आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२०१९ साली कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टिपूच्या समर्थकांचे टिपूप्रेम पुन्हा एकदा उफाळून आले होते. इंग्रजांच्या विरोधात लढला, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढला म्हणून ज्याचा उदोकार केला जातो तो टिपू नक्की कोण होता?
टिपूने इंग्रजांच्या विरोधात लढा दिला हे खरं आहे. यावर शंका घेण्याचं काही कारण नाही. पण या संग्रामात भाग घेण्याचा त्याचा हेतू काय होता?
इंग्रजांना देशाबाहेर घालवून टिपूला नक्की कोणतं राज्य हवं होतं?
आज ज्या पद्धतीने टिपूचा गौरव केला जातो त्याला अपेक्षित असणारं राज्य आलं असतं तर भारताचं सध्याचं चित्र काय असतं?
या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर काही अस्सल पुरावे तपासावे लागतील. सुरुवातीला कोणताच निष्कर्ष न काढता त्यातील काही पुरावे पाहू.
१. जेम्स स्करी नावाचा एक सोळा वर्षांचा ब्रिटिश मुलगा फ्रेंच सैन्याने कैद केला. फ्रेंच सरदार सफरेन याने १७८२च्या जूनमध्ये ५०० यु*द्धकैदी टिपूच्या स्वाधीन केले त्यापैकी एक होता जेम्स स्करी.
सुलतानाच्या आज्ञेनुसार या यु*द्धकैद्यांना गुलाम बनवून यु*द्धात लढवले जायचे, त्या कैद्यांच्या टोळीत हा मुलगा होता. १७९१ साली चार जणांना सोबत घेवून तो तिथून निसटला आणि नंतर धारवाड येथे असलेल्या ब्रिटिश तुकडीत सामील झाला.
टिपूने या ख्रिस्ती यु*द्धकैद्यांवर केलेल्या अ*त्याचारांबद्दल तो लिहितो,
“मलबारच्या ख्रिश्चन यु*द्धकैद्यांचे टिपूने केलेले हाल म्हणजे अमानुषपणाची सीमा होती. ३०,००० कैद्यांची सुंता करून त्यांना आधी गुलाम बनवण्यात आले. त्यांच्यातल्या स्त्रियांना श्रीरंगपट्टणमपासून ९ मैल लांब घेऊन जाण्यात आले. त्यापैकी बऱ्याच यु*द्धकैद्यांच्या मुली होत्या.
टिपूच्या जनानखान्यात त्यांना बळजबरीने ठेवण्यासाठी नेले जात असताना त्या स्त्रियांनी विरोध केला. या विरोधानंतर त्यांना पुन्हा श्रीरंगपट्टणमला आणण्यात आले. तिथे आणून रस्त्यावर उभे करून त्यांचे हात मागे बांधून टाकले जात.
त्यांचे कान, नाक आणि वरच्या बाजूचे ओठ कापून टाकले जात. गाढवावर बसून त्यांची धिंड काढली जात असे. रक्त वाहिल्याने एका महिलेचा तिथेच रस्त्यावर मृत्यू झाला. तिथले दृश्य पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाचे हृदय पिळवटून गेले असते.”
जेम्सने स्वतःच्या शब्दात लिहिलेल्या या घटनेचे वर्णन वाचतानाही इस्लामी राजवट आणि तिथे बिगरमुस्लिमांना दिल्या जाणाऱ्या शिक्षा काय असतात याची कल्पना येऊ शकेल.
त्याचं ‘The captivity, sufferings, and escape, of James Scurry’ उपलब्ध आहे. त्याची लिंक संदर्भ सूचीमध्ये.
२. विल्यम कर्कपॅट्रिक या ब्रिटिश अभ्यासकाने टिपूच्या सर्व पत्रांचे भाषांतर करून ‘सिलेक्ट लेटर्स ऑफ टिपू सुलतान’ या नावाने प्रकाशित केलेला ग्रंथ उपलब्ध आहे. पान नंबर १५०-५१ वर त्याच्या १७८५ साली टिपूने कूर्ग या शहरावर ह*ल्ला करून ते ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसांनी कुशुन तुकडीचा सरदार झैन-उल-अबिदीन याला लिहिलेले पत्र आहे.
त्यात टिपू म्हणतो,
“आमच्यापर्यंत अशी बातमी पोचली आहे की झफीराबाद येथे काही लोकांनी उठाव केला. तिथे जाऊन तुला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, आणि तिथल्या प्रत्येक कैद्याला मुसलमान बनवावे लागेल. त्यासाठी तुझ्याकडे ह*त्यारबंद फौजेची एक तुकडी देण्याचे आदेश सैन्यप्रमुखाला देत आहोत.”
३. १३ जानेवारी १७८६ रोजी मीर मोईनुद्दीन या सरदाराला टिपू लिहितो, “अल्लाहच्या कृपेने आणि प्रेषितांच्या साहाय्याने आम्ही कूर्ग इथल्या जमातींच्या बंडाची वासलात लावण्यात यश मिळवले. तिथल्या सुमारे १५,००० लोकांना आम्ही कैद करून, त्यांची सुंता करून मुसलमान केले आहे. इस्लामी रियासतीला यामुळे बळ मिळणार आहे.” (सिलेक्ट लेटर्स ऑफ टिपू सुलतान- २३६-३७)
हे झाले टिपूने स्वतःच्या राज्यात बिगरमुस्लिम जनतेला दिलेल्या वागणुकीचे काही पुरावे. यासारखे आणखी कित्येक पुरावे, टिपूने स्वतः लिहिलेली पत्रे, फ्रेंच आणि पोर्तुगीज अभ्यासकांनी केलेल्या नोंदी उपलब्ध आहेत.
सर्वधर्मसमभाव आणि पुरोगामित्वाच्या रंगात टिपूला रंगवण्याचे सगळे मनसुबे उधळून लावण्यास एवढे पुरावे पुरेसे असावेत. टिपूच्या प्रकरणाचा सविस्तर पंचनामा श्री. गजानन मेहेंदळे यांनी ‘Tipu as he really was’ या पुस्तकात केलाच आहे. ते पुराव्यांसहित लिहिलेले पुस्तक वाचल्यास इतर काहीही पाहण्याची गरज नाही. आणखी अनेक धक्कादायक पत्रे आणि पुरावे सवडीने लिहितो.
टिपू सुलतानने इस्लामी मूल्यांशी एकनिष्ठ राहून त्याच्या राजवटीत बिगरमुस्लिमांवर केलेले अ*त्याचार, त्यांची जबरदस्ती धर्मांतरे यांचे काही पुरावे मागच्या भागात पाहिले.
सर्वसाधारण इस्लामी राज्याची संकल्पना, जी कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांत मांडली आहे आणि नंतर पहिल्या चार आदर्श खलिफांच्या राजकीय वर्तनातून स्पष्ट झाली आहे, त्याप्रमाणे टिपूने आपले राज्य चालवले.
ही गोष्ट सिद्ध होण्यासाठी ते पुरावे पुरेसे होते. असे अनेक पुरावे देता येतील.
आता आणखी एक युक्तिवाद केला जातो. तो म्हणजे टिपू भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढला, या दाव्याची सत्यासत्यता पुराव्यांच्या आधारे जोखून पाहू.
टिपू इंग्रजांच्या विरोधात लढला हे सत्य न नाकारता इंग्रजांना भारतातून घालवून त्याला भारतात कोणते राज्य हवे होते पाहणे येथे महत्त्वाचे आहे.
टिपूच्या प्रतिकाराला जुमानत इंग्रजांनी भारत सोडला तर भारतासाठी टिपूची पुढची योजना काय होती या प्रश्नाचं उत्तरं देणारे काही कागदपत्र आणि पुरावे.
१. १७८५ साली टिपूने ऑटोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपल येथे आपला दूतावास पाठवला. दोन इस्लामी राज्यात चांगले संबंध राहावेत म्हणून टिपूने पाठवलेला हा दूतावास काम करत असे.
ऑटोमन साम्राज्यालाच पाठवलेल्या एका पत्रात टिपू लिहितो,
“पूर्ण हिंदुस्थानवर सध्या अश्रद्धावंत आणि अनेकेश्वरवाद्यांनी वर्चस्व स्थापित केलं आहे. फक्त खुदादाद सरकारच्या राज्यात इस्लामचा चांद अल्लाहच्या कृपेने सुरक्षित आहे. पण मला आशा आहेत की दुसऱ्या आदमच्या अवतारानंतर जगभर इस्लामचे राज्य असेल, आणि या अनेकेश्वरवाद्यांचा नायनाट करण्यात आपण यशस्वी होऊ.”
हे पत्र तिकडे पोहोचण्याच्या आधीच ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाला आणि तिथला सुलतान मारला गेला होता.
हे पत्र ‘Official documents relative to the negotiations carried on by Tippoo Sultan with the French Nation and other foreign states’ या खंडात पाहता येईल.
२. टिपूने भारताबाहेरील इस्लामी राजवटींशी केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यापैकी त्याने अफगाणिस्तानचा नवाब झमानशाह याला १७९७ साली पाठवलेलं पत्र उपलब्ध आहे.
हा झमानशाह म्हणजे १७६१ साली जो अहमदशाह अब्दाली (पानिपतच्या तिसऱ्या यु*द्धातला) नजीबखान रोहिल्याच्या विनंतीवरून भारतावर चालून आला त्याचा नातू.
त्याला पाठवलेल्या पत्रात टिपू म्हणतो,
“दिल्लीच्या गादीवर सध्या मराठ्यांचे वर्चस्व आहे. कित्येक वर्षांपासून इस्लामी राज्य असलेल्या दिल्लीच्या तख्तावर अश्रद्धावंत (Infidel) लोकांचे राज्य असताना जगभरातील मुस्लिम राजांचे हे पवित्र कर्तव्य आहे की त्यांनी एकत्र येऊन दिल्ली मराठ्यांकडून ताब्यात घ्यावी.”
पुढे तो म्हणतो, “दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर झमानशाहने दक्षिणेत उतरावे. दक्षिणेत मी स्वतः जिहादची योजना करत असून आपण एकत्र येत मराठ्यांचे पारिपत्य करू आणि इस्लामच्या तलवारीसमोर त्यांना गुडघे घासायला भाग पाडू.”
हे पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसने प्रकाशित केलेल्या ‘Official documents relative to the negotiations carried on by Tippoo Sultan with the French Nation and other foreign states’ या खंडाच्या पान क्र. ६२ वर पाहता येईल.
टिपूच्या इंग्रजांच्या विरोधातील लढ्याचा उद्देश काय होता हे स्पष्ट करणारे असे अनेक पत्र उपलब्ध आहेत. मुळात टिपूबद्दल इथे कोणताही निष्कर्ष काढण्याची गरज उरतच नाही.
त्याचा उद्देश काय आहे हे तो स्वतः प्रत्येक शब्दातून सांगतो आहे.
या व्यतिरिक्त स्वतःच्या मार्गदर्शनाखाली जी पुस्तके त्याने लिहून घेतली ती उपलब्ध आहेत. फतह-अल-मुजाहिदीन, फतवा-इ-मूहम्मदी या आणि इतर अनेक त्याने स्वतःच्या सैनिकांना जिहाद करताना कसे वागावे याचे उपदेश दिले आहेत.
थोडक्यात, टिपू सुलतान हा इस्लामी राज्य स्थापित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कटिबद्ध असलेला मुस्लिम राज्यकर्ता होता. त्याच्या राज्यात जबरदस्तीने केलेली धर्मांतरे, बिगरमुस्लिम जनतेवर अ*त्याचार, बिगरमुस्लिम स्त्रियांना जनानखान्यात टाकून त्यांचे लैंगिक शोषण या गोष्टी इस्लामी नियमांप्रमाणे होत असत.
असे असूनही ज्यांना टिपू इंग्रजांच्या विरोधात लढला म्हणून भारतीय स्वातंत्र्ययु*द्धाचा सच्चा शिलेदार वगैरे वाटतो त्यांच्या हेतूंबद्दल न बोललेलेच बरे!
संदर्भ :
१. Official documents relative to the negotiations carried on by Tippoo Sultan with the French Nation and other foreign states (East India Press)
२. Select letters of Tippoo sultan
३. Tippoo As He Really Was (G. B. Mehendale)
४. The captivity, sufferings, and escape, of James Scurry
५. Select letters of Tippoo Sultan to various public functionaries
६. Historical sketches of the south of India
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.