केजीएफमध्ये सांगितलेलं एल डोराडो शहर खरंच अस्तित्वात होतं का..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘केजीएफ’ हा कन्नड सिनेमा काही दिवसांपूर्वी येऊन गेला, जबरदस्त ऍक्शन आणि बेजोड तांत्रिकी काम, यामुळे हा सिनेमा अनेकांचा पसंतीस उतरला, हा सिनेमा कर्नाटकातील एका सोन्याच्या खाणीच्या भोवताली सुरू असलेल्या राजकारणावर आधारलेला आहे.

याच खाणीच्या संदर्भात त्या चित्रपटात ‘एल डोराडो – द लॉस्ट सिटी ऑफ गोल्ड’चा उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपटाचे कथानक जरी काल्पनिक असले तरी त्यात सोन्याचे हरवलेले शहर म्हणून ज्या ‘एल डोराडो’ चा उल्लेख करण्यात आला आहे, ते शहर एकेकाळी दक्षिण अमेरिका खंडात अस्तित्वात होते, असं मानलं जातं.

१६ व्या व १७ व्या शतकातील अनेक खलाशानी या लुप्त झालेल्या सोन्याच्या शहराच्या शोधात आपले आयुष्य खर्ची घातले होते.

‘एल डोराडो’ आणि त्याच्याशी निगडित इतिहासावर आपण आता नजर टाकूया…

मनुष्याला आधीपासूनच सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंचे प्रचंड आकर्षण राहिले आहे. सोन्याच्या आणि संपत्तीच्या शोधात मनुष्याने अनेक समुद्र ओलांडले आहेत, अनेक डोंगरऱ्या, कच्चे रस्ते पायदळी तुडवले आहेत. एल डोराडो हा देखील या सोन्याप्रती मानवी आकर्षणाचा एक महत्वाचा भाग आहे.

असं म्हणतात की दक्षिण अमेरिकेत एक एल डोराडो नावाचे गुप्त शहर आहे. कधी काळी हे शहर सोन्याच्या खाणींनी आणि मौल्यवान रत्नांनी भरलेलं होतं, पण एकाएकी ते लुप्त झालं आणि त्याच्या शोधयात्रा सुरू झाल्या. आजही लोक या सोन्याच्या शोधात आहेत.

१५३०च्या आसपास दक्षिण अमेरिकेच्या मुएस्का या जमातीत एक विचित्र प्रथा होती, या प्रथेच्या अनुष्ठानात त्या जमातीच्या नव्या राजाला नखशिखांत सोन्याने सजवले जायचे आणि जवळच्याच पवित्र गुआटाविटा या नदीत जिवंत फेकले जायचे.

असं म्हणतात की हे आदिवासी राहायचे त्याचा आसपासच्या प्रदेशात सोन्याच्या असंख्य खाणी होत्या. या खाणींमुळे इथल्या लोकांना धार्मिक अनुष्ठानासाठी विपुल सोने उपलब्ध होत असे. ज्या व्यक्तीची अनुष्ठानासाठी निवड व्हायची त्याला संपुर्णपणे नग्न करून त्याच्या शरीराला सोन्याच्या धातूंनी नखशिखांत मढवले जायचे.

या अनुष्ठानासाठी लोक आपल्या सोन्याचे दागिने एकत्र जमा करायचे. त्या व्यक्तीला घेऊन नदीच्या किनाऱ्याहुन तिच्या मधोमध आणले जायचे, तर नदीच्या दुसऱ्या बाजूला उभे असलेले आबालवृद्ध मोठी चिता जाळून सूर्याचा प्रकाश झाकोळला जाईल असा प्रकाश निर्माण करायचे, अशी मान्यता आहे.

या अनुष्ठानासाठी चार धर्मगुरू यायचे, या धर्मगुरूंच्या अंगावर पण सोने चढवलेले असायचे. ते संपूर्ण नग्न असायचे, ते त्या व्यक्तीला नदीच्या मध्यभागी घेऊन गेले तर एक झेंडा उंच करून सर्वांना अनुष्ठान सुरू होत आहे अशी सूचना करायचे.

मग काही काळाने सगळे नदीत उड्या मारायचे, हे सर्व करण्याचा मागे राष्ट्राला सामर्थ्यवान राजा मिळावा अशी लोकांची धारणा होती. मुएस्का साम्राज्यात हे अनुष्ठान अनेक शतके केलं जात होतं.

हे अनुष्ठान केल्याने सोन्याच्या नवीन खाणींचा शोध लागतो असा देखील या जमातीचा समज होता.

या लोकांना सोन्यावर प्रचंड प्रेम होते. सोने हा धातू दैवी शक्तीतून निर्माण झाला आहे असं या लोकांचं मत होतं, त्यामुळे सोने बाळगणे हे लोक शुभ मानायचे. त्यांनी सोन्याचे नगर वसवले होते.

मंदिर, त्याचे शिखर, मोठंमोठे खांब सोन्याने बनवले होते अथवा सोन्याचे आवरण चढवले गेले होते. हे लोक प्रचंड सोने परिधान करायचे, अशी देखील माहिती त्यांच्या इतिहासातून प्राप्त होते.

मग हे सोने अचानक एकाएकी कुठे गेले?

तर अनेक लोक म्हणतात की एल डोराडोच्या नगरात हे सोने आहे आणि गेल्या अनेक शतकांपासून त्याचा शोध युरोपियन खलाशी घेत आहेत. एल डोराडो या शब्दाचा अर्थ उर्जावान असा होतो. अनेक लोक याला स्वर्गाचा समानार्थी शब्द मानतात.

एल डोराडोची कथा ही फक्त पौराणिक नसून त्यावर इन्का आणि इतर दक्षिण अमेरिकन संस्कृतींचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे अनेकांना हे सोन्याची पंढरी असलेलं शहर शोधून काढायचं असतं.

इतिहासात शेकडो लोकांचे दाखले आहेत, जे या एल डोराडोच्या स्वर्णनगरीच्या शोधासाठी झटले आहे. अनेकांनी यात आपला जीव देखील गमावला आहे. अनेकांनी यासाठी आपली सर्व संपत्ती खर्च करून भविष्यात भिक मागितली आहे. अनेकांना तर या भागात मिळणाऱ्या फुल्स गोल्ड या सोने सदृश्य धातूने गंडवले आहे.

एल डोराडोच्या शोधात फ्रान्सच्या फ्रान्सिस्को डे ओरेलाना आणि गोंजारो पिजारो या दोन साहसी खलाशांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे खर्च केली आहेत. त्यांनी रियो नेपोच्या समुद्र किनाऱ्याहुन अमेझॉनच्या घनदाट निर्मनुष्य जंगलात या स्वर्ण नगरीच्या शोधात प्रवास केला आहे. या प्रवासात त्यांना मिळालेल्या अनेक प्राणी, वनस्पतींची माहिती त्यांनी लिहून ठेवली आहे.

मागच्या अनेक शतकांपासून एल डोराडोच्या सोन्याच्या खाणीचे गूढ कायम आहे. अजूनही लोक त्या स्वर्ण नगरीचा शोध घेत आहेत. यावर अनेक पुस्तकं, थरारकथा आणि चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. इंग्रजीतील अनेक साहित्य रचनांमध्ये एल डोराडोचा उल्लेख आढळून येतो.

मिल्टनचं पॅराडाईज लॉस्ट, व्होल्टेयरचं कॅन्डीडे यात याचा उल्लेख करून ठेवला आहे. एडगर ऍलन पो याच्या रचनेचे नावच ‘एल डोराडो’ आहे. कार्ल बर्क्सच्या ‘गिल्डेड मॅन’मध्ये देखील ‘एल डोराडो’वर आधारित एक पात्र आहे. वेर्नर हेरजोगच्या ‘एगुएर’मध्ये पण एल डोराडोचा उल्लेख आढळून येतो.

२००० साली यावर एका अनिमेटेड चित्रपटाची देखील निर्मिती करण्यात आली आहे. २००७ साली निकोलस केज या अभिनेत्याचा नॅशनल ट्रेझर या ब्लॉकबस्टर चित्रपटात देखील एल डोराडोचा मूळ कथानकाशी संबंध जोडला आहे.

आता केजीएफच्या रूपाने एल डोराडोच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!