आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आमच्या गावात एकदा दोन भावांची जोरदार भांडणं सुरू होती. ते दोघेही जीव खाऊन एकमेकांशी भांडत होते आणि आजूबाजूचे लोक त्यांचा हा गोंधळ पाहत होते. भांडणाचा विषय एकदम किरकोळ होता. जनावरं बांधण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. बर, ज्या जागेवरून वाद सुरू होता ती जागा सामाईक होती त्यामुळं त्यावर तोडगा कसा काढावा? असा प्रश्न गावातील कारभारी लोकांना पडला होता. त्यावर त्यांनी एक नामी युक्ती काढली. सामाईक जागेवर एक दिवस मोठ्या भावानं जनावरं बांधायची तर एक दिवस लहान. यामुळं दोघांमधील वाद सुटला.
आता तुम्ही म्हणाल, ही काय जागेची भांडणं सांगत बसलीये. आपल्याला हा मुद्दा एकदम शुल्लक वाटत आहे. मात्र, अशाच स्वरुपाचा वाद युरोपमधील दोन देशांमध्ये देखील सुरू होता. तो वाद होता नदीतील एका बेटाच्या हद्दीचा. कित्येक वर्ष सुरू असलेला हा वाद मिटवण्यासाठी त्या दोन देशांनी देखील गावातील कारभाऱ्यांसारखीच शक्कल लढवली. त्यांनी वर्षातील सहा-सहा महिने बेटाचा मालकी हक्क वाटून घेतला. युरोपमधील हे दोन देश कोणते आहेत? खरंच प्रत्येक सहा महिन्यानंतर या बेटाची देश बदलतो का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…
कुठल्याही नकाशावर आंतरराष्ट्रीय सीमा या द्विमितीय असतात. अक्षांश आणि रेखांश असलेल्या कागदाच्या सपाट शीटवर त्या सहज शोधल्या जाऊ शकतात. वास्तविक जीवनात भूप्रदेश त्रि-आयामी असतात काही सीमा देखील अशा असू शकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर शीतयुद्धादरम्यानच्या फ्रेडरिकस्ट्रास स्टेशनचं घेता येईल. त्याठिकाणी कोणीही फक्त पायऱ्या चढून पश्चिम बर्लिनमधून पूर्व बर्लिनमध्ये जाऊ शकत होतं.
परंतु जगात एक चार-आयामी सीमादेखील आहे आणि ती काळानुसार मागे-पुढे होते. ही सीमा आहे फिजंट आयलंडची. फिजंट आयलंड हे फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांच्या दरम्यान वसलेलं आहे. फिझंट आयलंड हे जगातील सर्वात जुनं कॉन्डोमिनियम आहे.
सॅन सेबॅस्टियनच्या पूर्वेस, बिस्केच्या उपसागरापासून फक्त एक किंवा दोन मैलांवर फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेदरम्यान बिडासोआ नदीत हे आयलंड आहे. या बेटाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बेटावर फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांचे हक्क आहेत. याठिकाणी वर्षातील 6 महिने फ्रेंच सरकारची सत्ता असते तर उर्वरित ६ महिने स्पेनची. १६५९ मध्ये पीयरनीसच्या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून फिझंट आयलंडमध्ये अशीच स्थिती आहे. विशेष म्हणजे हे जगातील सर्वात लहान कॉन्डोमिनियम देखील आहे कारण याचं क्षेत्रफळ फक्त 1.5 एकर इतकं आहे. आपल्याकडील काही मॉलसुद्धा याच्यापेक्षा मोठे आहेत.
१६५९मधील पीयरनीस करारापूर्वी जवळपास ३० वर्षे स्पेन आणि फ्रान्सचा या बेटासाठी वाद सुरू होता. शेवटी फ्रान्स आणि स्पेनच्या प्रतिनिधींनी पीयरनीसमध्ये एकमेकांना भेटून समान हक्काच्या करारावर स्वाक्षऱ्या करून अधिकृतपणे तीस वर्षांचे युद्ध संपुष्टात आणलं. या करारानुसार एक नवीन सीमा देखील काढण्याच आली जी पीयरनीस पर्वताच्या बाजूने जाते आणि नंतर बिडासोआ नदीतून अटलांटिक महासागरातील बिस्केच्या उपसागरापर्यंत जातं. या नवीन सीमेमुळं फ्रान्स आणि स्पेन दरम्यान नैसर्गिक सीमा तयार झालेली आहे. तेव्हापासून फिझंट आयलंड एक कॉन्डोमिनियम बनलेलं आहे.
कॉन्डोमिनियम हा एक असा प्रदेश असतो ज्यावर अनेक राष्ट्रांचं समान वर्चस्व आणि सार्वभौमत्व असतं. अंटार्क्टिका हे देखील कॉन्डोमिनियमचंच एक उदाहरण आहे. सतराव्या आणि अठराव्या शतकात अनेक लहान-मोठे कॉन्डोमिनियम अस्तित्त्वात होते. परंतु त्यांचं अस्तित्व जास्त काळ टिकलं नाही. कारण, कॉन्डोमिनिअम व्यवस्थेच्या यशासाठी सर्व सहभागी पक्षांचे सहकार्य आवश्यक असते. एकदा का सहभागी पक्षांमध्ये काही गैरसमज निर्माण झाला तर कॉन्डोमिनिअमवरून वाद सुरू झालाचं म्हणून समजा. सुदैवानं अद्याप फिजंट आयलंडबाबत असं काही घडलेलं नाही.
कॉन्डोमिनियम प्रदेशावर अनेक राष्ट्रांचं समान वर्चस्व आणि सार्वभौमत्व असतं, ही गोष्ट जरी खरी असली तरी फिजंट आयलंडच्या बाबतीत ही व्यवस्था थोडी वेगळी करण्यात आलेली आहे. याठिकाणी स्पेन आणि फ्रान्स एकाचवेळी आपली मालकी सांगत नाहीत. त्यांनी सहा-सहा महिन्यांचा कालावधी वाटून घेतलेला आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात फ्रेंच प्रतिनिधी, फिझंट बेट स्पॅनियर्ड्सच्या स्वाधीन करण्यासाठी स्पॅनिश अधिकाऱ्यांना भेटतात. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्पॅनिश अधिकारी हेच बेट फ्रेंचांच्या ताब्यात देतात. आतापर्यंत सातशेपेक्षा अधिक वेळा ही प्रक्रिया घडली आहे. भूगोल अभ्यासक फ्रँक जेकब्स यांनी याला ‘पिंग-पाँग’ची उपमा दिली आहे.
युद्ध आणि पीयरनीस करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी, फिझंट बेटाचा वापर एक तटस्थ ठिकाण म्हणून केला जात असे. फ्रेंच आणि स्पॅनिश सम्राटांमधील बैठका, कैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी या ठिकाणाचा वारंवार वापर केला जात असे. त्यामुळं या बेटावर अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत.
याच फिझंट आयलंडवर फ्रेंच राजा लुई तेरावा आणि त्याची स्पॅनिश वधू आना ऑस्ट्रिया यांची भेट झाली होती. त्यावेळी आनाचा भाऊ फिलिप चौथा आणि राजा लुईची बहिण एलिझाबेथ यांची प्रेमकहाणी सुरू झाली. त्यानंतर, लुई आणि आनाचा मुलगा लुई चौदावा हा देखील भावी पत्नी मारिया थेरेसाला (स्पॅनिश) भेटण्यासाठी फिजंट आयलंडवरच गेला होता. त्यानंतर पुढील कित्येक वर्षे याठिकाणी दोन्ही देशांतील वधू-वरांची लग्न जुळवली गेली. त्यातील काही यशस्वी झाली तर काही नाती शेवटपर्यंत टिकली नाहीत.
सध्या फिजंट आयलंडवर पर्यटकांना येण्यास परवानगी नाही. कारण या बेटाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह आणि त्याच्या देखभालीतील निष्काळजीपणामुळं फिजंटचा सुमारे अर्धा भाग नष्ट झाला आहे. त्यामुळं बेटाची काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर ही ऐतिहासिक जागा काळाच्या ओघात नष्ट होण्यास जास्त वेळ लागणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.