आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
देशाच्या स्वातंत्र्य काळापासूनच राजकारणात गांधी, नेहरू घराण्याचं वर्चस्व आहे. हे आपल्याला माहितीच आहे. या कुटुंबांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय राजकारणात घडणाऱ्या घटनांमध्ये सहभाग असतोच. गांधी घराणे आपल्या वादग्रस्त निर्णयांमुळे सतत चर्चेत राहिलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे संजय गांधी.
१४ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीत जन्म झालेल्या संजय गांधींचा स्वभाव प्रचंड हट्टी होता. त्यांना अभ्यास, वाचन यांसारख्या शैक्षणिक गोष्टींमध्ये अजिबात रस नसायचा. हे सगळं माहिती असूनही त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी देहराडुनच्या डुन कॉलेजमध्ये दाखल केले, पण ते शिकले नाहीत. त्यांनी शाळा सोडली आणि आई इंदिरा व वडील फिरोज गांधी यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
त्यांना ऑटोमोबाईल अभियंता व्हायचे होते. ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी इंग्लंडला धाव घेतली. तिथे रोल्स रॉयस या प्रसिद्ध कंपनीबरोबर सलग तीन वर्षे इंटर्नशिप केली खरी पण नंतर ते पदवी न घेताच भारतात परतले.
त्यांना गाड्यांसोबतच विमानांचं प्रचंड आकर्षण होतं. ही आवड जोपासण्यासाठी त्यांनी पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेतले आणि विमान चालवण्याचा परवाना मिळविला. शेवटी कार आणि विमानांचा छंद असूनही त्यांना राजकारणातच उतरावे लागले.
१९७४ पर्यंत संजय गांधी पूर्णपणे भारतीय राजकारणात दाखल नव्हते. त्याकाळात सगळे विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या विरोधात एकत्र उभे ठाकले होते. अशाच परिस्थितीत बंडखोरीच्या भीतीने इंदिरा गांधींनी १९७५ साली आणीबाणी जाहीर केली आणि यचवेळी संजय भारतीय राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले.
कुठल्याही क्षेत्रात पडलं की लगेच तिथे वेगाने मोठं होण्याची सवय असणाऱ्या संजय गांधींनी राजकारणातसुद्धा याच पद्धतीने आणीबाणीच्या काळात इंदिराजींच्या सल्लागाराची भूमिका बजावली व संपूर्ण सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. कुठलाही मंत्री किंवा नेत्यांचं ते ऐकत नव्हते.
आणीबाणीमध्ये त्यांनी देशावर स्वतःचे निर्णय लादले. नागरिकांना त्यांचे हे कठोर निर्णय सहन करावे लागले. या काळात अधिकाऱ्यांना त्यांच्या दबावाखाली काम केले. यावरून आपण त्यांचा प्रभाव समजू शकतो. त्यांच्या हस्तक्षेपामुळे इंदिराजींच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले इंद्रकुमार गुजराल यांनाही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
आणीबाणीच्या काळात संजय यांनी आपला कार्यक्रम चालविला होता. यात शिक्षण, कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, जातीवादाचा सामना आणि हुंडा प्रथा रद्द करणे या विषयांचा समावेश होता. त्यांचा हा कार्यक्रम खरंतर देशहिताचाच होता. परंतु कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमांतर्गत लोकांची जबरदस्तीने नसबंदी करणं हे केवळ संजय यांनाच नाही तर संपूर्ण काँग्रेसला महागात पडलं.
आणीबाणीच्या काळात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा आणि संजय यांच्यासोबत संपूर्ण काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आणि त्याची प्रमुख कारणं म्हणजे प्रेसच्या सेन्सरशिप, नसबंदीच्या नावाखाली जनतेवर केलेले अ*त्याचार आणि बंडखोरांना तुरुंगात टाकणे.
यावेळी पहिल्यांदाच खासदार होण्याचे संजयचे स्वप्न धुळीस मिळू लागले, परंतु १९८० साली पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा संजय गांधी यांनी अमेठी लोकसभा जिंकली आणि ते पहिल्यांदा खासदार झाले. यानंतर ते लोकसभेचे सदस्यही होते. १९८० साली कॉंग्रेसचा विजय आणि पुन्हा इंदिराजी पंतप्रधान होण्यात संजय यांचे मोठे योगदान आहे असे म्हटले जाते.
१९७१ साली संजय गांधी यांच्या दबावाखाली इंदिराजींच्या मंत्रिमंडळाने मध्यमवर्गीय कुटुंब सहज विकत घेऊ शकतील असे वाहन तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा ठराव संमतही झाला. संचालक आणि व्यवस्थापक म्हणून संजय गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेल्या मारुती मोटर्स लिमिटेड नावाच्या कंपनीच्या स्थापनेला सरकारने मान्यता दिली. त्यावेळी अनुभव असल्यामुळे संजय यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
याबद्दल खूप खळबळ उडाली होती. पण जे आवाज उठवले गेले ते सरकार दडपून टाकत असत. जेव्हा दबाव वाढला तेव्हा संजय यांनी जर्मनीची कंपनी फॉक्सवॅगनशी करार केला, परंतु हा करार पूर्ण होऊ शकला नाही आणि आणीबाणीच्या वेळी पुन्हा हा मुद्दा थंडावला.
आणीबाणीनंतर जनता दलाचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी न्यायमूर्ती ए. जे. पी. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कमिशनची स्थापना करण्यात आली. आयोगाने या कंपनीकडे दुर्लक्ष केलं. असं म्हटलं जातं की मारुती कंपनी संजय गांधी जिवंत होते तोवर कोणतेही कार मॉडेल सादर करू शकली नाही. त्यांच्या मृत्यूच्या जवळपास एक वर्षानंतर मारुती सुझुकीने त्यांची ‘मारुती ८००’ ही पहिली कार लोकांसमोर आणली.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीबरोबरच त्यांचे वैवाहिक जीवनही चर्चेचाच विषय होता. त्यांनी स्वतःपेक्षा १० वर्षांनी लहान वयाच्या शीख कुटुंबातील एका मॉडेलशी लग्न केले. ही मॉडेल म्हणजेच मेनका गांधी होत्या.
असं म्हटलं जातं की संजयने मेनकाच्या कुटूंबाची इच्छा नसतानाही मेनकाशी लग्न केले. मेनकाला मॉडेल बनण्याची इच्छा होती. यासाठी त्यांना तत्कालीन प्रसिद्ध ब्रॅण्ड ‘बॉम्बे डाईंग’ची जाहिरात करण्याची संधीही मिळाली. त्या जाहिरातीच्या होर्डिंग्जमधील मेनका यांचे सुंदर चित्र पाहूनच संजय यांचा मेनका गांधींवर जीव जडला.
त्यानंतर त्यांची मेनकाशी त्यांची पहिली भेट मेनकाचे नातेवाईक विनू कपूर यांनी घडवली. १९७३ साली दोघांची लग्नाच्या पार्टीत भेट झाली, दोघांचे प्रेम वाढू लागले आणि संजयने मेनकाच्या कुटुंबियांना लग्नाचा प्रस्ताव दिला. त्यानंतर २३ सप्टेंबर १९७४ रोजी दोघांनीही लग्न केले.
गांधी कुटुंबाची सून झाल्यावर संजय गांधींशी असलेल्या संबंधांमुळे त्यांची छायाचित्रे जाहिरातींवरून काढून टाकण्यात आली. असं म्हटलं जातं की लग्नानंतर मेनका प्रत्येक दौऱ्यात संजय यांच्यासोबत बरोबर जात असे. लग्नाला जवळजवळ ६ वर्ष झाल्यानंतर वरुण गांधींचा जन्म झाला.
संजय गांधींना विमानाचे स्टंट करण्याचा खूप छंद होता आणि हा छंदच त्यांच्या मृत्यूचे कारण बनला. २३ जून १९८० रोजी संजय यांनी दिल्लीच्या सफदरगंज विमानतळावरुन नवीन विमानासाठी उड्डाण केले यावेळी त्यांच्यासमवेत कॅप्टन सुभाष सक्सेना देखील होते. पण एअर स्टंट करताना संजय यांचा विमानावरचा ताबा सुटला आणि त्यांचे विमान जमिनीवर आदळले. याच विमान अपघातात संजय गांधींनी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या निधनानंतर मेनकांचा इंदिराजींशी वाद वाढला आणि मेनका यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले. मेनका यांना राजकारणात खूप रस होता.
जेव्हा गांधी घराण्याशी पटत नाही हे लक्षात आल्यानंतर मेनका गांधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या आज लोकसभेच्या सदस्या आहेत. इतकंच नाही तर त्या केंद्रात कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत. तर संजय गांधी यांचा मुलगा वरुण गांधी हे देखील भाजपचे मोठे नेते आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








