आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
एखादी महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यानंतर आपण सगळ्यांत आधी ती अपेक्षेप्रमाणे नीट काम करते की नाही याची चाचपणी करतो, तसं नसेल तर ती वस्तू आपण स्वीकारत नाही. पण एखाद्या गाडीच्या बाबतीत असं झालं तर?
सुरुवातीच्या काळात मोटार कार ही प्रचंड मौल्यवान वस्तू होती, ज्यावेळी पहिल्यांदा कार्स बाजारात आल्या तेव्हा तर अगदी काहीच जणांना कार घेणे परवडत होते. कारण त्यावेळी उत्पादनक्षमता कमी असल्याने कार्सच्या किंमती गगनाला भिडलेल्या असत, शिवाय त्यावेळी कार लोनसारखा प्रकार अस्तित्वात नव्हता.
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका इंजिनिअरने एकदा अशीच कार खरेदी केली. त्याला पाहिजे तशी ती कार नसल्याने तो निराश झाला, पण या निराशेवर मात करून त्याने स्वतःच पाहिजे तशी कार तयार करण्याचा निर्णय घेतला. काही दिवस काम केल्यानंतर त्याने त्याच्या अपेक्षेप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण कार तयार केली.
बघता बघता या इंजिनिअरने स्वतः तयार केलेल्या कारची खबर इंग्लंडमधील एक मेकॅनिक आणि व्यावसायिक असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचली आणि त्या दोघांनी मिळून अशा कार्स तयार केल्या, ज्या सुमारे शतकभरानंतरही निर्विघ्नपणे चालतात. त्या अवलिया इंजिनिअरचे नाव हेनरी रॉयस आणि त्याची कामगिरी पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या उद्योजकाचे नाव चार्ल्स रोल्स. या दोघांनी पुढे रोल्स रॉयस नावाचे व्यावसायिक साम्राज्य उभे केले.
१९०४ साली रोल्स-रॉयसने १० हॉर्सपॉवर क्षमता असलेली कार तयार केली. ही कार ट्वीन-सिलिंडर होती, थोडक्यात दोन इंजिन्सच्या मदतीने ती चालत असे. १९०५ साली ही कार सी. एस. रोल्स अँड कंपनीमार्फत ३९५ युरोजना विकली जात असे.
१९०६ साली तयार करण्यात आलेली रोल्स रॉयस सिल्व्हर घोस्ट ही कार कंपनीसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरणार होती. १९०७ साली होणाऱ्या स्कॉटिश रिलायबिलिटी टेस्टसाठी खास ही कार तयार करण्यात आली होती. कारने स्कॉटिश टेस्ट्स यशस्वीरीत्या पार केल्या. त्यानंतर याच कारची आणखी एक टेस्ट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही टेस्ट मात्र कोणत्याही कारसाठी अवघड होती.
या टेस्टमध्ये एकूण २४ हजार किलोमीटरच्या २७ ट्रिप्सचा समावेश होता, जी लंडन आणि ग्लासगो या दोन मोठ्या शहरांदरम्यान घेण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिल्व्हर घोस्ट या रोल्स रॉयसने तयार केलेल्या कारने या सगळ्या टेस्ट्स कोणतीही समस्या न उद्भवता यशस्वीपणे पार केल्या. यानंतर ‘रोल्स रॉयस सिल्व्हर घोस्ट’ला जगातील सर्वोत्तम कार म्हणून मान्यता मिळाली.
रोल्स रॉयस सिल्व्हर घोस्ट या कार्स आजही, सुमारे १०० वर्षांनंतरही फक्त टिकूनच नाहीत तर व्यवस्थित चालत देखील आहेत. एवढंच नाही तर रोल्स रॉयस कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीने तयार केलेल्या एकूण कार्सपैकी ६५% कार्स आजही निर्विघ्नपणे रस्त्यांवर धावू शकतात.
कंपनीच्या या इतिहासामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच ग्राहकांच्या मनात आपली प्रतिमा उंचावली आहे. अलवारच्या महाराजांना त्यांच्या साध्या कपड्यावरून बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रसंग सोडला तर स्वातंत्र्यपूर्व भारतातही रोल्स रॉयसला चांगली मागणी असल्याचे दिसून येते. भारतातील सुमारे २०० राजांकडे २००० रोल्स रॉयस होत्या.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.