आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शूरवीर स्त्री योद्धा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर नावं येतात ती राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ, राणी पद्मावती यांची. यांच्या पराक्रमाच्या गाथा अगाध आहेत. पुरुषी वर्चस्वाला छेद देत या स्त्रिया हिंमतीने लढल्या आणि जिंकल्या. इतिहासातील प्रत्येक कर्तृत्ववान राणी कोणत्या न कोणत्या वैशिष्ट्यामुळे लक्षात राहते. ‘क्रांतीकारकांची स्फूर्तीदेवता’ म्हणून राणी लक्ष्मीबाई यांना ओळखले जाते, तर मुस्लीम समाजातील पहिली महिला शासक ‘रझिया सुलतान’ हिचे नाव येते.
या पराक्रमी स्त्रियांच्या परंपरेमध्ये राणी अमिनाचे नाव असणे हे क्रमप्राप्त आहे. तिच्या पराक्रमाच्या कहाण्या अद्भुत आहेत. आपल्या साहसासाठी प्रसिद्ध असलेल्या राणी अमिनाने आपल्या राज्याचा इतका विस्तार केला की हा तिच्या आधी आणि नंतरही कोणीच प्राप्त करू शकले नाही. २० हजार सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या राणी अमिना यांचा जीवनपट नक्कीच साधारण नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत हिंमतीने उभे राहून अमिनाने आपली ओळख प्रस्थापित केली.
राजकुमारी अमिना यांचा जन्म १५३३ साली नायजेरियातील उत्तर भागातील ‘जज्जाऊ’ येथे झाला. पूर्वीच्या काळी जज्जाऊ म्हणून ओळखला जाणारा हा समाज आता ‘जराया’ म्हणून ओळखला जातो. जज्जाऊ हे सात ‘हौसा’ राज्यांपैकी एक मानले जाते.
हौसा राज्य म्हणजे ‘हौसा’ लोकांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या राज्यांचा संग्रह होय. हा प्रदेश नायजर नदी आणि चाड तलावाच्या, आताच्या उत्तर नायजेरियामध्ये स्थित आहे. अमिना सत्तेत येण्याआधी इतर सात हौसा राज्यांपैकी जज्जाऊ हे सर्वात मोठे राज्य होते.
अमिनाच्या आईचे नाव ‘बकवा-द-होबे’ असे होते. अमिनाचे आजोबा ‘हब्बा जज्जाऊ’ यांच्या निधनानंतर तिची आई जज्जाऊची सत्ता सांभाळत होती. अमिनामध्ये लहानपणापासूनच युद्धनीतीचे, सत्ताधीश होण्याचे गुण दिसत होते. आपल्या आजोबांसोबत ती राज्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी सभांमध्ये जात असे.
आपली आई कारभार कसा चालवते याकडे तिचे लक्ष होते. आपल्या आईला आदर्श मानून ती चालत होती. जज्जाऊची प्रजाही राणी ‘बकवा-द-हाबे’नंतर तिलाच आपल्या राणीच्या रुपात पाहत होती. युद्धशास्त्रातही तिला रस होता. तिचे हे कौशल्य बघूनच तिला सामरिक शिक्षण देण्याचे ठरवले गेले.
१५६६ च्या दरम्यान अमिनाची आई ‘बकावा-द-हाबे’चा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अमिनाचा छोटा भाऊ ‘करामा’ याने सत्ता आपल्या हातात घेतली. ‘करामा’ सत्तेत असताना अमिना सैन्यातील मोठ्या पदावर कार्यरत होती. या काळातही तिने वेळोवेळी आपल्या साहसाचे प्रदर्शन घडवले. आपल्या साहसावर आणि हिंमतीवर तिने सत्ता आणि संपत्ती प्राप्त केली होती. करामाचा कार्यकाळ जेमतेम दहा वर्षे चालला. १५७६ साली त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युनंतर सत्ता अमिनाच्या हातात आली. ‘जज्जाऊ’ची नवीन ‘हाबे’ म्हणून तिची नियुक्ती झाली.
सत्तेत आल्यावर तिने साम्राज्यविस्तारावर भर दिला. तिच्या कारकीर्दीत २०, ००० सैनिकांचे ती नेतृत्व करत होती. उत्तर आफ्रिकेतून जाणारे तीन व्यापारी मार्ग आहेत. हे व्यापारी मार्ग सहाराला पश्चिम आणि दक्षिणेला सुदान प्रदेशाशी जोडतात. या प्रदेशांवर सत्ता स्थापित करण्यासाठी ती २०,००० सैनिकांचा ताफा घेऊन सज्ज होती.
एका मागोमाग एक प्रदेश ती काबीज करत होती. या विस्तारांसोबतच तिने मोठ्या प्रमाणात जमीन बळकावली. प्रजेला नवीन व्यापाराचे मार्ग खुले करून दिले. या मार्गांचा अधिकाधिक विस्तार करण्यावर तिने भर दिला.
उपलब्ध माहितीनुसार राणी अमिनाने लग्न केले नाही. ती जो प्रदेश जिंकत असे तिथल्या एका सैनिकाला ती एका रात्रीसाठी आपला प्रियकर/नवरा बनवत असे आणि सकाळी त्याचा शिरच्छेद करत असे. आपली कहाणी, आपले रहस्य त्याने कोणाला सांगू नये म्हणून ती असे करत असे. त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की, आपली शक्ती आपण लग्नानंतर गमावून बसू अशी भीती तिला असल्याने तिने लग्न केले नाही.
राणी अमिनाला ‘वाल्स ऑफ़ अमीना’च्या ( WALLS OF AMINA) नावाने ओळखले जाते. ती ज्या प्रांतावर हल्ला करत असे त्याच्या सीमाक्षेत्राला भिंतीनी घेरून टाकत असे आणि तिथे छावणी उभारत असे. जेणेकरून तिचे सैन्य व राज्य सुरक्षित राहत असे. अजूनही तिथे या भिंती दिसून येतात. राणी अमिनाने ३४ वर्षे जज्जाऊवर राज्य केले. आपल्या कार्यकाळात तिने आपल्या साम्राज्याचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विकास केला. आपल्या साम्राजाचे सरंक्षण करण्यासाठी ती अगदी शेवटपर्यंत लढली. १६१० साली नायजेरियातील बिदाच्या युद्धादरम्यान राणी अमिनाचा मृत्यू झाला.
संदर्भ- Queen Amina: Nigerian warrior queen
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.