आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एक विद्यार्थी म्हणून आपण इतिहासाचा फक्त अभ्यासच करू शकतो. त्या अभ्यासातून भूतकाळ जाणून घेणे आणि भूतकाळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती वर्तमानात न होऊ देणे हा इतिहास अभ्यासाचा मुख्य हेतू असतो, किंबहुना तसाच हेतू असावा. आज अनेक तथाकथित इतिहासकार आपला राजकीय किंवा सामाजिक स्वार्थ साधण्यासाठी खोट्या इतिहासाचा प्रचार करतात. अशा इतिहासाला फक्त शब्दांचा कमकुवत आधार असतो, पण कागदोपत्री अथवा तत्सम मजबूत पुरावे नसतात. पण ऐतिहासिक वास्तू इतिहासाच्या खऱ्या साक्षीदार असतात.
जर्मनी आणि युरोपातील क्रू*रतेचा इतिहास म्हणजेच ‘ना*झी’ राजवटीचा इतिहास. या काळात जगामध्ये अनेक बदल झाले. याच ना*झी राजवटीची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती आजही जर्मनीमध्ये उभ्या आहेत. बाल्टिक समुद्रातील एका बेटावर ‘कोलासस ऑफ प्रोरा’ नावाचे प्रशस्त संकुल आहे. या इमारतींना प्रोरा म्हणूनही ओळखले जाते. या संकुलाचे खरे नाव म्हणजे ‘ब्लॉक’. या इमारती जर्मनीच्या रोजेन बेटावरील बिनझ नगरपालिकेत असून ना*झी जर्मनीने हि*टल*रच्या आदेशानुसार १९३६ आणि १९३९ दरम्यान ‘स्ट्रेंथ थ्रू जॉय’ किंवा ‘क्राफ्ट डर्च फ्रायड’ अर्थात ‘केडीएफ’ प्रकल्पाचा भाग म्हणून त्या उभारल्या होत्या.
हे संकुल सुट्ट्यांचा काळ घालवण्यासाठी तयार करण्यात आले होते. जर्मन लोकांच्या विश्रांतीच्या वेळेला नियंत्रित करणे हे या प्रकल्पाचे ध्येय होते. वीस हजार लोकांनी एका वेळी सुट्टी घालवणे हे या प्रकल्पाचे ध्येय होते. प्रकल्पातील सर्व दहा हजार खोल्यांमधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते, यामुळे या प्रकल्पाची किनाऱ्यालगतची लांबी सुमारे ५ किलोमीटर आहे.
या इमारतींना सुट्ट्यांचे ठिकाण म्हणून जरी उभारले गेले असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचा कधीही सुट्ट्यांसाठी वापर झालाच नाही. ना*झी राजवटीच्या काळात या इमारतींचे बांधकाम अपूर्ण राहिले. दुसऱ्या महायु*द्धानंतर या इमारतींचा वापर लष्करासाठी करण्यात आला. सर्वप्रथम सोव्हिएत सैन्याने, त्यानंतर पूर्व जर्मन व्होल्स्कार्मीने आणि अंतिमतः जर्मन बुंडेसवेहरने या इमारतींचा वापर लष्करासाठी केला. आजमितीस येथे एक मोठे युवा वसतिगृह, एक हॉटेल आणि सुट्टीसाठी अपार्टमेंट्स आहेत.
वर नमूद केल्याप्रमाणे ऐतिहासिक घटनांचे खरे साक्षीदार म्हणजे ऐतिहासिक वास्तू. प्रोरा ना*झी राजवट किती असमर्थ होती हे सिद्ध करते. जेव्हा याच राजवटीने १९३९ साली दुसऱ्या महायु*द्धाची सुरुवात केली तेव्हा प्रोराचे बांधकाम बंद करण्यात आले. त्यानंतर प्रोरा कधीही पूर्ण झाले नाही. केडीएफचा एकही पर्यटक “वीस हजार लोकांसाठीच्या समुद्रकिनारी रिसॉर्ट”मध्ये सुट्टी घेताना दिसला नाही.
त्याउलट हे ब्लॉक्स लष्करीदृष्ट्या वापरण्यात आले. वर नमूद केलेल्या सर्व लष्कराचे बरॅक्स या इमारतींमध्ये होती. ऐतिहासिक बर्लिन वॉल पडून जर्मनीचे पुन्हा एकीकरण झाल्यानंतर हे बांधकाम अधिकृतपणे ‘ऐतिहासिक’ म्हणून सूचिबद्ध केले गेले. या संकुलामध्ये संग्रहालये, कलाकारांचे स्टुडियो सुरु करण्यात आले आहेत. पण या महाकाय, कदाचित जगातील सर्वांत लांब संरचनेचे मोठे भाग उ*द्ध्वस्त झाले.
एकेकाळी मोठ्या प्रमाणात लष्करी आणि ना*झी राजवटीखाली असलेले ‘प्रोरा’ आज टुरिस्ट स्पॉटच्या रूपात उदयास येत आहे. आज अनेक लहान मुलं बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वाळूत खेळताना दिसतात. अनेक जोडपी छप्पर असलेल्या विकर बीचच्या खुर्च्यांवर आराम करताना पाहायला मिळतील, अनेक कुटुंबे याच ठिकाणी पतंग उडवण्याची मजा घेत आहेत. नव्याने तयार केल्या गेलेल्या विशेष वॉच टॉवर्सवरून जीवरक्षक पोहणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवून असतात. २०१८ पासून प्रोराला अधिकृतपणे ‘रिसॉर्ट’चा दर्जा मिळाल्याने ‘टुरिस्ट रिसॉर्ट रेल्वे’ आता ओल्ड केडीएफ कॅम्पलाही थांबते.
प्रोराच्या ब्लॉक २ इमारतींचाही आता कायापालट झाला असून, दर्शनी भागावरील पांढरा रंग आपले ठळक अस्तित्व दाखवून देतो. या इमारतींमधील सर्वच खोल्यांना काचेच्या बाल्कनी असून याच विभागात ‘प्रोरा सॉलिटेअर’ नावाचे अपार्टमेंटल हॉटेल आणि स्पा आहे. मूळ प्रोरामध्ये सार्वजनिक स्नानगृहांसह १२.५ चौरस मीटरच्या खोल्या होत्या. पण आता सुट्टी घालवण्यासाठी येणारे पर्यटक २८ ते १२० चौरस मीटर्सच्या प्रशस्त आणि आलिशान हॉलीडे अपार्टमेंटमध्ये राहतात. यामध्ये प्रत्येक खोलीसाठी वेगळे बाथरूम आणि पूर्णतः सुसज्ज किचनसुद्धा सामाविष्ट आहे.
नव्याने विकसित केलेल्या स्पा-क्षेत्रात सौना (वाफेच्या स्नानाचे ठिकाण) आणि इनडोअर स्विमिंग पुल आहेत. बाहेरील दोन प्रशस्त पूल लहान मुलांसाठी तयार केले आहेत. रिसेप्शन डेस्कच्या मागच्या भिंती झाडांनी झाकल्या गेल्या आहेत. एक प्रचंड स्क्रीन बाल्टिक समुद्राचे विहंगम दृश्य दाखवते. तसेच ब्लॉक II मध्ये, हेअरड्रेसिंग सलून, बुटीक, इटालियन रेस्टॉरंट, फिश सँडविच असलेले बिस्ट्रो, बर्गर रेस्टॉरंट, कॅफे आणि बेकरी आता उघडले आहेत. याठिकाणी सायकलही अत्यंत काळजीने चालवावी लागते एवढी वर्दळ आहे. ब्लॉक III मध्येही आता हॉटेल बांधले जाणार आहे.
ब्लॉक IIIच्या मागे केडीएफ कॉम्प्लेक्सचे ऐतिहासिक केंद्र आहे. याठिकाणी फेस्टिवल हॉल, कॅफे, स्विमिंग पूल , जिम्नॅस्टिक, कॉन्सर्ट हॉल आणि थिएटरची योजना होती. याठिकाणी प्रोरा डॉक्युमेंटेशन सेंटर २००४ पासून मॅचरलऑब (MATCHUrlab) हे कायमस्वरूपी प्रदर्शन पाहणे मजेदार ठरते.
येथील समुद्रकिनाऱ्यावरील रम्य नैसर्गिक आणि शांत वातावरण युरोपातील तसेच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी रेल्वेने अत्यंत सुलभतेने पोहोचता येते, तसेच बिनझमधील सुट्ट्यांसाठीच्या ठिकाणांपेक्षा तुलनेने हे ठिकाण कमी खर्चिक आहे. प्रोराच्या अनेक भागांवर सध्या बांधकामे सुरु आहेत.
तरी हॉटेल आणि स्पा यांबरोबरच सुपरमार्केट आणि डॉक्टरांची कार्यालये ऐतिहासिक केंद्रात नियोजित आहेत. याउलट, ब्लॉक IV चे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सुट्टीसाठी तसेच इतर अपार्टमेंटस, वृद्धांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. ब्लॉक V च्या समोर “जगातील सर्वात लांब युथ हॉस्टेल” २०११ साली उघडण्यात आले.
प्रोरामध्ये निसर्गसौंदर्याची काहीच कमी नाही. याठिकाणी वनस्पती आणि प्राण्यांमध्ये बरीच जैवविविधता आहे, अनेक वर्षे हे ठिकाण बंद असल्याने कितीतरी प्राणी येथे पाहायला मिळतात. वटवाघळांच्या काही दुर्मिळ प्रजातींबरोबरच विविध प्राण्यांच्या अशा अनेक दुर्मिळ प्रजातींनी नव्या कोलोससमध्ये आपले बस्तान ठोकले आहे.
प्रोरा नॅचरल हेरिटेज सेंटरचे परस्परसंवादी प्रदर्शन कोलोससपासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. याठिकाणी पर्यटकांना प्रोरामधील जैवविविधतेवर माहिती दिली जाते. नॅचरल हेरिटेज सेंटर म्हणजे एक उंच, गोलाकार मानवनिर्मित इमारतसमान रचना असून, त्याठिकाणी ४० फूट उंच ट्रीटॉप टॉवर आहे. हा टॉवर व्हीलचेअर वापरणाऱ्या दिव्यांगांसाठीही उपलब्ध आहे.
हि*टल*र आणि ना*झींचे ज्यू*द्वेष आणि आर्यन प्रेम सगळ्यांनाच ज्ञात आहे. म्हणजेच हा वीस हजार लोकांचा सागरी रिसॉर्टसुद्धा ‘आर्यन’ लोकांसाठीच होता. १९३९ पासूनच्या केडीएफच्या जाहिरातींमध्ये केडीएफ कॉम्प्लेक्सच्या रेखाचित्रासमोर एक गोरे जोडपे दाखवले गेले होते.
प्रोरा, त्याचा भूतकाळ, त्याची वास्तुकला आणि खाजगी गुंतवणूकदारांनी याचे केलेले नूतनीकरण नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. काही पर्यटकांना या नूतनीकरणामुळे हा संकुल जाचक वाटतो, तर काही पर्यटक इतके नैसर्गिक सौंदर्याने नटलेले स्थळ वाया गेले नाही याबद्दल समाधानी आहेत. हे विवादास्पद संकुल येथे येणाऱ्या प्रत्येकालाच विचार करण्यास भाग पाडते. याठिकाणी भेट देणारे सर्वच पर्यटक विचारांची देवाणघेवाण करतात.
भूतकाळ आणि वर्तमान दोघांचाही संगम ‘प्रोरा’मध्ये झाला आहे. हे एक प्रभावी स्मारक तर आहेच शिवाय आता हे सुट्टीचेसुद्धा एक आकर्षक ठिकाण आहे. जर्मनीच्या सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर सुट्टी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ‘प्रोरा’ आज खुले आहे. कदाचित इतिहासकाळात ते ज्यासाठी तयार केलं गेलं ते उद्देश आज पूर्ण होत आहे. हे एक अद्वितीय मिश्रण आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.