…आणि ‘वर्माजी का बेटा’ लाल बहादूर ‘शास्त्री’ बनला

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इतिहासातील काही उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना एखादी बिरुदावली दिली जाते. पुढे हीच बिरुदावली म्हणजेच त्यांची ओळख बनून जाते. ही ओळख आणि व्यक्तिमत्व इतके एकरूप होऊन जातात की, पुढे त्या व्यक्तीचे खरे नावच इतिहासजमा होऊन जाते. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या बाबतीतही काहीसे असेच झालेले दिसते.

लाल बहाद्दूर शास्त्री हे भारताचे एक विनयशील, चारित्र्यसंपन्न आणि स्वच्छ प्रतिमा असलेले नेते होते. आपल्या कामाचा गवगवा करणे त्यांना मान्य नव्हते. शांत राहून देशाच्या उभारणीसाठी त्यांनी शक्य तितके योगदान दिले. त्यांच्या काळात भारत म्हणजे नुकताच स्वतंत्र झाला होता. भारताला लवकरच प्रगतीची घौडदौड करण्यासाठी त्यांनी सक्षम बनवले.

लाल बहाद्दूर शास्त्री यांचे मूळ नाव लाल बहाद्दूर वर्मा असे होते. शास्त्री ही तर त्यांना मिळालेली पदवी होती. त्यांना मिळालेला सन्मान होता.

पण, पुढे ही पदवीच त्यांची ओळख बनली आणि ते लाल बहाद्दूर वर्माचे लाल बहाद्दूर शास्त्री झाले.

लाल बहाद्दूर शास्त्री यांचे व्यक्तिमत्व अत्यंत विनम्र आणि निगर्वी होते. त्यांनी नेहमीच प्रसिद्धी परांग्मुख राहून काम केले. खरे तर लाल बहाद्दूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी येते. पण, गांधी जयंतीचा जितका गवगवा होतो तितका शास्त्री जयंतीचा होत नाही. गांधी जयंती लोकांच्या लक्षात असते. पण त्याच दिवशी शास्त्री जयंती असते याचा मात्र लोकांना विसर पडतो.

लाल बहाद्दूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशमधील मुगलसराय शहरात झाला. त्यांचा जन्म एका कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद श्रीवास्तव असे होते. त्यांचे वडील एक प्राथमिक शिक्षक होते. नंतर ते अलाहाबाद येथे क्लार्क म्हणून नोकरी करू लागले.

कायस्थ परिवारात श्रीवास्तव किंवा वर्मा आडनाव लावले जाते. याच परंपरेनुसार शास्त्रीजींच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव लाल बहाद्दूर वर्मा असे ठेवले.

लाल बहाद्दूर लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. ते दीड वर्षांचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. आपल्या आईसोबत ते आजोळी, मुगलसराय येथे राहू लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोळीच झाले.

त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील मुन्शी हजारी लाल हे एका इंग्रजी शाळेतील शिक्षक होते. परंतु पुढच्या दोन वर्षातच त्यांचेही निधन झाले. हजारी लाल यांच्या माघारी त्यांचे भाऊ दरबारी लाल आणि त्यांचा मुलगा बिंदेश्वरी प्रसाद यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. बिंदेश्वरी प्रसाददेखील मुगलसरायमधील एका शाळेत शिक्षक होते.

लाल बहाद्दूर ४ वर्षांचे झाल्यावर त्यांच्या शालेय शिक्षणाला सुरुवात झाली. त्याकाळात कायस्थ कुटुंबात मुलांना इंग्रजी ऐवजी उर्दू भाषेचे शिक्षण देण्याची प्रथा होती. कारण, मुघलकाळापासून उर्दू हीच या प्रदेशातील राजभाषा होती. जमीनदारीचे सर्व कामकाज उर्दू भाषेतूनच चालत असे. बुढन मिया नावाच्या एका मौलवींनी लाल बहाद्दूर यांना उर्दूचे शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली.

सहावीपर्यंत त्यांचे शिक्षण मुगलसरायमध्येच झाले. पुढे बिंदेश्वरी यांची वाराणसी येथे बदली झाली. लाल बहाद्दूर आपल्या आईसोबत आणि इतर भावंडांसोबत वाराणसी येथे गेले. वाराणसीच्या हरिश्चंद्र हायस्कूल मध्ये त्यांनी सातवीसाठी प्रवेश घेतला.

लाल बहाद्दूर शास्त्री यांचा परिवार तसा स्वातंत्र्य चळवळीपासून दूरच होता. परंतु हरीशचंद्र हायस्कूलमधले वातावरण एकदम वेगळे होते. इथे मुलांना देशभक्तीचे धडे दिले जात.

त्यातही निश्कामेश्वर मिश्रा नावाचे एक शिक्षक मुलांमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागृत करत. लाल बहाद्दूर यांच्या व्यक्तिमत्वावर इथल्या वातावरणाचा खूपच प्रभाव पडला.

इथे असतानाच त्यांची ओळख स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या विचारांशी ओळख झाली. या विचारांनी त्यांना पूर्णच बदलून टाकले.

१९२१ साली लाल बहाद्दूर १०वी मध्ये शिकत होते. त्यावेळी वाराणसी येथे महत्मा गांधी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लाल बहाद्दूर या कार्यक्रमात सहभागी झाले. गांधीजींच्या विचाराने ते एवढे प्रेरित झाले की दुसऱ्याच दिवशी त्यांनी शाळा सोडली आणि कॉंग्रेस कार्यालयात जाऊन त्यांनी पक्षाची सदस्यता घेतली. तेंव्हापासून लाल बहाद्दूर पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत उतरले.

लहानवयातच इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकले पण, त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना सोडून देण्यात आले.

जे.बी. कृपलानी महात्मा गांधींचे निकटवर्ती होते. ते लाल बहाद्दूर यांचे मार्गदर्शकही होते. वाराणसीत तरुणांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तरुणांना राष्ट्रवादी विचारांचे शिक्षण मिळाले पाहिजे या विचाराने त्यांनी आपले मित्र वीएन शर्मा यांच्या मदतीने शिक्षण केंद्र सुरू केले.

कॉंग्रेस पक्षाच्या स्वतंत्रता आंदोलनासाठी त्याकाळी अनेक धनिक लोक स्वतःहून आर्थिक मदत करत. वाराणसीतील प्रसिद्ध धनिक शिव प्रसाद गुप्ता यांनी या शिक्षण केंद्रांना आर्थिक सहाय्य करण्याची जबाबदारी स्वीकारली.

त्यांच्या मदतीने महात्मा गांधी यांनी १० फेब्रुवारी १९२१ रोजी वाराणसी येथे काशी विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रवादी विचारांचे शिक्षण देता येईल हा एकमेव हेतू होता.

लाल बहाद्दूर शास्त्रींनी या विद्यापीठात प्रवेश घेतला. १९२५ साली ते नैतिक आणि दर्शनशास्त्रात पदवी मिळवली.

ही पदवी घेतल्यानंतर लाल बहाद्दूरजींना शास्त्री ही पदवी मिळाली. काशी विद्यापीठातून ग्रॅज्यूएशन केल्यानंतर शास्त्री ही पदवी मिळत असे. यानंतर लाल बहाद्दूर यांनी आपल्या नावातील वर्मा हे आडनाव काढून तिथे शास्त्री हे आडनाव लावले. यानंतर ते लाल बहाद्दूर शास्त्री याच नावाने प्रसिद्ध झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!