आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
दोन महायु*द्धांत जगाचे फार मोठे नुकसान झाले. दुसऱ्या महायु*द्धात तर फक्त कोण्या देशाचेच नाही तर, अ*णुबॉ*म्बमुळे संपूर्ण मानवतेचेच नुकसान झाले असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरणार नाही. दुसऱ्या महायु*द्धानंतर युनायटेड नेशन्सची स्थापना झाली, पण व्हिएतनाम यु*द्ध, भारत-चीन यु*द्ध, भारत-पाकिस्तान संघर्ष, अरब आणि इस्रायलमधील संघर्ष, नॉर्थ आणि साऊथ कोरियामधील संघर्ष, रशिया-युक्रेन यु*द्ध, रशिया आणि अमेरिकेचे शीतयु*द्ध म्हणा किंवा सुप्त संघर्ष म्हणा, अशा अनेक बाबतींत संयुक्त राष्ट्र संघ कर्तव्य बजावण्यात कुठेतरी मागे पडताना दिसत आहे.
जगभरातील सरकारे आपापल्या सैन्याच्या आधुनिकीकरणावर आणि श*स्त्रास्त्रांवर प्रचंड पैसा खर्च करत होती, देशाचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी ते करणं क्रमप्राप्तच होतं, पण फक्त “माझ्या मित्राकडे किंवा शत्रूकडे बॉ*म्ब आहे म्हणून मला पण बॉ*म्ब पाहिजे, मग देशातल्या नागरिकांना गवताची पाती आणि पानं खावी लागली तरी बेहत्तर” किंवा “माझी मिसाईल तुझ्या मिसाईलपेक्षा मोठी” असे पोरकट दृष्टिकोन ठेऊन अ*ण्व*स्त्रसज्ज होणारे अनेक देशही आहेत.
मध्यंतरी नेहरू सरकारमध्ये भारतीय सैन्य बंद करण्याच्या चर्चा सुरु होत्या. पण आपल्या उरावर एक नाही तर दोन शत्रू असताना असा विचार देखील करणे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे, आदर्शवादाच्या चुकीच्या दृष्टिकोनातून सैन्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने कशी परिस्थिती ओढावते याची प्रचिती भारताला १९६२ साली आली. शत्रू सहवासात असूनही, सैन्य न ठेवल्यास काय गत होते याचे उत्तम उदाहरण तिबेट.
असं असलं तरी विनाकारण, गरज नसल्यास अ*ण्वस्त्र*सज्ज किंवा शस्त्रास्त्रसज्ज होण्याचा मूर्खपणा न दाखवणारी अनेक राष्ट्रे जगात आहेत.
पण ज्याठिकाणी अजिबात गरज नाही त्या देशांनी सैन्यावरील खर्च कमी करून तो इतर गोष्टींसाठी वापरणं निश्चितच कौतुकास्पद आहे. असे सुमारे तीस देश आजमितीस जगात आहेत. त्यांपैकी काही देशांचा आढावा आज आपण घेणार आहोत. या तीसपैकी १५ असे देश आहेत ज्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची शस्त्रसज्जता किंवा शस्त्रधारी लोक नाहीत, ६ असे आहेत, ज्यांच्याकडे अतिशय मर्यादित प्रमाणात सैन्य आहे, आणि ९ असे देश आहेत, जे कोणत्यातरी एका मुख्य देशाचाच भाग आहेत, आणि ते सैन्यासाठी त्या मुख्य देशावरच अवलंबून असतात.
१. मार्शल आयलँड्स:
पॅसिफिक महासागरात वसलेल्या रिपब्लिक ऑफ मार्शल आयलँड्समध्ये जेमतेम ५ लाख लोक राहतात. या देशाचे आणि अमेरिकेचे अतिशय जवळचे संबंध असून आपल्या सुरक्षिततेसाठी ते पूर्णतः अमेरिकेवरच अवलंबून आहेत.
२. नौरू
मार्शल आयलँड्सप्रमाणेच नौरू हा देशसुद्धा पॅसिफिक महासागरातच वसला असून याचे क्षेत्रफळ फक्त २१.३ स्क्वेअर किलोमीटर इतकेच आहे. नौरू देशाबद्दल आपण याआधीही वाचलं असेल. येथील रहिवाशांची एकूण संख्या सुमारे ११,५०० असून हा देश आपल्या सुरक्षेसाठी ऑस्ट्रेलियावर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाच्या मदतीने याठिकाणी एक लहानसे पोलीस दल देखील आहे, जे येथील नागरिकांच्या साहाय्याने चालवले जाते.
३. व्हॅटिकन सिटी:
केवळ ०.४९ स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा देश रोम शहराच्या बरोबर मधोमध वसला आहे. हा जगातील सर्वांत लहान देश असून यामध्ये फक्त ६०० लोक राहतात. ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू, ज्यांना पोप असेही म्हटले जाते, त्यांचे वास्तव्य याच देशात असते. त्यांच्या आणि व्हॅटिकन सिटीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी सुप्रसिद्ध स्विस गार्ड्सवर असते. शहराच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र इटलीवर आहे.
४. कोस्टा रिका:
दक्षिण आणि उत्तर अमेरिका खंडांना जोडणाऱ्या कोस्टा रिकाकडे स्वतंत्र, मोठं सैन्य दल नसलं तरी अतिशय मर्यादित स्वरूपातील सैन्य आहे. डिसेंबर १९४८ पासून त्यांनी सैन्यावर बंदी आणली. तेथील संविधानानुसार जेव्हा गरज पडेल तेव्हा मात्र सैन्य पुन्हा उभारण्याची मुभा देण्यात आली आहे. तिथे आजवर असं दोन वेळा घडलंय.
५. आईसलंड:
युरोपच्या सुदूर उत्तरेला वसलेल्या आइसलँडमध्येही १८६९ पासून सैन्यावर बंदी आहे. असं असलं तरी आइसलँडच्या थोड्या फार असलेल्या सैन्याने काही आंतरराष्ट्रीय लढायांमध्ये सहभाग नोंदवला आहे. NATO (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन)चा सदस्य देश असल्याने या देशाच्या कोस्ट गार्ड (तटसंरक्षक दलाचे) काही भाग २००३ साली इराकमध्ये तैनात करण्यात आले होते.
६. ग्रीनलँड:
उत्तर अमेरिकेच्या उत्तरेला आणि युरोपच्या वायव्येला असलेला भलामोठा, २० लाख स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश म्हणजे ग्रीनलंड. याठिकाणी प्रचंड थंड हवामानामुळे जेमतेम ६० हजार लोक राहतात. या देशाचे परराष्ट्र धोरण आणि सैन्य या बद्दलचे निर्णय डेन्मार्कचे सरकार घेते. २००९ पासून मात्र ग्रीनलंडच्या कोस्ट गार्डचे नियंत्रण ग्रीनलँडच्या सरकारकडे आहे. ग्रीनलंड जगातील सर्वांत मोठे बेट आहे.
७. मोनॅको:
अवघ्या २.१ स्क्वेअर किलोमीटरचे क्षेत्रफळ असलेल्या मोनॅको देशात ३८ हजार लोक राहतात. फ्रांसच्या दक्षिणेला आणि इटलीच्या पश्चिमेला असलेल्या या देशाकडे स्वतःचे सैन्यदल नसून तटरक्षक दलाचा एक लहानसा गट आहे. याशिवाय एका रॉयल गार्डच्या नेतृत्वाखाली त्याठिकाणी ५०० पोलीस अधिकारी तैनात असतात.
या सात देशांशिवाय जगात आणखी असे २३ देश आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे सैन्य नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.