एका भारतीय प्राध्यापकाने नारळाच्या पानांपासून बनवलेल्या ‘स्ट्रॉ’चा आता आंतरराष्ट्रीय ब्रँड बनलाय!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय लोकांच्या बुद्धिमत्तेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, इंद्रा नुयी, सुंदर पिचाई, सोनम वांगचुक, अगदी आपले काम सोपे करण्यासाठी घरीच वेगवेगळी यंत्रे विकसित करणारे शेतकरी आणि मजूर कामगार, कोणीही आज मागे नाही. आपल्या बुध्दी कौशल्याने, चिकित्सा शक्तीने व कल्पनेला सत्यात उतरवण्याठी केलेल्या कठोर परिश्रमाने अशा असंख्य लोकांनी भारताचे नाव उज्वल केले आहे.

सध्या प्लॅस्टिकचे जीवसृष्टीवर होणारे दुष्परिणाम ही अत्यंत काळजीची बाब बनली आहे. यावर लवकरात लवकर काहीतरी ठोस तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. अशातच अनेक लोक, तज्ञ, प्लॅस्टिकचा वापर कसा कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित करून त्यादिशेने कामही करतात आहे.

कापडी पिशव्या वापरणे, स्टील किंवा मेटलचे डबे आणि बाटल्या वापरणे या सारखे अनेक उपाय राबवणे सुरू आहे. पण आपण कुठे कुठे प्लॅस्टिकला रीप्लेस करणार, नाही का?

प्लॅस्टिकचा सगळ्यात जास्त वापर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यात व रेस्टॉरंटमध्ये केला जातो. हॉटेल्समध्ये सामान आणणे असो, ग्राहकांना पार्सल देणे असो किंवा कोल्ड ड्रिंक एन्जॉय करण्यासाठी प्लॅस्टिकची आकर्षक स्ट्रॉ असो, फूड इंडस्ट्रीत प्लॅस्टिक सगळीकडे आहे.

पण हल्ली भरपूर जागरूकता पसरत असल्याने त्या क्षेत्रातही प्लॅस्टिक रीपलस्मेंटची मोहीम सुरू झालेली आहे हे आपल्याला बघायला मिळते. कोणी पानांचे पत्रावळी आणि द्रोण वापरतंय तर कोणी चक्क एडीबल प्लेट्स अँड ग्लासेस बनवतंय.

याच समस्येवर समाधान म्हणून एका भारतीय प्राध्यापकाने चक्क नारळाच्या पानांपासून स्ट्रॉची निर्मिती केली आहे. कशी? त्याची गोष्ट जाणून घेऊया.

बंगलोरच्या ख्रिस्त युनिव्हर्सिटीत इंग्रजीचे प्राध्यापक असणाऱ्या साजी वार्घेसे यांनी हा शोध लावलाय. एकदा कॉलेजमधून घरी पायी चालत जात असताना, त्यांना वाळलेली नारळाची पानं नळीच्या आकारात मोडलेली दिसली. तिथूनच या पानांचे स्ट्रॉ, प्लॅस्टिकच्या स्ट्रॉऐवजी वापरता येऊ शकते का असा विचार त्यांच्या डोक्यात आला.

त्यांनी पुढे आणखीन काही पाने साधारण वाळवून, फूड ग्लूने चिकटवून त्या पानांपासून सिंगल लेयर स्ट्रॉ बनवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्यात ते स्ट्रॉ बुडवले की काहीच मिनिटात पान अगदी मऊ व लुसलुशीत व्हायचे. साध्या पानांच्या स्ट्रॉचे आयुष्य फार कमी होते, शिवाय ते म्हणावे तेवढे भक्कमही नव्हते. त्यामुळे हा प्रयोग अयशस्वी ठरला.

पण त्यांनी प्रयोग करणे सुरूच ठेवले. २०१८ मध्ये, त्यांनी पानांना लॅबमध्ये नेऊन काही वेळ वाफ देऊन पाहिली. आणि आश्चर्यच घडले! नारळाच्या पानात उष्णतेमुळे आतल्या बाजुला एक नैसर्गिक चमकदार, पारदर्शक थर तयार झाला.

याच वाफवलेल्या पानांपासून जेव्हा त्यांनी स्ट्रॉ बनवला, तेव्हा तो प्लॅस्टिकच्या स्ट्रॉसारखाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा स्ट्रॉ अँटी फंगल आहे, ६ तासांपेक्षा जास्त काळ पाण्यात राहू शकतो. शिवाय ज्यादिवशी बनवला तिथून पुढे १२ महिने वापरता येऊ शकते.

या स्ट्रॉमुळे खेडे विभागात व शहरातील गरीब स्त्रियांसाठी रोजगार निर्मितीच्या संध्यासुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. वार्घेसे यांच्या या उपक्रमाने आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यातील खेड्यातील महिलांना रोजगार प्राप्त करून दिला आहे.

सुरुवातीला या स्ट्रॉचे पेटंट मिळवून याचे प्रोडक्शन मदुराई, तुटिकोरिन आणि कसर्गोड तालुक्यात तीन कारखाने सुरू करण्यात आले. उत्पादनाठी वापरली जाणारी यंत्रेसुद्धा फार साधारण होती.

त्यांनी या स्ट्रॉला “सनबर्ड” असे नाव देऊन बाजारात त्याची विक्री सुरु केली.

जसजसे लोकांना या स्ट्रॉबद्दल माहिती होत गेले, त्यांना ही संकल्पना आवडत गेली, तसतशी स्ट्रॉच्या मागणीत वाढ होत गेली. स्ट्रॉची किंमतही फक्त पाच रुपये प्रति नग इतकीच असल्याने लोकांना ती स्ट्रॉ विकत घेणे सुद्धा परवडत होते.

हळूहळू रेस्टॉरेंट्स, हॉटेल्स, ड्रिंक जॉइंट, सगळेच या स्ट्रॉचा प्रसार प्रचार व वापर करू लागले. पाहता पाहता अमेरिका, ऑस्ट्रेलिया व इतर युरोपियन राष्ट्र मिळून तब्बल २५ देशांतून या बायोडीग्रेडेबल स्ट्रॉसाठी मागणी येऊ लागली.

आता या सगळ्या देशांत प्लॅस्टिक स्ट्रॉऐवजी ही नारळाच्या पानांपासून बनलेली भारतीय स्ट्रॉ वापरली जाते. आज सनबर्डचे विशेषतः दक्षिण भारतात २०हून अधिक प्रोडक्शन युनिट्स आहेत. रेस्टॉरेंट्समध्ये भरपूर प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या छोट्या पण महत्वाच्या असलेल्या स्ट्रॉने वार्घेसे व स्ट्रॉ बनवण्यासाठी काम करणाऱ्या महिला कामगारांचे जीवन बदलून टाकले.

प्रोफेसर वार्घेसेंचे या निर्मितीसाठी करावे तेवढे कौतुक कमीच आहे. निसर्गाच्या संगोपनाबरोबरच, आपल्या व्यवसायातून रोजगार निर्मितीसारखे समाजकल्याण कार्य घडणे ही एका सामान्य माणसासाठी अत्यंत मोठी व महत्त्वाची बाब आहे.

त्यांच्या या कामाची, जगाने सुद्धा दखल घेतलेली दिसून येते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यात आयआयटी दिल्लीकडून स्वदेशी स्टार्टअप अवॉर्ड, स्वित्झर्लंडकडून स्विस री शाईन आंत्रप्रिनर अवॉर्ड आणि स्कॉटलंडकडून २०१८ साली क्लायमेट लाँचपॅड अवॉर्ड यांसारख्या मोठ्या पुरस्कारांचा समावेश आहे.

प्लॅस्टिकचा धोका आपण अशाच नवनवीन नैसर्गिक रिप्लेसमेंट्सचा वापर करून कायमचा कमी किंवा नक्कीच करू शकतो. अशा अजून नवनवीन भरपूर शोधांची जगाला आज खूप गरज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!