बेरोजगार भूमिपुत्र आणि उद्योजक यांच्यातला दुवा ठरतंय महाराष्ट्र शासनाचं ‘महाजॉब्स’ पोर्टल!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब


जगभरात कोरोना महामारीने मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रांना गेल्या काही महिन्यांपासून वेठीस धरले आहे. माहिती तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण, अशा सर्व क्षेत्रांची अपरिमित नुकसान या काळात झाले. मानवजातीने क्वचितच कधी अनुभवले असेल असे हे संकट प्रत्येक देशातील सामान्य जनजीवनावर विपरीत परिणाम करत आहे.

भारतही या संकटातून वाचू शकला नाही. बाधित आणि मृत हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन, शासनयंत्रणा, आरोग्य व्यवस्था या संकटाचा निकराने सामना करत आहे. कितीही बिकट संकट आले तरी त्याचा चिकाटीने सामना करत पुन्हा उभे राहण्याची मानवाला मिळालेली, किंबहुना माणसानेच कमावलेली, अंगभूत उर्मी या लढ्यात निर्णायक ठरली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंत शासन आणि आरोग्य यंत्रणा यांनी केलेली अतुलनीय कामगिरी आणि सामान्य माणसाला बाधा होण्यापासून दूर ठेवण्याची प्रामाणिक धडपड आपण सर्वांनी या काळात अनुभवली. खबरदारीचा शेवटचा उपाय म्हणून कराव्या लागलेल्या पूर्ण लॉकडाउनमुळे बाधितांचा आकडा आटोक्यात ठेवण्यास मदत झाली हे खरेच, पण लॉकडाउनच्या या काळात राज्यातल्या सामान्य लोकजीवनावर प्रचंड प्रभाव पडला.

ऐन भरात आलेले अनेक व्यवसाय, उद्योग काही वर्षे मागे गेले किंवा पुन्हा शून्यावर तरी आले. हे सगळे आपल्या डोळ्यांदेखत झाले. पण संकटाची परिस्थिती पाहून हतबलतेने बसून राहण्याची प्रवृत्ती आपली नाही हे महाराष्ट्राने अंगी बाणवलेले मूल्य या काळात मराठी माणसाला पुन्हा उभारी घेण्यास उपयुक्त ठरलंय आणि येत्या काळातही ठरणार आहे.

मराठी माणसाच्या चिकाटीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे चित्र राज्यात लॉकडाउननंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये प्रकर्षाने जाणवले ते उद्योग विभागाच्या उपक्रमांत.

एकीकडे इतक्या भयानक वैश्विक संकटाचा सामना करत असताना महाराष्ट्राने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र‘ या उपक्रमांतर्गत जगभरातील १६ बलाढ्य कंपन्यांशी गुंतवणूक करार करून राज्यात उद्योगांच्या वाढीसाठीची वचनबद्धता अधोरेखित केली. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी ४० हजार एकर राखीव जमीन, उद्योगांसाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी सिंगल विंडो अर्थात ‘महापरवाना’ पद्धती, प्लग अँड प्ले इकोसिस्टिम, कामगार ब्युरो असे अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

उद्योगांशी संबंधित सर्व घटकांना विचारात घेत कोरोनानंतरच्या काळासाठी केलेली कार्यक्रमांची कृतिशील आखणी या सगळ्यात महत्त्वाची ठरली आहे. याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेले ‘महाजॉब्स’ या पोर्टलचे उदघाटन.

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा १५% वाटा उचलणारे राज्य म्हणून देशातील सर्वात जास्त उद्योगसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राला उद्योगप्रक्रिया सातत्याने सुलभ व उद्योगस्नेही ठेवण्याची गरज आहे. त्यातही कोरोनासारख्या संकटाच्या काळात झालेले नुकसान भरून काढताना उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा भागवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

मार्चमध्ये केलेल्या लॉकडाउननंतर राज्यात काम करत असलेल्या परप्रांतीय कामगारांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. काही कामगारांनी राज्य सरकारने केलेली व्यवस्था आणि सहकार्य पाहता राज्यात राहण्याचा निर्णय घेतला तरी ती संख्या पुरेशी नव्हती. उद्योग विभागाने राज्यभरातल्या मनुष्यबळाच्या गरजेचा विचार केला असता ५० हजार नोकऱ्या राज्यात उपलब्ध असल्याचे समोर आले.

राज्यातील उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी सगळ्यात जास्त गरज होती ती मनुष्यबळाची. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या उद्योग विभागाने दूरगामी धोरण आखले आणि त्यातूनच ‘महाजॉब्स’ हे पोर्टल आकारास आले.

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार करण्यात आले. नोकरी शोधणारे कामगार आणि मनुष्यबळाची गरज असणारे उद्योग यांच्यात दुवा साधण्याचे काम या पोर्टलद्वारे होणार आहे.

कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा निरनिराळ्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची विभागणी करून मागणी व पुरवठा यातली तफावत कमी करण्यासाठी हे पोर्टल महत्वाचे ठरणार आहे. राज्यातील उद्योगांना गरजेप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीची कायमस्वरूपी यंत्रणा म्हणून या पोर्टलकडे पहावे लागेल.

उद्योगांसाठी लागणारी वेल्डर, टर्नर, फिटर, प्लम्बर यासारखी तब्बल ९५० व्यावसायिक कौशल्ये आणि माहिती तंत्रज्ञान, वाहतूक, पर्यटन, औषध निर्माण यासारखी १७ महत्वाची उद्योगक्षेत्रे यांचा समन्वय पोर्टलच्या माध्यमातून साधला जाईल.

उद्योगांना असलेली मनुष्यबळाची गरज आणि तरुणांना असलेली नोकऱ्यांची गरज यांची सांगड घालण्याचे जटिल काम हाताळण्यासाठी हे पोर्टल तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात आले आहे. उपलब्ध कौशल्यप्राप्त मनुष्यबळावरच विसंबून न राहता आणखी मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागालाही सोबत घेऊन उद्योग विभाग काम करणार आहे. ज्या आत्मविश्वासाने राज्य सरकारने उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले आणि अनेक सुविधा उपलब्ध करून दिला तो आत्मविश्वास या पोर्टलच्या माध्यमातून सार्थ ठरणार आहे.

एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज या उपलब्ध प्रणालीच्या माध्यमातून फक्त बेरोजगार मनुष्यबळाची नोंदणी यापलीकडे काही साध्य झाले नाही. पण फक्त नोंदणी करून न थांबता अशा तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी त्यांचा प्रत्यक्ष मनुष्यबळाची गरज असणाऱ्या उद्योगांशी समन्वय झाला पाहिजे हा मूळ उद्देश समोर ठेवून हे पोर्टल काम करणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे राज्यातील उद्योगात ८० टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळाव्यात यासाठी डोमेसाईल प्रमाणपत्राची अट या पोर्टलच्या माध्यमातून नोकरी मिळवण्यासाठी घालण्यात आली आहे. स्थानिक बेरोजगार कामगारांना नोकऱ्या मिळण्यासाठी ही तरतूद अत्यंत महत्वाची आहे.

कोरोना नंतरच्या काळात उद्योगांच्या सुलभ वाटचालीसाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या २४ तासात तब्बल ९० हजार भूमिपुत्रांनी या पोर्टलवर नावनोंदणी केली आहे. तसेच मनुष्यबळाच्या शोधत असलेल्या ७५१ उद्योगांनीही या पोर्टलवर नोंदणी केली आहे.

बेरोजगारीच्या प्रश्नावर तार्किक पातळीवर वादविवाद केला जातो पण त्यावर प्रत्यक्षात काम करण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. उद्यमशील आणि संपन्न महाराष्ट्र घडवण्याच्या मार्गात महाजॉब्स पोर्टलसारखे उपक्रम मैलाचा दगड ठरतील यात शंका नाही.

मराठी तरुण बेरोजगार न राहता त्याने आपल्या कौशल्याप्रमाणे नोकरी करून, अर्थार्जन करून राहणीमान उंचावले पाहिजे-हे साध्य होण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. कोरोनाच्या संकटातून यशस्वीपणे बाहेर येताना उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष, व्यापक आणि दूरगामी विकासासाठी उचललेले हे पाऊल येत्या काळात मराठी तरुणांसाठी असंख्य संधी घेऊन येईल. लढण्याची उमेद कायम असणाऱ्या प्रत्येक भूमीपुत्राला आपले भवितव्य घडवण्याचा मार्ग गवसेल आणि पर्यायाने हे राज्य संपन्नता आणि समृद्धीच्या आणखी जवळ जाईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!