्नात सुमारे ५ हजार तलाव शोधले, पण त्याला खजिना किंवा सोन्यासारखे काहीही सापडले नाही. अखेरीस स्पॅनिशांनी सिंचन वाहिन्यांमधून काही सोने पुनर्प्राप्त केले, असाही काहींचा दावा आहे. असा दावा करणाऱ्यांच्या मते, स्पॅनिशांनी खजिना युरोपात पाठवला पण तो खजिना समुद्रातच गहाळ झाला असावा.
अनेक शतकांनंतर मिळालेला सुगावा
यानंतर अनेक वर्षे या खजिन्याबद्दल कोणालाही सुगावा लागला नाही. पण मेक्सिको शहरात १९८१ साली एका बांधकाम कामगाराला सोन्याची वीट सापडली. या सोन्याच्या विटेचे वजन सुमारे साडेचार पौंड (दोन किलो) होते. ॲझटेक्सचा तो अफाट खजिना मेक्सिको भूमीच्या बाहेर गेला नाही या सिद्धांताचा हा एक सर्वोत्तम पुरावा असल्याचे मानले जाते. तर २०१९ साली पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी सापडलेली सोन्याची पट्टी मॉन्टेझुमाच्या खजिन्यातून असल्याचे निश्चित केले.
मेक्सिकोच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्थ्रोपोलॉजी अँड हिस्ट्री’ आणि ‘नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको’च्या संशोधकांनी सोन्याच्या या विटेचे विश्लेषण केले. सोन्याची रचना टेनोचिट्लानच्या मुख्य मंदिरातून सापडलेल्या इतर अवशेषांशी जुळते हे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले.
ॲझटेकचे स्थलांतर
कोस्टा रिकामधील एका आख्यायिकेनुसार, ॲझटेकच्या मुख्य धर्मगुरूंना कोर्टीस आणि त्याचे लोक लवकरच परत येतील याची पूर्ण कल्पना होती. पण सध्या तरी ते बाहेर आहेत याचा फायदा घेत त्यांनी मोंटेझुमाचा मृतदेह बाहेर काढला आणि त्यांच्या राजधानीतून बाहेर जाण्यास सुरूवात केली. सुमारे २ हजार ॲझटेक्सच्या लोकसंख्येने त्यांच्या पूर्वजांच्या अझ्टलान निवासस्थानाच्या शोधात उत्तरेकडे कूच केले. या प्रवासात, त्यांनी ॲझटेक सभ्यतेचा सर्व प्रचंड खजिना आपल्यासोबत घेतला.
चीकोमॉझटॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात लेण्यांचे डोंगर येईपर्यंत हे सर्व लोक उत्तर-पश्चिमेकडे चालत राहिले. चीकोमॉझटॉकच्या सात लेण्या सात अझ्टेक जमातींचे मूळ स्थान म्हणून ओळखल्या जातात. हे ठिकाण सुरक्षित आहे, असं गृहीत धरून त्यांनी गुलामांना मारले आणि तो खजिना तिथे पुरला गेला.
कोर्टीसनंतर १५२७ साली, फ्लोरिडामध्ये वसाहती आणि चौक्या स्थापन करण्यासाठी स्पेनमधूनच ‘नार्वेझ मोहीम’ निघाली. पण या मोहिमेचा शेवट अत्यंत दयनीय झाला. कारण सुरुवातीच्या ६०० लोकांपैकी फक्त चार माणसे वाचली होती. या चार माणसांमध्ये ‘एल्वार न्युझ काबेझा डी वाका’ आणि ‘एस्टेबान डोरान्तेस’ नावाचा गुलाम यांचा समावेश होता.
न्यू स्पेनला परत आल्यांनतर वाचलेल्या या लोकांनी फ्लोरिडामधील शहरे आणि श्रीमंतीचे किस्से सांगितले. यानंतर कोरोनॅडो न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात दिसणाऱ्या सोन्याच्या कल्पित सात शहरे शोधण्यासाठी निघाला. कोणतीही सोन्याची शहरे नाहीत आणि तेथे सोने नाही हे कॉरोनॅडोला तिथे पोहोचल्यावर समजले. परंतु या प्रदेशातील आदिवासी समुदाय अजूनही हजारो अनोळखी लोकांनी अफाट संपत्ती बाळगल्याची चर्चा करतात.
ही आख्यायिका मॅक्सिकोमधून खजिना बाहेर गेल्याचे दर्शवते असा काही लोकांचा विश्वास आहे. उत्तरेकडे जाणाऱ्या संपत्तीची कथा कदाचित खोटी आहे असे पुरातत्त्वशास्त्रज्ञ थॉमस गॅनच्या एका दाव्याने सूचित केले. त्यांच्या मते खजिना उत्तरेऐवजी दक्षिणेकडील ग्वाटेमालाकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. पण, अनेकांनी पौराणिक कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे खजिना दक्षिण-पश्चिम युनायटेड स्टेट्समध्ये स्थित असल्याचे मानले, ग्रँड कॅनियन, यूटा आणि एरिझोना या दंतकथांमध्ये सर्वात प्रमुख जागा आहेत.
ग्रँड कॅनियन आणि ॲझटेकचा खजिना
कालांतराने, १८६७ साली जेम्स व्हाईट ग्रँड कॅनियनचे तीव्र उतार पार करण्यात यशस्वी झाला. भूक आणि तहानेमुळे व्याकुळ झालेल्या व्हाईटने घनदाट जंगलातून प्रवास सुरु केला. रियोव्हिलच्या मॉर्मन शेती वस्तीत आल्यानंतर, त्याने एका कसोटीदरम्यान एका गुहेत आश्रय घेतला होता, हे त्याला लक्षात आले.
या गुहेत त्याने सोनेरी अवशेष, प्रचंड मूर्ती, चांदी आणि रत्ने दोन्ही भरपूर प्रमाणात पाहिल्या आहेत. त्याची कथा सार्वजनिक माध्यमांमध्ये आल्यानंतर, एका स्थानिक पत्रकाराने त्याला अझ्टेक कलाकृतींची चित्रे दाखवली आणि व्हाईटने अशाच प्रकारच्या वस्तू पाहिल्याचा त्याने दावा केला.
गोल्ड रश
कोर्टीस प्रमाणेच पायूटच्या मदतीशिवाय लोक खजिना असलेली गुहा शोधू लागले. यानंतर त्यांच्या या शोधाच्या संघर्षाची कथा त्यांनी ‘सॉल्ट लेक मायनिंग रिव्यू’मध्ये प्रकाशित केली आणि सुरु झालं सुप्रसिद्ध ‘गोल्ड रश’. पण हे सर्वच व्यर्थ होते. कारण या लोकांना ना खजिना सापडला, ना कोणती गुहा! त्यानंतर या सर्व भागाचा भूगोल ‘हूवर’ धरणामुळे बदलला आहे. तरी काही लोकांच्या मतानुसार, ही गुहा मिड लेकच्या खाली असेल.
जे लोक उटाच्या विश्रांतीच्या स्थानास अनुकूल आहेत ते १९२० मधील फ्रेडी क्रिस्टल नावाच्या एका खाणकामगाराच्या खजिना शोधण्याच्या कल्पित प्रयत्नांवर प्रकाश टाकतात. क्रिस्टल मेक्सिको सिटीमध्ये होता आणि एका दस्तऐवजाच्या आधारे त्याने जुन्या चर्चचा शोध घेतला.
हा दस्तऐवज म्हणजे एका स्पॅनिश भिक्षूने लिहिलेले हस्तलिखित होते. यामध्ये एक नकाशा होता. हा नकाशा एका ॲझटेकच्या नागरिकाने दिला होता, किंबहुना स्पॅनिश लोकांनी तो त्याच्याकडून छळ करून काढून घेतला होता. अमेरिकेच्या भूगोलाची काहीही कल्पना नसल्याने स्पॅनिश लोक खजिना मिळवण्यात अयशस्वी झाल्याचेही या दस्तऐवजात सांगण्यात आले होते.
१९४८ साली मॉरीन व्हिपलने ‘द सेटरडे इव्हिनिंग पोस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणावर एक उल्लेखनीय लेख लिहिला, तेव्हा फ्रेडी क्रिस्टल आणि यूटा अझ्टेक गोल्ड रशची कथा प्रसिद्ध झाली. या कथेचे आधुनिक स्वरूप व्हिपलने आपल्या लेखात लिहिल्याप्रमाणेच आहे. यामध्ये बूबी ट्रॅप्स आणि अवशेषांसारख्या अलंकार आहेत.
मेक्सिकन-अमेरिकन यु*द्धादरम्यान, डॉन जोआक्विन नावाच्या एका उच्चवर्गीय माणसाने सिएरा इस्ट्रेला या ठिकाणी अपाचे जमातीच्या गुलामांना बरोबर घेऊन खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याने या गुलामांनी ॲरिझोनाच्या नैऋत्य दिशेस असलेल्या फिनिक्स याठिकाणी खोदकाम केले. डॉन जोआक्विन या सगळ्या प्रदेशातून बाहेर पडण्यापूर्वी, अमेरिकन सैन्याच्या हस्तक्षेपामुळे गुलामांमध्ये बंडखोरी झाली. यानंतर एक माणूस कथा सांगण्यासाठी जिवंत राहिला आणि त्याने १८८० च्या दशकात खजिना परत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अपयशी ठरला. कारण हे क्षेत्र अजूनही अपाचे जमातींच्या आदिवासींद्वारे नियंत्रित होते.
अजूनही त्याचा शोध सुरूच आहे..
या खजिन्यासाठी इतर अनेक ठिकाणे सुचवण्यात आली आहेत, ज्यामध्ये कासा ग्रांडे, आणि एरिझोना मधील ‘मोंटेझुमा किल्ल्याचा’ उल्लेख सॅन दिएगोमधील सुपरस्टीशन पर्वतरांगा, टेक्सासमधील डेल रिओ आणि अगदी इलिनॉय आणि केंटकी या स्थानांसह केला गेला आहे. पण अजूनही या खजिन्याचा काहीही पत्ता लागला नाही. कित्येक शतकांपूर्वी स्पॅनिश लोकांनी कालव्यांमध्ये टाकलेला हा खजिना नेमका अशा कोणत्या ठिकाणी आहे, ज्याचा शोध अजूनही कोणी लावू शकला नाही?!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.