महामारीविरोधी लढ्यात या लोकांचं काम ‘आपण जिंकूच!’ असा विश्वास देतंय!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

संपूर्ण देशावर सध्या कोरोनाचे सावट पसरले आहे. सगळीकडे फक्त कोरोनाचीच चर्चा ऐकायला व वाचायला मिळते. अनेक बलाढ्य देश यातून वाचू शकले नाही. भारत पूर्ण प्राण पणाला लावून लढा देत आहे. सर्व सरकारी आणि इतर सामाजिक यंत्रणा अविरतपणे कार्यरत आहेत. हॉस्पिटलमधे सेवा देणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस शिवाय घरी बसलेला सामान्य व्यक्तीसुद्धा या लढाईत एका सैनिकाची भूमिका बजावत आहेत.

त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संघटना नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समोर येत आहेत. वैयक्तिक पातळीवर फंड जमा करणे, वृध्द व गरजू लोकांना औषध-भाज्या पोहोचवणे अशा अनेक तऱ्हेने मदतकार्य सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने खारीचा वाटा उचलला आहे. या बिकट परिस्थितीत देशाने दाखवलेला संयम, सहकार्य खरंच कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगं  आहे.

संसर्ग टाळण्याची पूर्ण काळजी घेवून सुद्धा अजुनही परिस्थितीत संपूर्ण आटोक्यात आलेली नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २१ दिवस म्हणजेच १५ एप्रिल पर्यंत देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. येणारे काही आठवडे भारतासाठी अत्यंत निर्णायक आहे. जर काळजी घेतली नाही तर हा आजार कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यांवर प्रवेश करेल आणि या रोगाचं प्रसारण आपण कुठल्याही प्रकारे थांबवू शकणार नाही.

त्यामुळे या लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. या परिस्थतीत प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी आणि निश्चित केलेल्या क्षेत्रात नियम आणि अनुशासनाकडे लक्ष पुरवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवरचा ताण आणि भार वाढला आहे. यात सहकार्य करायला आय. ए. एस अधिकारी पुढे सरसावले आहेत आणि आपल कर्तव्य पूर्ण करत आहेत. अनेक प्रकारे समजात सेवा देत आहेत .

त्रिवेंद्रम येथील पथनामाथीत्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त पी. बी नुह यांनी कार्य तत्परता दाखवून अनेक पाऊल उचलली.

७ मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनाने संक्रमित झालेले तीन व्यक्ती आढळल्याची बातमी त्यांना कळली, अर्ध्या रात्री तडक ते जिल्ह्यात परतले व वॉर रूम मधून सर्व नियंत्रण हाती घेतले. पोलिस अधिकारी व काही समाजसेवकांसोबत चर्चा करून, त्यांच्या मदतीने कंट्रोल रूम तयार करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील पाच नागरिक संक्रमित झाल्याचं वृत्त कळाले. त्वरित त्यांची माहिती काढून, त्यांना शोधून क्वारंटाईन मधे ठेवण्यात आले. पुढील काही दिवसांत जवळपास चार हजार नागरिक जे संशयित होते, त्यांना योग्य त्या सूचना देवून आयसोलेट करण्यात आले.

सगळीकडे सॅनिटायझर व मास्कची कमतरता असताना या समस्येवर पर्याय तमिळ नाडू येथील तीकामगडच्या जिल्हाधिकारी हर्शिका सिंह यांनी शोधून काढला. हॉस्पिटल व औषधी केंद्रांमध्ये सॅनिटायझर व मास्कची कमतरता भासू नये म्हणून १५० महिलांना सॅनिटायझर व मास्क बनवण्याची जबाबदारी देण्यात आली.

एका दिवसात १५०० सॅनिटायझर व तितकेच मास्क बनवण्यात आले व अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आले. विशेष म्हणजे सोशल डीस्टन्सिंग पाळत व पूर्ण काळजी घेवून या महिलांनी आपआपल्या घरीच सॅनिटायझर व मास्क बनवले.

असाच काहीसा उपक्रम मध्यप्रदेश मधील सागर जिल्ह्याच्या सहायक आयुक्त प्रीती मैथील यांनी केला. जिल्ह्यातील जेल मधील बंदिवासात असेल्याल्या ५५ कैद्यांना या कामासाठी तयार केलं. १००० च्या वर मास्क बनवून हॉस्पिटल मध्ये मोफत वाटण्यात आले. हाती असलेल्या साधनाचा कशा प्रकारे उपयोग करून घ्यावा याच उत्तम उदाहरण यांनी दाखवलं.

अहमदाबाद येथे अन्न, धान्य व भाजी नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी ई-रिक्षा तयार करण्यात आल्या. अहमदाबाद महानगर पालिकेचे आयुक्त विजय नेहरा यांनी ही कल्पना सुचवली व राबवली. हॉटेल्स, सामजिक संस्था व काही महिलांच्या मदतीने शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात, सर्व मजूर वर्ग व गरजू लोकांपर्यंत ई रिक्षा पोहोचेल याची खबरदारी त्यांनी घेतली.

सामाजिक स्तरावर मदत गरजेची आहेच पण आर्थिक मदत सुद्धा तितकीच गरजेची आहे. प्रधानमंत्री व राज्याच्या सर्व मुख्यमत्र्यांनी सहाय्यक निधी तयार केला व सर्व जनतेला, सधन वर्गाला मदतीसाठी आवाहन केलं. सर्व स्तरातील वर्गानी आपल्यापरीने हातभार लावला.

याचसोबत अनेक अधिकाऱ्यांनी आपला पगार मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहायक निधीला देवू केला आणि काहींनी साहित्यरूपी मदत देऊ केली.

याशिवाय नागरिकांच्या समस्या दूर करण्यााठी एक हेल्पलाईन नंबर देखील सुरु करण्यात आला आहे. ज्याचा चांगला फायदा लॉकडाऊन दरम्यान होत आहे. कबीरधामच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपला संपूर्ण पगार मुख्यमंत्री सहायक निधिला देऊ केला व जनतेला देखील मदतीसाठी आव्हान केलं. तसेच पंजाब येथील १२१ आयपिएस अधिकारी व ८०९ पिपीस अधिकाऱ्यांनी आपला पगार देऊन जवळजवळ ३३ लाख एवढ्या मोठ्या रक्कमेचा निधी गोळा करण्यात मदत केली.

केरळ स्वास्थ आयोगाने ब्रेक द चेन नावाने उपक्रम सुरू केला आहे. या मार्फत अनेकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून जनजागृती करण्यात येत आहे. याच उपक्रमात आयएएस अधिकारी डॉ. दिव्या अय्यर यांनी महत्वाची भूमिका बजावली. गावागावात जाऊन साबणाने हात धुणे, स्वच्छता राखणे, इतर योग्य सूचना दिल्या.

गेल्या काही दिवसात अनेक निराशाजनक बातम्या कानी पडून मन खिन्न होते, पण त्याच बरोबर भारत व सरकारी यंत्रणा लढवय्या वृत्तीने या संकटाला सामोरे जात आहे, हे चित्र अत्यंत आशादायक आहे. सर्वांच्या सहकार्याने भारत ही लढाई नक्कीच जिंकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!