आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एकदा मुंबईहुन लखनऊला जाणाऱ्या इंडिगो एयरलाईन्सच्या विमानात रिपब्लिक टीव्हीचे प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी आणि विनोदवीर कुणाल कामरा दोघेही एकाच वेळी प्रवास करत होते. दोघींची विचारधारा अत्यंत टोकाची विरोधाभासी असल्यामुळे कुणाल कामरा यांनी विमानातच अर्णबला प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
त्याचा व्हिडीओ देखील बनवला. अर्णबने कुणालच्या एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तो अगदी शांतपणे ऐकून घेत होता. कुणालने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅन्डलवर पोस्ट केला आणि तो वाऱ्याच्या वेगाने पसरला.
कुणाल कामरा यांच्या या कृतीवर अर्णब गोस्वामींचे समर्थक भडकले आणि त्यांनी नागरी उड्डाण मंत्री हरिदिपसिंह पुरी यांना जाब विचारण्यास सुरुवात केली.
कुणाल कमाराच्या कृत्याची अनेक लोकांनी निंदा केली तर अनेकांनी प्रशंसा देखील केली. परंतु नागरी उड्डाण मंत्री हरिदिपसिंह पुरी यामुळे चिडले आणि त्यांनी सर्व विमान कंपन्यांना कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी केली.
परिणामतः एयर इंडिगो या विमान वाहतूक कंपनीने त्यांच्याच विमानात हा प्रकार घडल्यामुळे कुणाल कामरावर सहा महिन्यांची बंदी घातली. पण हे इतक्यावरच थांबलं नाही तर स्पाईसजेट आणि एयर इंडियाने देखील कुणाल कामरावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती.
एयर विस्तारा आणि एयर एशिया या दोन कंपन्यांनी मात्र अजून बंदी घातली नसून निर्णय विचाराधीन आहे, असं म्हटलं आहे.
या कारवाई विरोधात कुणाल कोर्टात गेला असून त्याने इंडिगोकडे पंचवीस लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
पण अशा प्रकारे विमान वाहतुकीवर बंदी घातली जाऊ शकते का ? याची वैधता काय आहे ? हा निर्णय कधी झाला आणि त्याची पार्श्वभूमी काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील तर चला आपण ‘नो फ्लाय लिस्ट’ अर्थात विमान उड्डाण बंदी काय आहे आणि कोणाला लागू होऊ शकते, हे जाणून घेऊया..
‘नो फ्लाय लिस्ट’ म्हणजे काय ?
नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाची ‘नो फ्लाय लिस्ट’ ही त्या लोकांसाठी तयार केली जाते जे लोक आपल्या विमान प्रवासा दरम्यान उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
अशा उपद्रवी लोकांचा समावेश या यादीत केल्यावर त्या व्यक्तीला त्या विमान वाहतूक कंपनीच्या अथवा कोणत्याही विमान वाहतूक कंपनीच्या सेवेतून वगळले जाते.
काही काळासाठी कुठल्याही वाहतूक सेवेचा फायदा ती व्यक्ती उचलू शकत नाही.
नो फ्लाय लिस्टचा शोध हा ९/११ च्या ह*ल्ल्यांनंतर अमेरिकेत लागला, या ह*ल्ल्यानंतर अमेरिकेने अशा लोकांची यादी बनवली होती, ज्यांच्या विमान वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती.
अमेरिकेतून हे विमान वाहतूक बंदी यादीचे अथवा नो फ्लाय लिस्टचे वारे गेल्या काही वर्षांत भारतात आले आहेत. या आधी भारतात ही बंदी अस्तित्वात नव्हती.
‘नो फ्लाय लिस्ट’ कोणी तयार केली ?
नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण अशा उपद्रवी लोकांची यादी तयार करत असते. यासाठी आवश्यक ती माहिती पुरवण्याची जबाबदारी विमान वाहतूक कंपन्यांवर सोपवण्यात आली आहे.
कुठल्याही विमानात कुठलीही व्यक्ती अप्रिय व्यव्यहार करताना आढळून आल्यास त्याच्यावर ही बंदी घातली जाते.
भारतात नो फ्लाय लिस्ट कधी आली ?
मार्च २०१७ मध्ये शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एयर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याचा अपमान केला होता. असाच एक प्रकार काही महिन्यांनी अजून एक खासदार दिवाकर रेड्डी यांच्या बाबतीत घडला होता. ज्यांनी विशाखापट्टणमच्या विमानतळावर विमानात बसण्यास नकार देत, मोठा वाद घातला होता.
अशा घटनांच्या वाढत्या प्रमाणामुळे आणि एयरपोर्ट कर्मचारी तसेच विमानातील प्रवाश्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे ‘नो फ्लाय लिस्ट’ च्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी नागरी हवाई कायद्यातील सेक्शन ३ मधील, हवाई वाहतूक सिरीजच्या सहाव्या भागात नो फ्लाय लिस्टचा उल्लेख करण्यात आला आहे.
जर कुठलाही प्रवासी प्रवासादरम्यान असामाजिक व्यवहार करत असेल तर त्याच्यावर बंदी घालण्याचे संपूर्ण अधिकार ह्या कायद्यामुळे भारत सरकारला मिळाले आहे.
२०१८ साली एका मुंबईकर व्यक्तीवर विमानाच्या संडासातून उडी मारण्याची धमकी दिली आणि विमानात गोंधळ निर्माण केला म्हणून त्याच्यावर ही बंदी सर्वप्रथम घालण्यात आली होती.
नो फ्लाय लिस्टमध्ये गुन्ह्यांचे वर्गीकरण कसे केलेले आहे ?
विमानात करण्यात आलेल्या आक्षेपाहार्य प्रकारांचे वर्गीकरण करून त्यानुरूप गुन्ह्यांच्या शिक्षेची रचना करण्यात आली आहे. हा बंदीचा काळ समान नसून त्याची तीन वेगेवेगळ्या पातळीवर गुन्ह्यांच्या स्वरूपात रचना करण्यात आली आहे.
लेव्हल १ : – असंबंध व्यवहार, शारीरिक विकृत क्रिया करणे, शाब्दिक द्वंद्व इत्यादी साधारण गुन्ह्यासाठी ३ महिन्यांच्या विमान वाहतूक बंदीची योजना आहे.
लेव्हल २:- शारीरिक मारहाण करणे, छेडछाड करणे अथवा लैंगिक उत्पिडन यावर ६ महिन्यांच्या विमान वाहतुकीची बंदीची योजना आहे.
लेव्हल ३:- कोणाच्या ह*त्येचा प्रयत्न केला, कोणाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, विमानातील उपकरणांची तोडफोड केली आणि गुंडगिरीची प्रदर्शन केले तर सरळ २ वर्षांच्या बंदीचे प्रावधान करण्यात आले आहे.
ह्या बंदीच्या ह्या तीन पातळ्यांची निश्चिती जरी प्राधिकरणाकडून करण्यात आली असली, तरी कोणाला काय शिक्षा करावी याचे अधिकार हवाई वाहतूक महामंडळाकडे आहे.
या प्रकरणांचा तपास पोलीस आणि इतर तपास यंत्रणांकडून देखील वेगळ्या पद्धतीने केला जाण्याचे देखील प्रधान ह्या कायद्यात करण्यात आले आहे.
नो फ्लाय लिस्टची प्रक्रिया काय आहे ?
जर एखादी घटना विमानात घडली तर विमानातील कर्मचाऱ्यांनी याची सूचना सर्वप्रथम आपल्या वैमानिकाला करावी, वैमानिक घडलेल्या प्रकारची माहिती विमान कंपनी आणि विमानतळ अधिकऱ्यांना देतो.
पुढे विमान कंपनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन एक तपास समितीचे गठन करते आणि ती समिती प्राधिकरणाला घडलेला प्रकार आणि माणसाच्या गुन्ह्यासंबंधी तक्रार करते. ही प्राधिकरणाच्या मंडळावर वैमानिक, सरकारचे प्रतिनिधी आणि निवृत्त न्यायायमूर्ती असतात, जे ह्या प्रकरणी निर्णय घेतात.
जर संबंधित आरोपी प्रवाशाला याच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर तो या विरोधात ३० दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो. त्यावर मग पुढे समिती निर्णय घेते, शिवाय प्रवाश्याला या विरोधात सरकारविरोधात कोर्टात दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे.
सर्व एयरलाईन्सवर याचे पालन करण्याचे बंधन आहे का ?
भारतातील सर्व एयरलाईन्सने संबंधित आरोपी अथवा गुन्हेगार प्रवाशांवर बंदी घालावी असा कुठलाच नियम नाही. त्यांना जर ही बंदी लागू करायची नसेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे.
नो फ्लाय लिस्ट कुठे बघायला मिळेल ?
नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या वेबसाईटवर ही लिस्ट बघायला मिळू शकते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










