आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
तुम्ही बँकेत किंवा अगदी काही ठिकाणी पेट्रोल पम्पवर जरी गेला तरी तुम्हाला हमखास क्रेडिट कार्डची ऑफर दिली जाते. आजमितीस जवळपास सगळ्यांकडेच क्रेडिट कार्ड असून आपल्याला त्यावर अनेक ऑफर्सही मिळतात. या ऑफर्सपैकी एक ऑफर म्हणजे फ्री एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस. बहुधा बहुतांश लोक यासाठीच क्रेडिट कार्डदेखील घेतात.
कॉलीन्सन्स नावाच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनीने केलेल्या एका सर्वेनुसार क्रेडिट कार्ड घेणाऱ्या एकूण भारतीयांपैकी ८७% भारतीयांना आपल्या कार्डवर फ्री एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस ऑफर असण्याची अपेक्षा असते. एका क्रेडिट कार्डवर कितीवेळा फ्री लाउंज ॲक्सेस दिला जातो हे बहुधा जॉइनिंग फीसवर ठरवले जाते. जे लोक सतत विमानाने प्रवास करतात त्यांच्यासाठी मात्र ही ऑफर फायदेशीर ठरते. अनेकदा विमानाने प्रवास करताना मधल्या एखाद्या एअरपोर्टवर राहण्याची आवश्यकता भासू शकते. तेव्हासुद्धा लाउंज क्सेसची ही ऑफर फायदेशीर ठरते.
आता मात्र ही फ्री लाउंज ॲक्सेस सुविधा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. क्रेडिट कार्डद्वारे एका ठराविक प्रमाणात पेमेंट केले तरच लाउंज ॲक्सेस मिळू शकणार आहे, याशिवाय फ्री लाउंज ॲक्सेस मिळवणे आधीपेक्षा अतिशय किचकट प्रक्रिया होणार असून अनेक बँकांनी या धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात देखील केली आहे.
नुकतंच एचडीएफसीने आपल्या रेगेलीया क्रेडिट कार्डच्या लाउंज ॲक्सेस प्रोग्रॅममध्ये अनेक बदल केले आहेत. रेगलीया क्रेडिट कार्ड धारकांना आता एका तिमाहीमध्ये (क्वार्टर) क्रेडिट कार्डद्वारे कमीतकमी एक लाख रुपयांचं पेमेंट केल्यानंतरच लाउंज ॲक्सेस मिळणार आहे. पण फक्त एका तिमाहीत एक लाख रुपये एवढं पेमेंट करून भागणार नाही तर यापुढची प्रक्रिया बँकेने नवीन पद्धतीने अंमलात आणायचे ठरवले आहे.
२०२० साली भारत सरकारने टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर इंस्टाग्राम रिल्स आणि युट्युब शॉर्ट्स बाजारात आले. या रिल्स आणि शॉर्ट्समध्ये प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळे कारनामे केले. यामध्ये शॉर्ट फूड व्लॉगपासून, इंफोटेंमेंट आणि असेच असंख्य प्रकार येऊ लागले. यामध्ये आघाडीवर होतं, किंबहुना आहे ते ट्रॅव्हल व्लॉग. या ट्रॅव्हल व्लॉग्समध्ये अनेकदा एअरपोर्ट लाउंजबद्दल सांगितलं जात असे.
बहुतांश ट्रॅव्हल व्लॉग्सच्या व्हिडिओंमध्ये प्रामुख्याने दोन रुपयांत अनलिमिटेड खाणंपिणं, मौजमजा या आशयाचे कंटेट्स होते. लॉकडाऊनचा विळखा सुटल्यानंतर मात्र अनेकांनी केवळ एअरपोर्टवरील लाउंज ॲक्सेस मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड्ससाठी अप्लाय करायला सुरुवात केली.
लॉकडाऊन आणि वाढत्या स्पर्धेमुळे अनेक बँकांनी क्रेडिट कार्ड्सच्या जॉइनिंग फीससुद्धा शून्यावर आणल्या होत्या. त्यानंतर एअरपोर्ट लाउंजवर गर्दी वाढायला सुरुवात झाली. परिणामी याचा आर्थिक भार बँकांना सहन करावा लागत आहे. याच कारणामुळे अनेक बँकांनी आपल्या क्रेडिट कार्ड्सच्या बेनिफिट्सच्या लिस्टमधून फ्री एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस हटवले आहेत.
काही बँकांनी फक्त लो आणि मिडीयम रेंजच्या क्रेडिट कार्ड्सच्या बेनिफिट्समधून फ्री एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस हटवले आहेत. तर एचडीएफसीप्रमाणे काही बॅंक्स क्रेडिट कार्डद्वारे एक विशिष्ट रक्कम खर्च केल्यानंतरच लाउंज ॲक्सेस देत आहेत. त्यामुळे येत्या काळात, संथपणे फ्री एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस सुविधा बंद होऊन त्याच्या जागी आणखी दुसरे बेनिफिट्स येण्याची शक्यता आहे.
बँकबाजारचे सीईओ अधील शेट्टी यांच्या मते, बँकांना मिळणारे चांगले व्याजदर आणि मोठ्या प्रमाणात असलेली मागणी यांच्यामुळे बँका नेहमीच आपल्या क्रेडिट कार्ड्सच्या रिवॉर्ड प्रोग्रॅम्सची उपलब्ध, लेटेस्ट माहितीप्रमाणे छाननी करून त्यात आवश्यक ते बदल करत असतात. त्यामुळे जर आता क्रेडिट कार्ड्सच्या बेनिफिट्समध्ये फ्री एअरपोर्ट लाउंज ॲक्सेसशिवाय आणखी कोणते बेनिफिट्स मिळतात अथवा हीच सुविधा मर्यादित प्रमाणात दिली जाईल हे बँक्सवर अवलंबून आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.