आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या जीवनावर जाहिरातींचा खूपच प्रभाव असतो. एखादी गोष्ट घ्यायची नसते, पण आपण एखादी जाहिरात बघतो आणि वाटतं घेऊन बघायला काय हरकत आहे? कधी कधी आपण तो प्रॉडक्ट वापरत पण नाही, मात्र त्याची जाहिरात इतकी मनात फिट बसलेली असते, ते आपण घेऊन येतोच.
एखादा ब्रँड असाही असतो की, जो आपल्या विचारांची दिशाच बदलून टाकतो आणि ग्राहकांना आपल्याकडं वळवतो. त्यासाठी मार्केटिंग स्कीलची आवश्यकता असते.
मार्लबरो सिगारेटची जनक कंपनी फिलिप मॉरिस अँड कंपनीने अशीच युक्ती वापरली ज्यामुळे सिगारेटची विक्री होत नव्हती ती झपाट्याने होऊ लागली. रफ अँड टफ मार्लबरो मॅन सिगारेट सगळ्याच लोकांना माहीत आहे, पण तुम्हाला कल्पना आहे का? ही सिगारेट फक्त महिलांसाठी आहे अशी याची आधी ख्याती होती.
१९२४ साली तयार केलेली मार्लबरो सिगरेट महिलांसाठीची सिगरेट असा समज होता. कारण बाकीच्या सिगारेटच्या तुलनेत ती जास्त फिल्टर केलेली आणि सौम्य वासाची होती.
सिगारेटच्या टोकाला लाल रंग दिला होता की, ज्यामुळे लिपस्टिकचा रंग जरी सिगरेटला लागला तरी त्याची खूण राहू नये. लालच रंग असल्यामुळे लिपस्टिकचा रंग लागला तरी तो दिसत नसे.
त्यामुळे ती महिलांसाठीचीच लिपस्टिक आहे असं शिक्कामोर्तब झालं होतं. धूम्रपान करणार्या महिलांना आकर्षित करण्यासाठी मार्लबरो मॅन हे नाव काळजीपूर्वक निवडले गेले होते. त्यावेळी विस्टन चर्चील हे मार्लबरोच्या श्रीमंत आणि रहस्यमय ड्यूकशी संबंधित आहेत अशी चर्चा मोठ्या प्रमाणात चालू होती आणि त्याचेच भांडवल करून धूम्रपान करणार्या महिलांना आकर्षित करण्यासाठी हे नाव दिलं गेलं होतं.
दोन दशकांपर्यंत महिलांसाठी म्हणून डिझाईन केलेल्या या सिगरेटने चांगला बिझनेस केला. १९५० पर्यंत हा सिलसिला चालू राहिला, पण जेव्हा १९५० च्या उत्तरार्धात अमेरिकेत गॅलअप पोलनुसार असा अहवाल प्रकाशित झाला की ४० टक्के फुप्फुसाचा कर्करोग हा सिगारेट ओढल्यामुळे होतो. त्यामुळे साहजिकच लोकांना चिंता वाटू लागली.
महिला आपल्या प्रकृतीच्या बाबतीत फारच जागरूक असतात त्यामुळे या अहवालाचा फटका फिलिप मॉरिसला बसला. आता काहीतरी नवीन युक्ती काढणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी रणनीती वापरली आणि मार्लबरो मॅनचा पुनर्जन्म झाला.
५० च्या दशकात फिलिप मॉरिस आणि इतर सिगरेट उत्पादकांनी अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की, जर फिल्टर सिगारेट असेल तर धूम्रपान पुरुषांना अजूनही प्रियच होते.
बहुतेक धुम्रपान करणार्या लोकांचा असा विश्वास होता की, फिल्टर केलेली सिगरेट आरोग्यासाठी चांगली आहे, त्यामुळे काही नुकसान होत नाही किंवा कर्करोगाचा फटकाही बसत नाही.
म्हणूनच फिल्टर सिगारेटची विक्री वाढत होती, तर इतर सिगारेटची विक्री कमी होत होती.
फिलिप मॉरिसकडे आधीपासूनच फिल्टर सिगारेट होती, जी खरंतर आता जास्त विकली जात नव्हती, कारण स्त्रिया जागरूक झाल्या होत्या. आता पुरुष ग्राहकांना त्या सिगारेटकडे वळवणे गरजेचे होते, त्यासाठी जाहिरातीचा सहारा घेणे हीच एक योग्य दिशा होती.
पूर्वी या ब्रँडची जाहिरात स्त्रियांनी केली होती, ती बदलून काऊबॉय, किंवा कामगार लोक किंवा पुरुष वर्गाकडून करून घेतली गेली.
त्याचा असा फायदा झाला की, ही फील्टर सिगारेट आहे आणि पुरुषांसाठी आहे हे सिद्ध झाले. केवळ फिल्टर सिगारेट म्हणून पुरुषांनी ती खरेदी करण्यास सुरुवात केली नाही तर, मार्लबरो मॅनचे मॉडेल पुरुष ही सिगारेट ओढत आहे म्हणजे त्यात पुरुषार्थ आहे ही खात्री त्यांना पटली किंवा त्यांच्या मनावर ती ठसली गेली.
मार्लबरो सिगारेट अमेरिकेतील सर्वाधिक सिगारेटची विक्री करणारा चौथा ब्रँड ठरला. १९७१ मध्ये जेव्हा धूम्रपानाच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली तेव्हाही त्यांनी कच खाल्ली नाही.
त्यांची जाहिरात करणारा काऊबॉय तेव्हाही काही बोलला नाही त्यामुळे प्रिंट जाहिरातीसाठी तो योग्य मानला गेला.
तर मंडळी अशी ही गोष्ट आहे. तंबाखू उद्योगाच्या विरुद्ध कितीही जाहिराती असल्या तरी सिगारेट उत्पादक या व्यवसायात उत्तम विक्रेत्यांना नियुक्त करतात जेणेकरून त्यांचा माल चांगला खपतो. मार्लबरो ही महिलांसाठी समजली जाणारी सिगारेट तोच ब्रँड ठेवून पुरुषांसाठी स्विच केली गेली हा मार्केटिंग क्षेत्राच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट यशोगाथा आहे.
घटक तेच ठेवून फक्त जाहिरातीच्या सहार्यावर त्यांनी त्यांचा बिझनेस चालू ठेवला आणि तो उत्तमरित्या यशाकडे नेला यातच त्यांच्या जाहिरातीबाजीचं कौतुक आहे.
ग्राहकाची नस ओळखता आली तर व्यवसायात प्रगती निश्चित होते. म्हणतात ना, ‘न बोलणार्याचं सोनंही तसंच राहतं, आणि बोलणार्याची मातीही खपते.’ तसंच आहे.
जर तुमच्याकडे लोकांना आकर्षित करण्याची कला आहे तर तुम्ही विकायला आणलेली मातीही खपेल. आता सिगारेटच्या पाकिटावर ‘सिगारेट शरीराला अपायकारक आहे.’ असं लिहिलेलं असतानासुद्धा ग्राहक ती घेतोच की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.