The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटेश्वर मंदिराचा हा अपरिचित इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

by द पोस्टमन टीम
14 February 2025
in भटकंती, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


 लेखक – सागर बोरकर


पाटेश्वरला पोहचलो तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे हिरवेगार वातावरण होते. पाटेश्वराच्या मुख्य मंदिरापर्यंत जायला दीड दोन किमी पायी चालावे लागते. सुरवातीची चढण सोडल्यास नंतर बराचसा रस्ता सरळ आणि दाट झाडीतून जाणारा आहे.

पाटेश्वर मंदिराच्या आधीच एक विशाल पुष्करणी खोदलेली आहे. पुष्करणीच्या शेजारीच एक मठ असून त्याच्या बाजूने असलेल्या पायर्‍यांनी पाटेश्वरच्या मुख्य मंदिरापाशी जाता येते. वर चढत जाणार्‍या पायर्‍या, वाटेत दिवे ठेवण्यासाठी बाजूच्या भिंतीमध्ये खोदलेल्या खाचा आणि भिंतीच्या आतल्या बाजूच्या मूळच्या कातळात कोरलेल्या शिवपिंडी अशी या मार्गाची रचना. मुख्य मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून त्याचे बांधकाम किंवा जीर्णोद्धार १८ व्या शतकात सरदार अनगळांनी केला.

 


thepostman
पाटेश्वर मंदिर आणि नंदीमंडप

मंदिर सर्व बाजूंनी तटांनी बंदिस्त केले आहे. नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना. आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरे असून त्यात वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

मंदिराच्या सभामंडपात महिषासूरमर्दिनी, विष्णू, स्कंद, आणि स्त्रीरूपी गणेश म्हणजेच गणेशिनी किंवा विनायकी अशा मूर्ती कोरलेल्या दिसतात. तर गर्भगृहात पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग आहे. जणू काही हे एक शिवपंचायतनच.

शिवलिंग आणि शंकराची मूर्ती अशा दोन्ही स्वरूपातील मूर्ती या मंदिरात दिसतात. पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग हे लिंग रूपात तर बाजूच्याच एका लहान मंदिरात शंकर मूर्तरूपात कोरलेला आहे. हे मूर्तस्वरूप पण साधेसुधे नाही तर चतुर्मुखी आहे. एकाच धडावर एकाच रेषेत चार शिरे कोरलेली आहे. ही मूर्ती ब्रह्मदेवाची म्हणून अगदी सहजच फसगत होते, पण नीट निरखून बघायला एका हातात त्रिशुळ तर दुसर्‍या हातात कमंडलू आणि दंडावर सर्पमुखी बाजूबंद तर डोक्यावर अर्धचंद्र कोरलेला दिसतो. अजूनच काळजीपूर्वक बघता प्रत्येक शिराच्या कपाळावर कोरलेला तिसरा डोळाच दिसायला लागतो आणि हा शंकरच याची अगदी खात्रीच पटते. आहे की नाही गंमत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

thepostman
महिषासुरमर्दिनी आणि चतुर्मुखी शिव

आता पाटेश्वर बघण्यातील खरी मजा मात्र हे मंदिर बघण्यात नाही, तर ती आहे इथला अद्भूत लेणीसमूह बघण्यात, इथली तर्‍हेतर्‍हेची शिवलिंगे बघण्यात, इथल्या गूढरम्य वातावरणात हरवून जाण्यात आणि याची सुरवात होते ती मठाजवळच पायर्‍यापांशी असलेल्या एकमुखी शिवलिंगाने. एकाच वेळी सयोनी, अयोनी आणि मूर्तरूपात असलेली अशी शिवलिंगे विरळच.

सयोनी शिवलिंग म्हणजे आपण नेहमी शाळूंकेसहित जे शिवलिंग पाहतो ते तर अयोनी म्हणजे खालची शाळूंका नसून फक्त वरचा लिंगस्वरूपाचा भाग असलेली पिंडी.

चौकोनी शाळूंका तिच्यात कोरलेले मुख्य दाढी मिशा असलेले एकमुखी शिवलिंग आणि बाजूने कोरलेली अयोनी पद्धतीची ५७ शिवलिंगे अशी याची रचना. तर याच्या बाजूलाच एका शिवपिंडीच्या शाळूंकेत एक मुख्य सयोनीज शिवलिंगे आणि त्याच्या बाजूने सरळ उभ्या रेषेत कोरलेली असंख्य लहान लहान सयोनीज शिवलिंगेच कोरलेली आहेत तर अजून थोडे पुढे जाताच एक आयताकार शिवलिंग दृष्टीस पडते शिवलिंग व त्यापुढच्या तीन शिल्पपटात ५ अयोनीज पद्धतीची लिंगे, मध्ये कलश तर त्याच्या बाजूला एका वर्तुळात कोरलेली पाच अयोनीज शिवलिंगे. जणू पंचमहाभूतांचे हे प्रतिकच.

thepostman
एकमुखी लिंग, सयोनीज शिवलिंगे व पंचमहाभूतांचे प्रतिक असलेले शिवलिंग

आता मठाच्या बाजूने खालच्या बाजूने जाता जाता मुख्य लेणीसमूहाचा परिसर लागतो. या लेण्या अत्यंत प्राचीन. यांच्या काळाचा मागोवा घेतला असता त्या कमीतकमी १०००/१२०० वर्षे तरी जुन्या आहेत हे लक्षात येते. सातार्‍याच्या या भागावर राज्य होते ते शिवभक्त शिलाहारांचे तेव्हा यांच्याच राजवटीत ही लेणी खोदली गेलेली असणे हे सहज संभवनीय आहे. पण हा सगळाच लेणीसमूह तांत्रिक शिवभक्तीचा प्रकार वाटतो.

सुरुवातीच्या एका गुहेत सयोनी शिवलिंगे तर त्याच्या शाळूंकेभोवतीच कोरलेली लहान लहान शिवलिंगे अशा स्वरूपाचा शिवलिंगांचा एक समूहच दृष्टीस पडतो तर बाजूच्या दोन गुहांमध्ये विशाल शिवलिंगे दृष्टीस पडतात एका गुहेमध्ये कमरेएवढे पाणी तर दुसरी गुहा कोरडी आणि त्यातही गंमत म्हणजे शिवपिंडीच्या शाळूंकेचा निमुळता भाग हा नेहमी लिंगाच्या उजव्या बाजूकडे असतो येथे मात्र लिंगाच्या डाव्या बाजूला कोरलेला आहे. हा तंत्रपूजेचा एक प्रकार दिसतो.

या लेणीच्या पुढ्यातच अजून एका गुहेत एक अद्भूत मूर्ती आहे. हा मुळचा गुहेचाच भाग पण याच्या बाजूने आता मंदिरासारखे बांधकाम केलेले आहे. आतली मूर्ती संपूर्ण कोरीव आहे. बैलासारख्या दिसणार्‍या चेहर्‍यात मानवी मुख कोरलेले आहे. ही मूर्ती आहे अग्नीची-अग्नीवृषाची. सात हात, प्रत्येक हातात कोरलेले आयुध किंवा हस्तमुद्रा, दोन मस्तके, तीन पाय असलेली ही मूर्ती समोरून न पाहता बाजूने पाहिली असता हुबेहुब नंदीचीच दिसते.

ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८ व्या सूक्तातील तिसर्‍या श्लोकात याचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे आणि ही मूर्ती अगदी त्याबरहुकूम बनवण्यात आली आहे.

चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||

अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.

thepostman
अग्नीवृष

हा लेणीसमूह बघून थोडे अजून पुढे जाताच अजून एक लेणीसमूह दृष्टीस पडतो. तटांनी बंदिस्त केलेले प्रवेशद्वार, प्रवेशद्वारातच कोरलेला नंदी आणि आतल्या बाजूला तीन गुहांचा समूह अशी याची रचना. हा नंदी पण वेगळ्याच तर्‍हेने कोरलेला आहे.

मूर्ती अतिशय देखणी आहे पण जणू काही हा नंदी कुठे पळून जाऊ नये म्हणून त्याला साखळदंडाची अतिशय घट्टपणे वेसण घातलेली आहे. भक्तीपेक्षा हा प्रकार भयाचाच जास्त वाटतो.

पाटेश्वरातील सर्वात जास्त अद्भूत शिवलिंगे याच लेणीसमूहात साकारली गेली आहेत. या लेणीसमूहातील तीनही लेण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे इथल्या गुहांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टीऐवजी शिवलिंगे कोरलेली आहेत. लिंगायतांच्या देवळांत हा प्रकार प्रामुख्याने पाहावयास मिळतो.

गुहांच्या बाहेरील बाजूस दोन वेगळ्या प्रकारची शिवलिंगे कोरलेली दिसतात. त्यातले एक म्हणजे चतुर्मुख शिवलिंग. शिवलिंगावर चार दिशांत कोरलेल्या चार मस्तकांनी हे शिवलिंग बनलेले आहे. ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य यांचे प्रतीक. याच्या बाजूलाच असलेले दुसरे शिवलिंग याहूनही अद्भूत. याच्या शाळूंकेवर लिंगाऐवजी चक्क दोन उपडे घटच कोरलेले दिसतात. तर त्याच्या बाजूने काही अयोनी स्वरूपातील लिंगे कोरलेली दिसतात.

thepostman
शिवलिंगाची पट्टी कोरलेले प्रवेशद्वार, प्रवेशद्वारातील नंदी, चतुर्मुख शिवलिंग, घट असलेले शिवलिंग

ही शिवलिंगे बघून उजवीकडच्या गुहेत गेलो असता अजूनच काही वेगळ्या प्रकारची शिवलिंगे दृष्टीस पडतात. ही गुहा त्रिस्तरीय रचनेची आहे. जणू काही एकात एक तीन गुहा खोदलेल्या आहेत. हा भाग पूर्ण अंधारी आहे. सुरुवातीच्या भागात दोन चौकोनी शाळूंकांवर शिवपिंडीच्या जागी कमलफुलांची सुंदर रचना दिसते तर अंधारात जरा डोळे सरावल्यावर याच्याच बाजूच्या एका भिंतीत एक आगळी मूर्ती कोरलेली दिसते. बैलाच्या पाठीवर चक्क एक शिवलिंगच कोरलेले दिसते. जणू हा नंदी शंकराला आपल्या पाठीवर वाहून नेतो आहे. याच गुहेच्या आतल्या भागात एका शिवलिंगाच्या भोवती शाळूंकेवर अयोनी लिंगे कोरलेली आहेत, तर दुसर्‍या एका शिवपिंडीचे लिंगच अयोनी लिंगानी भरून गेलेले दिसते. तर अजून एका बाजूला यज्ञवेदीसारखे एक सहस्त्र शिवलिंग दिसते त्यावरही हजार अयोनी लिंगे कोरलेली आहेत.

त्या गुहेतून बाहेर येऊन डावीकडच्या एका गुहेत तर अजून वेगळीच गंमत. या गुहेत विविध तर्‍हेची शिवलिंगे एकामागोमाग एक अशी रचलेली आहेत. काही शिवलिंगांवर लिंगाऐवजी दोन खड्डे तर काहींवर पिंडी मात्र या सगळ्या शिवपिंडीच्या सभोवतीने असंख्य लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.

 

thepostman
सहस्त्र लिंग, डावीकडच्या गुहेतील शिवलिंगे आणि सूर्यमूर्ती असलेला शिवलिंगपट

ही गुहा बघून आता समोरच्या मुख्य गुहेत प्रवेश केला. ही गुहा अत्यंत रहस्यमय, सर्वात मोठी आणि शिवलिंगांचे विविध प्रकार असलेली. इथे मध्ये प्रमुख भलेमोठे शिवलिंग, त्यावर कोरलेली अयोनीज शिवलिंगे, आणि बाजूच्या तीन्ही भिंतीवर प्रत्येकी एक एक असे तीन शिल्पपट कोरलेले शिवाय बाजूला इतर शिवलिंगेही आहेतच.

शिवलिंगाचे हे प्रकार मात्र अष्टोत्तरशत किंवा सहस्त्र लिंगाचे. यामध्ये शाळूंकेवर असलेल्या शिवलिंगात १०८ किंवा १००० लहान लहान लिंगे कोरलेली आढळतात. येथेच बाजूला एक धारालिंगही दिसते. यामध्ये शिवलिंगावर उभ्या पन्हाळ्या पाडलेल्या असतात जेथे दोन नलिका मिळतात तेथे साहजिकच धार उत्पन्न होते म्हणून हे धारालिंग अथवा नलिकालिंग.

बाजूच्या भिंतीवरील एका शिल्पपटामध्ये देवीचे-पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. तर त्याभोवती लहान लहान अयोनीज लिंगे कोरलेली आहेत. ती आहेत एकूण ९७२. देवीची १०८ सिद्धपीठे आणि प्रत्येकी पीठाची ९ वेळा पूजा करायचा असलेला प्रघात बघता हा आकडा बरोबर येतो तो ९७२ म्हणजे हे प्रतिक आहे पार्वतीपूजेचे.

मुख्य शिवलिंगाच्या पाठीमागच्या शिल्पपटांत विष्णूमूर्ती कोरलेली असून त्याभोवती १००० शिवलिंगे कोरलेली आहेत- विष्णूसहस्त्रनामाचे एक प्रतीक, तर उजवीकडच्या भिंतीवरील शिवलिंगपटांत मध्यभागी सूर्याची मूर्ती कोरलेली असून त्याभोवतीनेसुद्धा १००० शिवलिंगे कोरलेली आहेत – सूर्यसहस्त्रनामाचे हे प्रतिक. तर दोन कोनाड्यांमध्ये शंकर आणि ब्रह्मदेव मूर्तरूपात कोरलेले आहे. हे एक प्रकारे शिवपंचायतनच.

याशिवाय मंदिरातल्या एका स्तंभावर शिवदंड तर दुसर्‍या एका स्तंभावर नाग कोरलेला असून त्याभोवतीही विविध प्रकारच्या अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे. एका स्तंभावर देवनागरीतील एक बराच अस्पष्ट झालेला एक शिलालेख आहे. तर मध्यभागी असलेल्या प्रमुख शिवलिंगावर एकूण १००५ लहान लहान लिंगे कोरलेली आहेत. हे आहे सहस्त्रलिंग. खूपच अद्भूत आणि दुर्मिळ प्रकार.

खरे पाहता पाटेश्वरचा हा परिसरच अशा गूढरम्य शिवलिंगांनी नटलेला आहे. काही शिवलिंगांचे अर्थ कळण्यासारखे तर बरेचसे अनाकलनीयच. पण एक मात्र आहे देवळांत नेहमीसारखी जाणवणारी प्रसन्नता इथे मात्र जाणवत नाही. एकाकी, निर्जन परिसर, घनदाट झाडी, दाट काळोख्या गुहा, वापरात नसल्याने येणारा कुबट वास, तंत्रपूजेसाठी बनवलेली शिवलिंगे यामुळे इथे फिरताना काहीसे दडपणच जाणवते. एकूणच पाटेश्वराच्या अद्भूत लेणीसमूहाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या रहस्यमयतेत बुडून जाण्यासाठी पुन्हा पुन्हा खास इथे यायला मात्र हवेच.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: mahadevpateshwarpateshwar temple
ShareTweet
Previous Post

मिथेन उत्सर्जनामुळे वाढतोय ग्लोबल वार्मिंगचा धोका..!

Next Post

कहाणी आयर्लंडमधील बटाट्यांच्या दुष्काळाची !

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

कहाणी आयर्लंडमधील बटाट्यांच्या दुष्काळाची !

विराटच्या आधी गुरु रवी शास्त्रींनी बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहिलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.