एका दारूच्या बाटलीसाठी 10000 सैनिक आपले प्राण गमावून बसले होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


दोन समूहात युद्ध केव्हा होते? ज्यावेळी त्या दोन्ही समूहातील वाद विकोपाला जातात आणि चर्चेतून प्रश्न सुटणे अशक्य होऊन जाते, त्याचवेळी त्यांच्यात भीषण युद्ध छेडते, जे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सुटत नाही ते हिंसेच्या मार्गाने सोडवण्याचा आणि एका समूहाने आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजे युध्द.

इतिहास अशा असंख्य युद्धकथानी भरलेला आहे. ज्यात अनेकांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर इतिहासात स्वर्ण अक्षरात आपले नाव कोरले आहे. परंतु इतिहासात काही युद्धे अशी देखील आहेत, ज्या मागील कारणे अत्यंत बालिश आणि हस्यास्पद होती. पण या युद्धात असंख्य लोकांनी आपले प्राण गमावले होते.

असंच एक युद्ध आहे “दारूचे युद्ध”.

या युद्धात ‘दारू’साठी १० हजार ऑस्ट्रियन सैनिकांनी आपले प्राण गमावले होते. या युद्धाला इतिहासातील सर्वात मूर्ख युद्ध म्हटले जाते.

याचा किस्सा असा आहे की- १७८८ साली ऑस्ट्रियन सैन्य युरोपच्या कैरनसीब्स शहरापर्यंत येऊन पोहचले होते. त्याकाळी ऑस्ट्रियन सैन्य एका अंब्रेलासारखे कार्यरत होते. त्यांच्यासोबत अनेक राष्ट्रांचे सैन्य एकत्रितपणे युद्ध करत होते. याला हैब्सबर्ग साम्राज्य म्हणून देखील इतिहासात ओळखले जाते. या साम्राज्यात ऑस्ट्रियाबरोबरच जर्मनी, फ्रान्स, पोलंड आणि झेक प्रजासत्ताक या देशांचे सैन्य एकत्रिपणे युद्ध मोहिमेला जायचे.

या विविध देशांच्या सैनिकांना भाषेचा मोठा अडसर येत असे, वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधणे बऱ्याचदा अवघड असायचे, यामुळे सैन्यात सुसूत्रता निर्माण करणे फार जिकरीचे कार्य होते. या वेळी बहुभाषी अनुवादकांची मदत घेतली जात होती. यातच या सैनिकांचा कामकाजाचा बराच कालावधी खर्च होत होता.

हे सैन्य त्यावेळी ऑटोमन तुर्कांच्या साम्राज्यावर चालून गेले होते. त्या रात्री दोन्ही साम्राज्याचे सैन्य अगदी एकमेकांच्या समोर उभे होते. अशावेळी मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगली गेली होती.

परंतु १७ सप्टेंबरच्या रात्री भलताच प्रकार घडण्यास सुरुवात झाली. झालं असं की डॅन्यूब नदीच्या किनाऱ्यावर रात्री गस्त घालणाऱ्या ऑस्ट्रियन सैन्याला त्यांचे साथीदार असलेले रोमानियन सैनिक दारू पिताना दिसले. ऑस्ट्रियन सैन्य देखील थकलेले असल्यामुळे त्यांनी त्यांच्या सोबत प्यायला बसण्याचा निर्णय घेतला.

मित्र राष्ट्र रोमानियाचे सैनिक आपल्याला दारू देतील या भावनेने ज्यावेळी हे सैनिक त्यांचा वाट्याची दारू मागायला गेले त्यावेळी तिथे एकच दारूची बाटली शिल्लक होती. त्या बाटलीवरून या सैनिकांमध्ये आपसात बाचाबाची सुरू झाली.

आधी लहान वाटणाऱ्या भांडणात अचानक सैनिकांनी गोळ्या चालवायला सुरुवात केली.

ही तर कथेची केवळ एकच बाजू आहे, दुसरीकडे ऑस्ट्रियन सैन्याची एक तुकडी या दारू पिणाऱ्या सैनिकांपासून लांब तुर्की सैन्यावर नजर ठेवून होती. ज्यावेळी या दारुड्या सैनिकांमध्ये आपसातल्या लढाईत बंदुकीच्या गोळ्या चालवल्या गेल्या त्यावेळी ही मोर्चा सांभाळणारी सैन्य तुकडी सावध झाली. त्यांना असं वाटलं की हल्ला झाला आहे.

इतर सैन्य तुकड्यांना सावधानतेचा इशारा म्हणून हे लोक ‘तुर्क तुर्क’ ओरडू लागले. त्यामुळे इतर सैन्य तुकड्या देखील सचेत झाल्या, या सैनिकांची ‘तुर्क तुर्क’ ही आरोळी त्या दारुड्या सैनिकांच्या कानापर्यंत देखील जाऊन पोहचली. त्यांचा देखील समज झाला की तुर्कांनी आक्रमण केले. मग यांनी देखील आपल्या बंदुकी घेऊन नदीच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या त्यांच्याच सैन्य तुकडीवर हल्ला चढवला.

दोन्ही बाजूला असणाऱ्या ऑस्ट्रियन व रोमानियन सैन्य तुकड्या तुर्कांच्या आक्रमणाच्या दहशतीने एकमेकांवर गोळीबार करत होत्या. त्याच वेळी ऑस्ट्रियन सैन्यासोबत आलेल्या जर्मन सैन्य तुकडीला सर्व प्रकार लक्षात आला. मग त्यांनी दोन्ही बाजूच्या हल्लेखोर सैनिकांना शांत करण्यासाठी ‘हाल्ट हाल्ट’ (halt halt) अशा आरोळ्या मारण्यास सुरुवात केली.

त्यांचा उद्देश इतकाच होता की हा जो काही आपसातल्या गैरसमजामुळे गोळीबार सुरू आहे, तो थांबावा, पण झालं भलतंच, या आपसात लढणाऱ्या ऑस्ट्रियन सैन्याला वाटले की ते लोक “हाल्ट हाल्ट” नाही तर “अल्लाह अल्लाह”च्या घोषणा देत आहेत. तुर्की सैन्य हे युध्दावेळी ‘अल्लाह अल्लाह’ ओरडतात हे ऑस्ट्रियन सैन्याला माहिती होते.

त्यामुळे जर्मन सैन्य तुर्की सैन्य असल्याचा गैरसमज त्यांना झाला व त्यांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. ते एकमेकांवर अंदाधुंद गोळ्या चालवत होते.

अशा प्रकारे दारूच्या नशेत आणि एकमेकांची भाषा न कळाल्यामुळे, या सैनिकांनी आपसातच युद्ध लढले. या युद्धात एका रात्रीत तब्बल १० हजार जण आपल्या प्राणास मुकले.

या युद्धाला युरोपियन इतिहासात कैरन्सीब्सचे युद्ध म्हणून ओळखले जाते. हे युद्ध झाल्याचा दोन दिवसांनी तुर्की सैन्य त्याठिकाणी येऊन पोहचले होते, पण ते ज्यावेळी तिथे पोहचले तेव्हा समोर युद्ध करायला शत्रूच नजरेस पडला नाही कारण ते आपसात लढून मेले होते.

हे सैन्य आपसात लढून कसे मेले हे समजून घेण्यासाठी तत्कालीन इतिहासकारांना तब्बल ४ दशकांचा कालावधी लागला. हे युद्ध अत्यंत मूर्खपणाने या सैनिकांनी आपसातच लढल्यामुळे या युद्धाचे व्यवस्थित दस्तावेज तयार करण्यात आले नव्हते. आजही हे युद्ध इतिहासातील सर्वात मूर्खपणाचे युद्ध म्हणून ओळखले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!