क्रांतिकारक भगतसिंगांना ब्रिटीश सत्तेइतकीच अस्पृश्यतेची चीड होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब


लेखक- विनायक खरात

भगत सिंग हे क्रांतिकारक आहेत हे तर सर्वश्रुतच आहे, पण एक क्रांतिकारक असण्यासोबत ते एक थोर समीक्षाबुद्धी असणारे विचारवंत देखील आहेत हे त्यांनी लिहिलेल्या साहित्यावरून समजते. त्यांचे हे साहित्य जागतीक दर्जाचे लेखक व्लादिमीर लेनिन, कार्ल कटस्की, गोर्कि, रुसो, टॉमस पेन, एंजल्स, मार्क्स, सोक्रॅटिस यांच्या श्रेणीतील आहे.

आपल्या आयुष्यात राजकीय भूमिकेसोबतच सामाजिक सुधारणावादी भूमिका घेणारा क्रांतिकारक देशाच्या इतिहासात क्वचितच आढळतो. भगत सिंग यांनी अनेक लेख लिहिले, पत्रे लिहिली. त्यांची लेखणी आयुष्याच्या अखेरच्या दिवसात जेलमध्येही सुरूच होती

१९२३ साली झालेल्या आंध्रप्रदेश येथील काकीनाडा येथील काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता वाद ऐरणीवर आला तेंव्हा देशातील सामाजिक वातावरणात अनेक चर्चा सुरू झाल्या. त्यावेळी भगत सिंग यांनी या अस्पृश्यता समस्येवर जून १९२८ साली ‘किरती’ या पंजाबी पत्रिकेत विद्रोही या नावाने एक अग्रलेख लिहिला त्यातील सारांश इथे देत आहे.

ते म्हणतात,

“आपल्या देशासारखी वाईट परिस्थिती दुसऱ्या इतर कोणत्याही देशात नाही. इथे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. अस्पृश्यता ही अतिशय वाईट समस्या आहे. तीस करोड लोकसंख्या असलेल्या देशात सहा करोड लोक अस्पृश्य आहेत. त्यांच्या स्पर्शाने धर्म भ्रष्ट्र होतो, देव नाराज होतात, त्यांच्या विहिरीत पाणी भरण्याने पाणी अपवित्र होते असे विचार विसाव्या शतकात उपस्थित केले जातात या गोष्टी ऐकायलाही लाज वाटते.

आपला देश अध्यात्मवादी आहे पण माणसाला माणूस समजण्याची आपली तयारी नाही. स्वतःला वास्तववादी म्हणवणारा युरोप अनेक वर्षांपासून क्रांतीचा आवाज उठवत आहे. त्यांनी अमेरिका आणि फ्रांसच्या क्रांतीच्या दरम्यान समानतेची घोषणा केली होती. रशियाने देखील हरप्रकारचा भेदभाव मिटवून बदलासाठी कंबर कसली आहे. पण आपण मात्र सदा आत्मा-परमात्माच्या कल्पनेत चिंतित असतो.”

“माणसाला पशुपेक्षाही कमी दर्जा देण्याच्या मानसिकतेच्या लोक त्यांच्या राजकीय अधिकाराच्या गोष्टी कशी काय बोलू शकतात? गुलामगिरीची जाणीव असणारे गुलाम धर्माच्या आधारे इतरांना कसे गुलाम ठेऊ इच्छितात? ते स्वतः माणूस म्हणवून घेण्याच्या लायक आहेत का ? पशूला पूजनीय मानून जिवंत माणसाला दूर करता याला काय म्हणावे?”

पुढे ते असे म्हणतात की, “ही समस्या अशीच राहिली तर अस्पृश्य लोक इतर धर्माकडे वळतील की जिथे त्यांना समान वागणूक दिली जाईल, त्यांच्यासोबत माणसासारखा व्यवहार केला जाईल. तेंव्हा त्यांच्या या भूमिकेला प्रश्न उपस्थित करू नका.

ते निकृष्ट कामे करून आपल्याला सोयीसुविधा उपलब्ध करून देतात आणि आपण त्यांच्यासोबत भेद बाळगतो. असे वागणे म्हणजे कृतघ्नतेची परमोच्च सीमा आहे, असे ते म्हणत.

त्यांच्या प्रत्येक ओळीतून अस्पृश्यतेबद्दलची चीड अधोरेखित होते. आजच्या काळातही गो हत्येचा नावाखाली माणसे मारली जातात दंगली घडवल्या जातात त्या समाजकंटक लोकांसाठी भगत सिंगचे विचार एक चपराक आहे.

सामाजिक सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या लोकांनी ही भगत सिंग यांच्या परिवर्तनवादी साहित्याकडे डोळेझाक केली आणि भगत सिंग यांच्यावर अधिकार सांगणाऱ्या डाव्यांनीही त्यांची उपेक्षा केली ही गोष्ट अनाकलनीय आहे

अस्पृश्यता निवारण करण्यासाठी पुढे ते लेखात म्हणतात की, सर्वप्रथम आपण निर्णय घेतला पाहिजे की आपण सगळेच एक माणूस आहोत. ना जन्माने कोणी वेगळा आहे ना कामाने कोणी वेगळा आहे. जर एक माणूस गरीब घरी जन्माला आला असेल तर याचा असा अर्थ घेऊ नये की त्याने आयुष्यभर सफाईचेच काम करावे. त्याच्या जगाकडे, विकासाकडे वळण्याचा माणूसपणाच्या अधिकारावर गदा आणण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.

पूर्वजांनी जो अन्याय केला, अमानुषपणे त्यांच्याकडून कामे करून घेतली. इतकंच नाही तर, पूर्वजन्मातील फळ म्हणून पापपुण्याच्या भ्रामक कल्पनेत अडकवून ते विद्रोह करणार नाहीत याचीही खबरदारी घेतली. हे त्यांनी खूप मोठं पाप केलं. लोकांच्यातील माणूसपण संपवलं पण त्या पापांच आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे.

ज्यांच्याकडून हे पाप केलं आहे त्यांनी क्षमा मागितलीच पाहीजे, यासाठी सतत एकत्र सामील झाले पाहिजे.

जर एखादा माणूस सफाई काम करत असेल तर तो अस्पृश्य कसा होईल? तर याच परिभाषेने पहावयाचे झाले तर माता आपल्या लहान मुलाचा मैला साफ करत असते तर मग ती पण अस्पृश्य झाली का?

यावरील शब्दांतून एका क्रांतिकारकाचे अंतःकरण किती दयेने, मानवतावादाने भरलेले आहे दिसून येते अस्पृश्यते निवारण बद्दलच्या त्यांच्या भूमिका अतिशय स्वागतार्ह आणि काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या आहेत.

पुढे ते लेखात म्हणतात,

जेंव्हा हे लोक संघटित होऊन येतील किंवा सांप्रदायिक गोष्टीच मुळातून नष्ट करून त्यांना समान अधिकार देतील तेव्हा सरकारी पातळीवर कौन्सिल असेंम्बलीचे हे कर्तव्य आहेत की, त्यांच्यासाठी रस्ते, विहिरी, शाळा यांचे पूर्ण सार्वजनिक स्वतंत्र त्यांना बहाल करावे. पण भगतसिंग म्हणतात की, ज्या सरकारीसभेत सादर झालेल्या बालविवाह कायद्याविरोधात रान उठवले जाऊन अनेक प्रश्न उपस्थित केले जातात तिथेच अस्पृश्य लोकांच्या हक्काचे धाडस कसे करतील?

भगत सिंग लेखाच्या अंतिम चरणात म्हणतात, या समस्येवर कायमस्वरूपी सुटका हवी असेल तर तुमच्यातील लोकप्रतिनिधी निवडा जे तुमच्या हक्कांची मागणी करतील. आपला इतिहास पहा गुरुगोविंद सिंग यांनी खरी ताकद तुम्हीच होता. ज्यामुळे त्यांचं नाव जिवंत आहे, तुमच्या कुर्बानी सुवर्ण अक्षरात लिहल्या आहेत. तुम्ही त्याग करून लोकांच्या उपयोगी पडत आहात पण त्यांना तुमचे मोल नाहीय म्हणून तुम्ही तुमची ताकद ओळखा. प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाहीत.”

“संघटनबद्ध होऊन आव्हान दिल्याशिवाय तुमची दाद कोणी घेणार नाही, दुसऱ्यांच्या हातचे बाहुल होणे बंद करा जेंव्हा तुमचा संघर्ष पूर्ण होईल तेंव्हा तुमच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे धाडस कोणी करणार नाही.” या अंतिम चरणात भगत सिंग अस्पृश्यांसाठी इतिहासाचा दाखल देऊन प्रेरणा देत आहेत. गुरुगोविंद, शिवाजी महाराज यांची उदाहरणे त्यांच्यात स्वाभिमान जागृत करत आहेत.

धर्म, जातींचे राजकारण करून समाजात दुही माजवणारे राजकारणी यांना भगत सिंग यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे का? म्हणूनच जातींचा कळवळा बाळगणाऱ्या लोकांना भगत सिंग पचनी पडत नाही. ते कोण्या एका धर्माचे किंवा प्रांताचे नव्हते. महापुरुषांच्या अस्तित्वाला सामान्य लोकांप्रमाणे मर्यादा नसतात ते अखंड मानवसमूहाचे असतात. तरीही महापुरुषांना मर्यादित करण्याची परंपरा देशात सुरूच आहे. पण धर्म या संकुचित गोष्टींची भगतसिंगांनी केलेली चिकित्सा यामुळेच त्यांच्यावर कोणत्याही धार्मिक व प्रांतिक अस्मितेची छाप होऊ दिली नाही हे त्यांचं वेगळेपण त्यांच्या भूमिकेनेच जपलं.

धर्मांधतेच्या वाढणाऱ्या अन्यायकारक घटनांसाठी, वाढत्या असहिष्णू वातावरणात भगतसिंग यांचे हे विचार आजही समकालीनच आहेत.

देशातील क्रांतिकारकांचे इतके युगप्रवर्तक विचार असताना त्यांचा वापर होतो तो गांधी विरोधासाठी नाहीतर वेलेन्टाइन डेला विरोध करण्यासाठी जिथे या गोष्टींमध्ये काहीच तथ्य नाही. महापुरुषांमध्ये द्वंद घडविणारे महाभाग जगात कुठे सापडत नसतील.

महापुरुषांप्रति कृतज्ञता बाळगणे व त्यांचे अनुकरण करणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. तसेच त्यांची आदर्श असणारी अनुकरणीय वैचारिक बाजू समजून घेणे हे आजच्या काळात क्रांतिकारक कार्यच बनले आहे.

भगत सिंग यांचे सामाजिक सुधारणावादी विचार खूप महत्वाचे आहेत त्यांच्या साहित्याची बाजू ही जनमानसात अपरिचित आहेत ती समोर यायला हवी यासाठी विशेष असे प्रयत्न ही होताना दिसत नाहीत हे दुर्दैवी आहे.


(संदर्भ :- भगतसिंग के संपूर्ण दस्तावेज संपादित चमनलाल)आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!