रेकॉर्डब्रेक पाऊस पडूनसुद्धा इथले लोक पाण्याच्या एका थेंबासाठी तरसतात

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे आसाममधील चेरापूंजी नावाचे शहर. हे चेरापुंजी नाव आपण अनेकदा शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात ऐकलेले आहे. अगदी आत्ता आत्तापर्यंत चेरापुंजी हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण मानले जायचे. मात्र आता चेरापुंजीला मागे टाकून मेघालयमधील मौसिनराम या शहराने बाजी मारलेली आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि भारतातील सरकारी रेकॉर्डवर सर्वाधिक पाऊस पडणारा भाग म्हणून मेघालयाच्या मौसिनरामची निवड झालेली आहे. चेरापूंजीला सर्वाधिक 11700 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.

इतकी वर्षे या ठिकाणी सतत अकरा हजारापेक्षा जास्त मिलिमीटरचा पाऊस होता. मौसिनराम याठिकाणी 11800 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सहाजिकच आता चेरापुंजी स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

देशात इतर ठिकाणी जास्तीत जास्त पडणारा पाऊस हा 700 मिलिमीटर किंवा 600 मिलिमीटर किंवा जास्तीत जास्त 900 मिलिमीटर पर्यंतच पडतो. आपल्या महाराष्ट्रातील महाबळेश्वर, वाई, पाचगणी, कर्नाटकमधील म्हैसूर, उटी किंवा उत्तर प्रदेशातील नैनिताल या ठिकाणीदेखील 900 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नसतो.

आता प्रश्न असा पडतो की चेरापूंजी असो किंवा मौसिनराम भारतातील सर्वाधिक पाऊस फक्त याच ठिकाणी का पडतो?

तसं बघायला गेलं तर चेरापूंजी आणि मौसिनराम ही दोन्ही ठिकाणे पूर्व भारतामधील खासी नावाच्या टेकडीवर आढळतात. बंगालच्या उपसागरातून वाहणारे वारे या टेकड्यांवर येतात. ज्या बाजूनी हे वारे वाहतात त्या बाजूच्या उतारावरच ही दोन ठिकाणे आहेत.

बंगालच्या उपसागरावरून हे वारे वाहत येत असल्यामुळे या वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण खूप जास्त असते. हे वारे खासी टेकडीवरून वरच्या दिशेने वाहत जातात. जसजसे हे वारे वरच्या दिशेने वाहत जातात तशी त्यांच्यामधील बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे हे बाष्प पावसाच्या रूपात प्रचंड प्रमाणात या टेकड्यांवरून कोसळते. परिणामी या भागामध्ये अगदी मुबलक पाऊस कोसळतो.

जास्त पाऊस कोसळण्याची मुख्य तीन कारणे आहेत-खासी टेकड्यांवरून वरच्या दिशेने वाहत जाणारे वारे, वाऱ्यामध्ये असलेले भरपूर बाष्पाचे प्रमाण, आणि वाऱ्याच्या मार्गामध्ये आडव्या येणाऱ्या टेकड्या होय.

या जागेच्या अशा भौगोलिक संरचनेमुळे या ठिकाणी मुबलक पाऊस पडतो. पावसासाठी याहून उत्तम भौगोलिक स्थिती भारतामध्ये कुठेही नाही.

परंतु मौसिनरामची दुसरी एक आश्चर्यकारक माहिती आता समोर येते आहे. मौसिनराम भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळखले जात असले तरीही या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते.

वाचून नवल वाटलं ना? एकाच वेळी एक ठिकाण सर्वाधिक पावसाचे ठिकाण आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेले ठिकाण कसे काय होऊ शकते याबद्दल कोणाच्याही मनात प्रश्न उभा राहू शकतो.

याला पुन्हा एकदा कारण म्हणजे मौसिनराम या शहराची भौगोलिक स्थिती. मौसिनराम हे शहर टेकड्यांवर वसलेले आहे. जागोजागी उतार असल्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये येथे भरपूर पाऊस पडतो.

पावसाचे पाणी या ठिकाणी झरे आणि धबधब्याच्या रूपात कोसळत राहते. हा अत्यंत पाहण्याजोगा नयनरम्य देखावा असतो. परंतु धबधब्यांमुळे पाणी उतारावरून वाहून जाते. म्हणूनच या शहरात पाणी साठवता येत नाही.

शिवाय शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जी पाईपलाईन बसवण्यात आली आहे ती ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे. पहाडी भाग असल्यामुळे येथे अंडरग्राउंड पाईपलाईन खोदून बसवणे हे जिकिरीचे काम आहे.

आजपर्यंत कुठल्या सरकारने या कामाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. या पाईपलाईनमधून जे पाणी येते त्यात टेकड्यांवर सापडणारे खनिजं देखील आढळून येतात. परिणामी बहुतांशी पाणी पिण्यायोग्य राहत नाही.

लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी झरे आणि धबधब्यातून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पण हे पाणी फक्त जून ते सप्टेंबर असे चार महिने उपलब्ध असते. त्यानंतर पाणी आटायला सुरुवात होते आणि उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई जाणवते.

याठिकाणी येथील स्थानिक प्रशासनाने विहिरी बांधण्याचा प्रयत्न केलेला होता. काही काही ठिकाणी 40- 40 फूट खोल खणल्यानंतर विहिरींना पाणी लागले. परंतु ते पाणी लवकरच संपून गेले.

उन्हाळ्यात इथल्या लोकांना अनेक मैल लांब, टेकड्या उतरून पाण्याच्या शोधात भटकावे लागते.

त्यामुळेच मौसिनराम ओले वाळवंट म्हणून ओळखले जाते.

जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसासोबत टेकडीवरील माती उताराकडे वाहत जाते. माती वाहून गेल्यामुळे जमिनीत पाणी मुरु शकत नाही. याठिकाणी पाणी कसे साठवून ठेवता येईल याबाबत सरकारने चाचपणी सुरू केलेली आहे. त्यासाठी वॉटर रिझर्वर बांधता येईल का याची पाहणी देखील सुरू आहे.

परंतु यात इथली जमिनच मुख्य अडथळा बनते आहे. इथल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. हेच मुख्य कारण आहे की टेकड्यांवरून पाणी वाहत जाऊन खाली बांगलादेशच्या सीमेलगत उतारावर पसरते.

मौसिनरामला प्रचंड पाऊस कोसळून त्याचा फारसा फायदा मिळत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!