आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इजिप्त म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर आकाशाला भिडणारे पिरॅमिड्स उभे राहतात. या पिरॅमिड्समध्ये प्रामुख्याने जतन केले गेलेले मृतदेह ठेवलेले असतात. त्यांनाच ममी म्हटले जाते. या ममीज् इजिप्तसाठी सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पिरॅमिड्स आणि इतर ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी इथे सुरुवातीपासूनच पर्यटकांची गर्दी होत आहे.
एकेकाळी इजिप्तमध्ये प्रचंड संपन्नता होती. प्राचीन इजिप्तमध्ये तयार झालेल्या अनेक गोष्टींचा आजही आपण सर्रास वापर करत आहोत. इजिप्तला समृद्ध भूतकाळ असला तरी इतर अनेक देशांप्रमाणेच इजिप्तची अवस्था देखील बिकट झाली. कदाचित विश्वास बसणार नाही पण, आपला चरितार्थ चालवण्यासाठी तिथे लोक अक्षरश: जतन केलेले मृतदेह अर्थात ममीज् विकत असत. प्रामुख्याने युरोपियन वसाहतवादी या ममीज विकत घेत असत, त्या नेमक्या कशासाठी, जाणून घेऊया या लेखातून..
पार्टीज आणि इव्हेंट्स
इजिप्तमधील युरोपियन वसाहतवादी या ममीजचा उपयोग पार्ट्यांमध्ये करत असत. हे तथाकथित “श्रीमंत” लोक “ममी अनरॅपिंग पार्टीज” आयोजित करत, नावाप्रमाणेच या पार्ट्यांमध्ये विविध प्रकारच्या ममीज् उघडल्या जात.
औषधीय गुणधर्म
त्या कालखंडात, प्राचीन इजिप्शियन लोकांनी उत्तम प्रकारे जतन केलेल्या ममीजची पावडर बनवून ते एक औषध म्हणून वापरण्यात येत असे. पल्व्हराइज्ड प्रकारात मोडणारी ममी इतकी लोकप्रिय होती की ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अगदी अशा प्रकारच्या बनावट ममीज देखील तयार होऊ लागल्या. या ममीजमध्ये तत्कालीन इजिप्तमधील बेघर आणि भिकारी लोकांचे मांस या बनावट ममीजमध्ये भरले जात असत.
कच्च्या मालाचे उत्पन्न वाढवण्यासाठी खत
कालांतराने युरोपात औद्योगिक क्रांती झाली. सतत वाढत जाणाऱ्या उद्योगांना कच्च्या मालाची आवश्यकता भासते. जास्तीत जास्त कच्च्या मालाचे उत्पादन घेण्यासाठी खतांचा वापर करणे अनिवार्य होऊन बसले होते. इजिप्तमधून ममीज् आणून त्यांच्यापासून खतं निर्माण करण्याची प्रक्रिया अनेक युरोपियन लोकांनी सुरु केली. यासाठी इजिप्तमधून मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या आणि मनुष्यांच्या ममीज् युरोपमध्ये, विशेषतः जर्मनी आणि ब्रिटनमध्ये नेण्यात आल्या.
ममी ब्राऊन आणि शो-पीस
अनेक ममीजचा वापर ‘ममी ब्राऊन’ नावाचे रंगद्रव्य तयार करण्यासाठी देखील केला जात असे किंवा कागद तयार करण्यासाठी देखील त्यांची निर्यात अमेरिकेत केली जात असे. जसजसे एकोणिसावे शतक संपत आले, तसतसे या ममीज “शोपीस” बनत होत्या. युरोप आणि अमेरिकेतील उच्चभ्रू, श्रीमंत दुर्मिळ वस्तू जमा करणारे लोक देखील ममीज् विकत घेऊ लागले.
ज्यांना संपूर्ण ममी विकत घेता येत नसे, ते ममीमधील मृतदेहाचे काही अवयव विकत घेत असत. त्यामुळे युरोपमध्ये ममींची मागणी एवढी होती की ममीज् आणि कॅटॅकॉम्ब्स (जमिनीच्या खालील खोल्या आणि त्यांच्यामधील भिंतींमध्ये मृतदेह पुरून ठेवले जातात) उकरल्यानंतरही वाढत्या ममीजची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे प्राचीन इजिप्शियन मृतदेह शिल्लक राहत नव्हते.
ममी ब्राऊनसाठी होत असलेली ही वाढती मागणी पूर्ण न करता आल्याने फाशी झालेले गुन्हेगार, वृद्ध, गरीब आणि रोगांमुळे मरण पावलेल्या लोकांच्या मृतदेहांपासून बनावट ममी तयार केल्या गेल्या. ममी ब्राऊनमध्ये चांगली पारदर्शकता असल्याने, ते ग्लेझ आणि शेडिंगसाठी वापरले जाऊ लागले.
ममींमधून काढलेले मांस रंगांमध्ये वापरल्यास चित्रांना तडा जात नाही किंवा ते कोरडे देखील पडत नाहीत. जेव्हा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ममींचा पुरवठा संपुष्टात आला तेव्हा ममी ब्राउनचे पारंपरिक स्वरूपात उत्पादन करणे बंद झाले. नंतरच्या काळात ममीजची विक्री बंद झाली असली तरी अशा प्रकारच्या मानवी मृतदेहांच्या विक्रीस प्रोत्साहन देणारे तेच पाश्चात्त्य देश मानवाधिकाराचे गोडवे गाताना दिसतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.