आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताला हजारो वर्षांची धार्मिक परंपरा आहे जी आपल्या ऋषींनी प्रयत्नपूर्वक, श्रद्धेने निर्माण केली. हिंदू धर्मातल्या विविध पंथांची प्रत्येकाची उपासना पद्धती वेगळी, उपास्य दैवत वेगळे, त्यांची उपासना करण्याचं स्थान वेगळं, अशा विविधतेतून आपली परंपरा विकसित झाली. मूळ भारताच्या म्हणजेच सध्याच्या अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून अगदी आपल्या देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत, पहायला गेलं तर मंदिरं आणि त्यांचे स्थापत्य हा वैशिष्ट्याचा भाग आहे.
आपल्याकडे जशी स्वयंभू दैवतांची मंदिरं आहेत तशीच बाकीची ध्यान, दर्शन यासाठी बांधली गेलेली मंदिरं आहेत. आणि त्यातलंच एक आपल्याला फारसं ज्ञात नसलेलं पण एक आगळंवेगळं, महत्त्वाचं असं तिर्थस्थळ, मंदिर म्हणजेच जयपूरचं गलताजी मंदिर !
संत गालव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्या भागात, ज्या परिसरात तपश्चर्या केली तो हा गलताजी मंदिराचा परिसर. संत गालव यांच्या तपश्चर्येचा काळ हा शंभर वर्षांचा होता असं सांगितलं जातं. त्यांच्या तपस्येचं फळ म्हणून स्वतः देवाने त्यांना दर्शन तर दिलंच पण या भागात मुबलक असा पाण्याचा साठा निर्माण केला.
संत गालव यांच्या स्मरणार्थच या मंदिराची उभारणी केली गेली आणि त्यांच्या नावावरूनच या मंदिराला, या मंदिर परिसराला गलता मंदिर म्हटलं जातं.
जयपूर शहर हे सांस्कृतिक परंपररेसाठी आणि त्याच्या कलात्मक बांधणीसाठी ओळखले जाते आणि आज जयपूर हे एक उत्तम, प्रसिद्ध असं पर्यटनस्थळ आहे. याच जयपूरमध्ये १८व्या शतकात एक राजा होऊन गेला, तो म्हणजे राजा सवाई जयसिंग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात ज्या मिर्झा राजा जयसिंगचा उल्लेख येतो त्याचा हा वंशज. जयपूर शहराला एका अर्थाने ओळख प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा वाटा राजा सवाई जयसिंगाचा आहे.
जयपूर, दिल्ली येथे येणाऱ्या जंतरमंतर या वेधशाळा असो किंवा आधुनिक बांधकाम कलेचा उपयोग करून बांधलेलं आणि रचलेलं जयपूर शहर असो, या सर्वांची निर्मिती सवाई जयसिंग आणि त्याच्या पुढच्या काळात केली गेली.
त्याच जयसिंगाने हे गलताजी मंदिरही बांधले जे मूळ जयपूर शहरापासून अगदी १० किलोमीटरच्या अंतरावर आहे. जे फक्त एकच मंदिर नसून सुंदर, सुबक अशा विविध मंदिरांचा समूह आहे. जयपूरला ‘पिंकसिटी’ म्हणून ओळखलं जातं ते तिथे बांधल्या गेलेल्या गुलाबी रंगी दगडांच्या इमारतींमुळे. याच गुलाबी दगडांपासून गलता मंदिराची बांधणी केली गेली आहे.
मंदिर परिसरात पाण्याचे ७ तलाव (कुंड) आहेत. या सर्व सातही कुंडांना गोमुखी अशा रचनेतून पाण्याचा पुरवठा सातत्याने होत असतो. त्यातल्या सगळ्यात मोठ्या आणि तेवढ्याच जास्त खोल असणाऱ्या तलावाला ‘गलता कुंड’ म्हटलं जातं. यामध्ये उतरणंही तसं साहसाचंच मानलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत, कार्तिक महिन्यात, एकादशी, पौर्णिमा, अशा सणाच्या, उत्सवांच्या वेळी येणारे काही धाडसी प्रवासी, भाविक या तलावात उतरण्याचं धाडस करतानाही दिसतात.
त्याचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे. या पाण्यात उतरणं, त्यात स्नान करणं हे पवित्र मानतात आणि याचे औषधी गुणही आहेत असं स्थानिकांकडून सांगितलं जातं. यामध्ये मारलेली एक डुबकी,केलेली एक अंघोळही आपल्या पापांचं निवारण करते असं मानलं जातं.
या कुंडाचं/तलावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की हा गलता कुंड कधीच आटत नाही. हा कुंड कायम पाण्याने भरलेला असतो.
या स्वतंत्र मंदिराच्या परिसरातही अनेक मंदिरांचा समूह आहे असंही म्हणता येईल. विस्तीर्ण अशा परिसरात विविध मंदिरं आहेत त्यात सर्वात उंचीवर एक सुर्यमंदिरंही दिसून येतं. मंदिर परिसरात एक असं मंदिर आहे जे सहसा आपल्याला इतरत्र दिसून येत नाही ते म्हणजे ब्रह्मदेवांचं मंदिर.
सामान्यपणे विष्णूचे बाकी अवतार, महादेव, तसेच बाकीची देवांची मंदिरं आपण बघितली आहेत, अगदी ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव दिसतात अशा श्री दत्तगुरूंची मंदिरंही आहेत. पण फार क्वचित दिसणारं असं ब्रह्मदेवासाठीचं असं स्वतंत्र मंदिर या गलता मंदिर परिसरात आपल्याला दिसून येतं. या मंदिराची निर्मिती चौदाव्या शतकात केली गेली.
सुर्यमंदिर किंवा अगदी ब्रह्मदेवाचं स्वतंत्र मंदिर आहे हे आपण बघितलं पण या गोष्टीही फिक्या वाटतील असं एक आश्चर्यही या ठिकाणी आहे, ते म्हणजे या भागात असणारं विष्णू मंदिर. ज्याला ‘रामगोपाल’ मंदिर असं म्हटलं जातं. नावावरून आपल्या लक्षात येतं ते म्हणजे राम आणि कृष्ण दोन्ही देव जे विष्णूचे दोन अवतार आहेत, त्यांचं हे मंदिर.
खरंतर राम अवतार हा त्रेतायुगातला तर कृष्ण अवतार हा द्वापारयुगातला. हे दोन स्वतंत्र अवतार एकाच ठिकाणी, एकाच मंदिरातच नाही तर, एकाच मूर्तीमध्ये दिसून येतात ती मूर्ती आहे, या ‘रामगोपाल’ मंदिरात. हे मंदिर त्याच्या स्थापत्यशास्त्रासाठीही ओळखलं जातं.
अशीही एक आख्यायिका सांगितली जाते की संत तुलसीदासांच्या प्रार्थनेमुळे स्वतः श्रीकृष्ण हे श्रीरामचंद्रांच्या रुपात येथे प्रकट झाले होते, त्याचमुळे या मंदिरात रामगोपाल दोघेही दिसून येतात. तुलसीदासांनी त्यांच्या ‘रामचरितमानस’चा काही भागही येथेच लिहिला असे सांगितले जाते.
अनेक मंदिरांच्या या परिसरात सीताराम मंदिर, हनुमान मंदिर अशीही मंदिरं आहेत आणि या मंदिराच्या मुख्य आकर्षणाचा किंवा आश्चर्याचा भाग म्हणजे येथील हनुमान मंदिराच्या परिसरात असणारी अगणित माकडं. या भागात गेल्यावर सहज नजरेला पडतं की, मंदिराचा परिसर हा माणसांपेक्षा माकडांनीच जास्त गजबजलेला असतो.
माणसांच्या मागे लागणारी, न भिणारी, अशी माकडं हनुमंताच्या मंदिराच्या आसपासच मोठ्या प्रमाणात दिसतात. हे मंदिर मुळात माकडांच्या विविध जाती-प्रजातींसाठी ओळखलं जातं. कोणत्याही देवासाठी काही करणं हे पुण्याचं लक्षण मानलं जातं तसच याठिकाणी या हनुमान मंदिर परिसरातल्या या ‘माकडांना, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लाला काही खायला देणं’ हेही पवित्र तलावात स्नान करण्याएवढंच पुण्याचं आणि आपल्या पापांचा नाश करणारं समजलं जातं.
जयपूर शहराच्या बांधणी काळातच या मंदिरांची निर्मितीही केली गेली. स्वतः जयसिंग परिवार हा बड्या गोष्टींचा शौकीन, त्यामुळे त्यांनी या शहरात आणि भारतभरातही भव्य अशा वास्तूंची उभारणी केली केली जी खरोखरच नेत्रदीपक आहेत. त्याचवेळी हे गलताजी मंदिर बांधलं गेलं त्यामुळे त्यातही या भव्यतेचा नमुना दिसून येतो.
ही मंदिरे किंवा हा एकूण परिसर हा आपल्या नेहमीच्या पारंपरिक मंदिरांसारखा नाही हे विशेष. राजस्थानी किंवा कोणत्याही भव्य अशा महाल किंवा हवेलीसारखी रचना या मंदिर समूहाची केल्याचं दिसतं. यांची रचना, भव्यता, त्याच्या भिंतीवर असणारी चित्रकला, रंगसंगती, कलाकुसर याही बाबी इतर मंदिरांपेक्षा वेगळ्या ठरतात.
संत गालव यांच्या वास्तव्यामुळे आलेलं पावित्र्य, आजही या भागात दिसणारे साधू, योगी, तसेच भजन-मंत्रजप करणारे भाविक अशांनी हा परिसर भरलेला असतो. त्यामुळे भाविकांनी आणि विशेषतः ज्यांना फिरण्याची, अशी आगळीवेगळी ठिकाणं बघण्याची हौस आहे अशांनी या मंदिराची सफर एकदा तरी करावी, इथे असलेली नैसर्गिक शांतता, पवित्र वातावरण अनुभवावं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.