‘रॉ’चा निवृत्त प्रमुख वयाच्या पंचाहत्तरीत शेतीतून अनेकांची कुटुंबे सांभाळतोय!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

तेविसाव्या वर्षी त्यांनी भारतीय पोलीस दलातील सेवेला सुरुवात केली. यानंतर कारकीर्दीच्या विविध टप्प्यांवर त्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडत देशसेवा बजावली. आयपीएस अधिकारी ते रॉ प्रमुख असा कारकीर्दीचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर आणि वयाची पंचाहत्तरी जवळ आलेली असताना ते शेतीकडे एका नव्या सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहेत.

केरळमधील माजी रॉ प्रमुख थारकन हे २००७ साली सेवा निवृत्त झाले. त्यानंतरही त्यांनी कर्नाटक राज्यपालांचे सल्लागार म्हणूनही काम पहिले.

याच वेळी उडुपीच्या मणिपाल विद्यापीठात ते अतिथी शिक्षक म्हणूनही जात होते. निवृत्तीनंतर शहरातील धकाधकीचे जीवन त्यांना रुचत नव्हते. या दगदगीपासून दूर राहण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीसह आपल्या मूळ गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात, गावाच्या शांत वातावरणात काही लिहिता वाचता येईल आणि थोडीफार मन:शांती मिळेल असा त्यांचा समज होता. केरळच्या अलापुझा जिल्ह्यात ओलावैप या छोट्याशा गावातून आलेले थकरन यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत अत्युत्तम योगदान दिले.

आपण देशाची सेवा केल्यास देश आपली सेवा करेल हे ब्रीद त्यांनी प्रशासकीय सेवेत असल्यापासूनच अंमलात आणले. त्यांचे हेच ब्रीद त्यांचा आजच्या आयुष्याचेही प्रेरणास्थान ठरले आहे.

याच वचनाच्या ध्यास घेत त्यांनी निवृत्तीनंतर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक शेतकरी आणि मत्स्यशेतीच्या आधाराने त्यांनी पुन्हा एकदा आपल्या गावच्या मातीशी स्वतःला जोडून घेतले आहे. थकरन यांचे वडील शेतकरी होते. वडिलांच्या माघारी त्यांचा भाऊ त्यांची ही शेती सांभाळत असे. पण, या भावाचे अकाली देहावसान झाल्याने शेतीची जबाबदारी थकरन यांच्यावरच येऊन पडली. मुळचे शेतकरी कुटुंबातील असल्याने थकरन यांना शेतीची कामे अगदीच अनोळखी होती असे नाही. लहानपणी वडिलांच्या हाताखाली मदत म्हणून त्यांनी शेतीतील सर्व कामे केलेली होती.

पेरणी, नांगरणी, पिकला पाणी पाजणे, यासारखी कामे त्यांच्यासाठी नवी नव्हती. लहानपणीच त्यांनी शेतीचे मुलभूत धडे गिरवलेले होते.

गरज होती ते या शिकलेल्या सर्व गोष्टीना थोडी अभ्यासाची आणि मेहनतीची जोड देण्याची. त्यांची पत्नी मोलींनी त्यांना या कमी चांगली साथ आणि प्रोत्साहन दिले. या वयात त्याही स्वतःहून शेतीच्या कामात लक्ष घालतात. शेती करायचीच तर सेंद्रिय पद्धतीनेच असा थकरन यांचा निश्चय होता.

थकरन म्हणतात,

“पूर्वीच्या काळी पेरणीचा हंगाम म्हणजे एखादा उत्सवाच वाटे. सर्वजण एकत्र येत याकामात एकमेकांना मदत करत. आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मला या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.”

थकरन यांचे धाकटे बंधू आंतरराष्ट्रीय बँकेत नोकरीला होते. शेतीमध्ये काही नवे प्रयोग करण्याच्या हेतूने ते दोन वर्षापूर्वीच गावी परतले होते. “शेतीमध्ये अनेक नवी सुधारणा कामे त्याने सुरु केली. परंतु, २०१४ मध्ये तोही अचानक आम्हाला सोडून गेला. पण, जाताजाता त्याने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. म्हणून मी ही शेती करण्याचा प्रयत्न करू लागलो.” थकरन सांगतात.

“शेतीबद्दल मला असलेली प्रचंड उत्सुकता, जबाबदारीची जाणीव आणि माझी निष्ठा याच माझ्यासाठी प्रेरणास्थान बनल्या. शेतीतील नवे तंत्रज्ञान मी शिकू लागलो. यासाठी मी या क्षेत्रातील तज्ञांना भेटलो गावातील प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी यांचा देखील सल्ला घेतला.” निवृत्तीनंतर शेतीला सुरुवात कशी केली याबद्दल सांगताना थकरन यांनी ही माहिती दिली.

शेतीतील तज्ञांनी माझ्या ज्ञानात भर घातली तर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक सरकारी योजनाची माहिती करून दिली. या योजनांमुळे मला कमी खर्चात शेती करणे शक्य झाले. गावातील अनुभवी शेतकऱ्यांना गावच्या हवामानाचा अंदाज आणि मातीचा पोट याबद्दल अचूक माहिती असल्याने त्यांच्याकडून वेळोवेळी मिळणारे सल्ले देखील उपयोगी पडले.

केरळच्या मत्स्यशेती विकास संस्थेच्या (ADA) उप-संचालकांनी थकरन यांना “एक भात पिक एक मत्स्यशेती” या प्रकल्पाची माहिती दिली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे थकरन कोलंबी आणि भातशेतीकडे वळले.

हे काम करताना चुका आणि शिका हीच पद्धत त्यांनी अवलंबली. या प्रकल्पात त्यांना सरकारी सहाय्य देखील मिळाले. ADA संस्थेने थकरन यांना भातशेतीसाठी अनुदान देखील दिले. समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने त्यांना कोलंबीचे बियाणे देखील उपलब्ध करून दिले. पारंपारिक शेतीमध्ये साधारण मान्सूनच्या हंगामात भात पेरणी केली जाते. भात पिक काढल्यानंतर हे शेत संपूर्ण वर्षभर पडीक राहते.

पावसाळा संपल्यानंतर समुद्रातील कोलंब्या आपसूकच शेतात येतात. म्हणून सरकार मत्स्यशेतीला प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांनी रोटेशन पद्धतीने पिके घ्यावीत यासाठी सरकार प्रयत्न करत असते.

अशा प्रकारे शेती केल्याने कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा माराही कमी होतो. अर्थात, थकरन यांनी रासायनिक खातांना पूर्णतः बगल देऊन संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीनेच शेती करण्याचे ठरवले. कारण रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे पिकांना नुकसान पोहोचते असे त्यांचे मत आहे. नाबार्ड कडून दिल्या जाणाऱ्या निधीचा वापर करून सरकार भातशेतीसाठी भांडवल आणि बियाणे देखील पुरवते. म्हणून थकरन यांनी भातशेतीतच पहिल्यांदा रस घेतला.

तरुणांनी शहरात जाऊन नोकऱ्या करण्याऐवजी मोठ्याप्रमाणात शेती व्यवसायाकडे वळावे याच हेतूने सरकार अशा योजना राबवत असते. थकरन म्हणतात, “भारतातील शेतकऱ्यांनी अशा योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि शेती केली पाहिजे.”

शेतीतून थकरन यांना नेमका किती फायदा होतो, याबद्दल विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की,

“मी फायद्यापेक्षा यातून किती लोकांचे पोट भरते याचा जास्त विचार करतो. माझ्या शेतीची देखरेख आणि निगराणी करण्यासाठी मी आसाम मधील तीन तरुण कामाला ठेवले आहेत. शेतीच्या कामाची सगळी जबाबदारी हे तरुणच सांभाळतात. शिवाय, पेरणीच्या हंगामात दरवर्षी २५ किंवा त्यापेक्षा जास्त स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध होतो. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून तर लाखो लोकांच्या चुली पेटतात. याचाच मला सर्वाधिक आनंद आहे. त्यामुळे मोबदला किंवा नफा कमीजास्त झाला तरी मला त्याचा खेद वाटत नाही.”

शेतीच्या कामासाठी कामगार नेमले असले तरी, दिवसातून दोनवेळा तरी ते स्वतः शेताला भेट देतात. कोळंबीना खायला टाकणे, कीड नष्ट करणे अशा प्रकारची कामे ते स्वतःही तितक्याच उत्साहाने करतात. तीन वर्षे ते शेती करत असले तरी, यातून आणखीन मोठे परिणाम साधण्यासाठी शिकणे महत्वाचे आहे, असे ते म्हणतात.

पहिल्या वर्षी त्यांनी पोक्काली भाताची शेती केली होती. दुसऱ्या वर्षीही त्यांनी भातशेती केली पण, केरळमध्ये आलेल्या महापुराने सर्व पिक नष्ट झाले. यावर्षी त्यांनी १००० किलोची मत्स्यशेती केली आहे. भातशेतीसाठी देखील ते यावर्षी प्रयत्न करणार आहेत. निसर्गाची साथ मिळाल्यास यावर्षी शेतीव्यवसायात निराशा तरी पदरी पडणार नाही अशी त्यांना अशा वाटते.

“शेती एकाच वेळी अनेकांचे संसार उभे करण्यास मदत करते. ही देखील एकप्रकारची देशसेवाच आहे असे मी मानतो. या देशसेवेत मी कधीही खंड पडू देणार नाही,” असे ते अत्यंत अभिमानाने सांगतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!