या ८०० वर्ष जुन्या मशिदीला “अढाई दिन का झोपडा” का म्हणतात…?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


बहुचर्चित बाबरी मशिदीच्या निकालावर बोलताना सुप्रीम कोर्टाने एके ठिकाणी म्हटले आहे,

“या जागेवर फार काळापूर्वी राम मंदिर होते. या ठिकाणी उत्खनन केले असताना अनेक प्रकारची हिंदू चिन्हे तिथे गाडली गेलेली पुरातत्व खात्याला सापडलेली आहेत. शंख, चक्र, लिंग, पद्म अशा प्रकारची चिन्हे कोरलेले उध्वस्त खांब, ओंकाराची नक्षी असलेल्या विटा तेथून हस्तगत केलेल्या आहेत. या जागेवर मशिदीच्या पूर्वी अनेक वर्षांपासून राम मंदिर होते याविषयी जितके पुरावे समोर आलेले आहेत ते पाहून आमची खात्री पटलेली आहे.”

जिथे पूर्वी मंदिर होते तिथे नंतर मशीद झाली हे असे उदाहरण फक्त बाबरी मशीदबाबतच भारतामध्ये घडलेली नाही अशा दुसर्‍या देखील अनेक मशिदी भारतामध्ये आहेत ज्यांच्या जागी पूर्वी देवळे उभी होती. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतावर सतत झालेली मुस्लिम आक्रमणे.

भारतात मुस्लीम आक्रमणांचा इतिहास जवळपास 1 हजार वर्षे इतका जुना आहे. या मुस्लिम आक्रमणांचा खूप मोठा तोटा भारतीय शिल्पकलेला आणि वास्तूकलेला झाला.

आपल्या पुरातन वास्तू, मंदिरे, पुरातन चित्र शैली असलेल्या देखण्या इमारती या परकीय आक्रमणांमध्ये उध्वस्त झाल्या.

यामध्ये अनेक प्रकारची देवळे एक तर उद्ध्वस्त केली गेली किंवा त्या देवळांचे मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आले.

महंमद घोरी भारतावर 11व्या शतकामध्ये हल्ला करून परकीय आक्रमणाची सुरुवात केली. या घोरी बद्दल एक गोष्ट सांगितली जायची. जिथे कुठे घोरीला एखादे सुंदर मंदिर दिसले की तो ते मंदिर पाडून तेथे मशीद बांधण्याची आज्ञा देत असे. याच घोरीच्या कार्य काळामध्ये भारतातील अत्यंत सुंदर हिंदू देवतांची मंदिरे उध्वस्त करून किंवा अर्धवट पाडून त्या ठिकाणी मशिदी बांधल्या गेल्या.

अशा भरपूर मशिदी आज भारतामध्ये उभ्या आहेत त्यापैकीच एक मशीद म्हणजे राजस्थानच्या अजमेरमधली “अढ़ाई दिन का झोपड़ा” या नावाने ओळखली जाणारी मशीद.

या मशिदीचा इतिहास विवादास्पद आहे. ही मशीद म्हणजे मूळचे एक संस्कृत विश्वविद्यालय होते. इथे राजस्थान आणि अन्य राज्यातून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत. या संस्कृत विद्यालयाचे नाव होते “सरस्वती कंठभरण संस्कृत विश्वविद्यालय”.

याच विद्यालयामध्ये एक विष्णूचे सुंदर मंदिर देखील उभारण्यात आले होते. विष्णू मंदिराशिवाय माता सरस्वती आणि माता लक्ष्मीचे मंदिर देखील या विश्वविद्यालयाच्या आवारामध्ये उभारण्यात आले होते.

या देखण्या वास्तूची निर्मिती दहाव्या शतकामध्ये झालेली होती असे म्हणतात. याची निर्मिती विग्रहराज विशाल देव चव्हाण या हिंदू शासकाने केलेली होती.

जेंव्हा मोहम्मद घोरीचे भारतावर आक्रमण झाले तेंव्हा त्याला पृथ्वीराज चौहानने प्रचंड शिकस्त देण्याचा प्रयत्न केला पण दुर्देवाने पृथ्वीराज चौहानला घोरीने हरवले. त्यानंतर मुस्लिम शासकांचा भारतामध्ये मुक्त प्रवेश झाला.

भारतीय संस्कृतीला ग्रहण लागले.

पृथ्वीराजला हरवल्यानंतर त्याच्या राज्याची राजधानी असलेल्या अजमेरच्या गडावर घोरीने हल्ला केला आणि तो प्रदेश जिंकून घेतला. प्रदेश जिंकल्यानंतर नेहमीप्रमाणे राजपूत स्त्रियांनी जोहार करून मृत्यूला कवटाळले. जे जिवंत राहिले त्यांना कैद करण्यात आले. आजूबाजूचा प्रदेश उद्ध्वस्त करण्यात आला.

त्यावेळी या घोरीची नजर सरस्वती कंठभरण संस्कृत विद्यालयाच्या वास्तूवर पडली. त्याला ती वास्तू डोळ्यामध्ये खूपली. त्याने आपला सेनापती कुतुबुद्दीन ऐबकला आज्ञा केली की, या ठिकाणी ही वास्तू पाडून मशिदीचे निर्माण करण्यात यावे.

आपल्या सेनापतीला आज्ञा देऊन घोरी आपल्या पुढच्या आक्रमणासाठी निघून गेला. पाठीमागे राहिलेल्या त्याच्या सेनापतीने म्हणजेच कुतुबुद्दीन ऐबकने ही वास्तू पाडून त्या ठिकाणी मशिदीचे निर्माण करावयास सुरुवात केली.

याबाबत एक आख्यायिका अशी प्रचलित आहे की, घोरीने साठ तासांच्या आत या ठिकाणी मशीद उभी राहिली पाहिजे असा आदेश आपल्या सेनापतीला दिला होता. त्याच्या आदेशाचे पालन करावयाचे म्हणून रात्रंदिवस मजूर कामाला लागले. यामधले बहुसंख्य मजूर हे कैद केलेले हिंदू लोक होते.

साठ तास म्हणजेच अडीच दिवसांमध्ये संपूर्ण विश्वविद्यालयाची वास्तू पाडून तिथे मशीद उभी करणे शक्य नव्हते. त्यामुळे मजुरांनी फक्त वरचे छत काढून तिथे मशिदीचे गोल घुमट बांधले.

नमाज अदा करण्यासाठी वास्तु मधल्या मंदिरांची आणि शाळेची तोडफोड करून पटांगण उभारण्यात आले. सर्वसाधारणपणे जुन्या वास्तूची जितकी होईल तितकी तोडफोड केली पण तरीही त्यांना पूर्ण वास्तू पाडणे शक्य झाले नाही.

मूळच्या हिंदू पद्धतीच्या वास्तूमध्ये मशिद बसवण्याचा फक्त प्रयत्न करण्यात आला.

या वास्तूला दोन प्रवेशद्वारे आहेत. वास्तूच्या चारही बाजूला मोठे स्तंभ उभा करण्यात आलेले आहेत. या मशिदीमध्ये एकूण 124 खांब आहेत त्यापैकी 70 खांब हे सुस्थितीमध्ये आहेत तर बाकीचे ढासळलेले आहेत.

इथे जुन्या भिंतीवर मंदिरांचे अवशेष स्पष्ट दिसतात. भिंती खरवडून त्यावर कुराणामधील आयता लिहिण्यात आलेल्या आहेत.

जरी ही वास्तू आज मशिद म्हणून ओळखली जात असली तरी इथला हिंदू वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा ठसा मात्र कायम आहे त्यामुळे आत गेल्यानंतर आपण एखाद्या जुन्या मंदिरामध्ये आल्याचा भास पर्यटकांना होतो.

अगदी नव्वदच्या दशकामध्येसुद्धा या मशिदीच्या आवारामध्ये अनेक हिंदू देवतांच्या मूर्ती इकडेतिकडे इस्ततः विखुरलेल्या दिसायच्या. या सर्व मूर्त्यांना हलवून नंतर एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे.

ही राजस्थानमधली पहिली मशीद तर भारतातील दुसरी पुरातन मशीद मानली जाते.

या मशिदीची निर्मिती 1199 साली झाले असे मानतात. म्हणजे या मशिदीला जवळपास 800 वर्षे पूर्ण होत आलेली आहेत असे म्हणायला हरकत नाही. या मशिदीच्या आत गेल्यानंतर डाव्या बाजूला एक शिलालेख लिहिलेला आढळतो. त्यावर या वास्तूचे निर्माण कसे झाले याविषयी माहिती लिहिलेली आहे.

त्यात या जागी पूर्वी संस्कृत विद्यालय होते याचा स्पष्ट उल्लेख येतो. या मशिदीमध्ये चांगल्या स्थितीत शिल्लक असलेल्या 70 खांबावर हिंदू पद्धतीची कलाकुसर तसेच धार्मिक चिन्हे देखील आढळतात.

अजमेरचा मोईउद्दिन चिश्तीचा दर्गा तर सुप्रसिद्धच आहे. त्यानंतर या “अढ़ाई दिन का झोपड़ा”ला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. भारतीय पुरातत्त्व खात्याने ही मशीद संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली आहे.

अजमेरच्या दुसऱ्या दर्ग्याप्रमाणे येथे कुठल्याही प्रकारचा धार्मिक उत्सव सध्या भरत नाही. पर्यटक फक्त या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत राहतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!