आपल्यावरील बलात्काराचा बदला घेण्यासाठी फूलनदेवीने २० जमीनदारांना यमसदनी पोहचवलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आपल्यावर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी ३९ वर्षांपूर्वी फुलनदेवी या कुख्यात डाकू महिलेने २० लोकांची एका रांगेत उभं करून गोळ्या घालून हत्या केली होती, या हत्याकांडाला बेहमई हत्याकांड म्हणून ओळखले जाते, हे हत्याकांड केल्यानंतर फुलनदेवीचे नाव भारतात आणि जगभरात प्रसिद्ध झाले होते.

२००१ साली फुलनदेवीची तिच्या घरासमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावर अजूनही न्यायालयीन खटला सुरु आहे.

१४ जानेवारी १९८१ साली फुलनदेवीने आपल्या टोळीला घेऊन कानपूर पासून १०० किलोमीटरवर असलेल्या बेहमई गावावर हल्ला केला. होळीच्या आधीचे दिवस होते साहजिकच गावकरी होळीच्या तयारीत मग्न होते. फुलनदेवीची टोळी एखाद्या वादळाप्रमाणे त्या गावात येऊन धडकली.

त्यावेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यादिवसाचे वर्णन करताना म्हटले होते की ‘आम्ही त्यावेळी विहिरी जवळ उभे होतो, तितक्यात फुलनदेवी आणि तिचे साथीदार मानसिंह, फुसा आणि भिखा गावात दाखल झाले.

गावात दाखल झाल्यावर फुलनदेवीने गावकऱ्यांना शिवीगाळ केली आणि तिच्या साथीदारांना हल्ला करण्यास सांगितले. काही क्षणातच सर्वत्र गोळीबार सुरु झाला आणि कोणाला काही लक्षात येण्याच्या आत अनेक लोक रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते.

साक्षीदार म्हणतो की तो त्यावेळी फार थोडक्यात बचावला होता, तो जिवंत आहे हे पाहून एकाने त्याला पुन्हा गोळी घातली, तरी तो सुखरूप होता.

एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते की फुलनदेवी ज्यावेळी गावात आली त्यावेळी ती मोठ्याने कालिका मातेचा जयजयकार करत होती. जेवढ्या गोळ्या त्यावेळी चालवण्यात आल्या होत्या त्यातील एकही फुलनदेवीने चालवली नव्हती. सर्व तिच्या साथीदारांनी चालवल्या होत्या. त्यांनी गावातील पुरुषांना पकडून पकडून गोळ्या घातल्या होत्या.

फुलनदेवीने बेहमई गावावर केलेला हल्ला हा तिच्या प्रतिशोधाचा एक भाग होता. फुलनदेवीचं गाव गुरहा हे बेहमई गावापासून २० किलोमीटरवर होते. त्याकाळी या भागात डाकूंचे साम्राज्य होते.

बेहमई गावाचे दोन डाकू जे ठाकूर जातीचे होते, त्यांचे नाव होते लाला राम आणि श्रीराम. या दोघांनी फुलनदेवीचा बलात्कार केला होता.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत फुलनदेवी म्हणाली होती की त्यांनी फार वाईट पद्धतीने तिच्यावर अत्याचार केले होते, आजही तो दिवस आठवला तर अंगाचा थरकाप उडतो. फुलनदेवी म्हणाली होती की त्या लोकांनी माझ्यावर इतके गंभीर अत्याचार केले मग मी शांत कशी राहणार ? मला देखील त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा द्यायचीच होती.

प्रतिशोधाच्या भावनेने फुलनदेवी पेटून उठली होती. तिने बेहमई गावावर हल्ला चढवला आणि त्या दोन ठाकुरांच्या कृत्याचा प्रतिशोध ठाकूरांचा संपूर्ण गावाकडून घेतला.

२० लोकांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. चंबळच्या खोऱ्यात फुलनदेवीच्या नावाची दहशत पसरली होती. देशभरात तिच्या नावाची चर्चा सुरु होती, अनेकांनी या हत्याकांडानंतर देखील तिची बाजू घेतली होती.

या हत्याकांडानंतर १९८३ साली फुलनदेवीने मध्यप्रदेशात आत्मसमर्पण केले होते. तिच्या आत्मसमर्पणामागे मध्यप्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

आत्मसमर्पणाच्या अगोदर फुलनदेवीने एक अट ठेवली होती की तिच्यावरील खटले हे मध्यप्रदेशात चालवले जातील आणि तिला उत्तरप्रदेशातील जेलमध्ये ठेवण्यात येणार नाही. यानंतर पुढे ११ वर्षे ती ग्वाल्हेर आणि जबलपूरच्या जेलमध्ये कैद होती. नंतर तिला १९९४ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. या काळात कानपूर कोर्टात तिच्यावरचा खटला सुरूच होता.

फुलनदेवी फार प्रसिद्ध झाली होती. ती वंचित आणि दलितांची आयकॉन बनली होती. या लोकांच्या मनात ठाकूरांच्या प्रती असलेल्या रागाला तिने वाट मोकळी करून दिली होती. याच लोकप्रियतेचा फायदा घेऊन ती राजकारणात उतरली.

तिने वंचित आणि दलित मतांना आकर्षित केले. समाजवादी पक्षात प्रवेश केला. मुलायम सिंह सरकारने तिच्यावर दाखल करण्यात आलेले ५५ गुन्हे मागे घेतले होते.

तिने मिर्झापूर मतदारसंघातून १९९६ आणि १९९९ साली लोकसभा निवडणूक जिंकली होती.

यानंतर ती दिल्लीमध्ये रहायला गेली. दिल्लीतच २००१ साली तिच्या घरासमोर शेर सिंह राणा नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केली होती.

फुलनदेवीचे एकूण जीवन हे फार क्रांतिकारी आणि गुन्हेगारीने व्यापले होते, तिच्यावर झालेल्या अन्यायाचा तिने प्रतिशोध घेतल्यामुळे तिच्या प्रती लोकांची सद्भावना होती असं असलं तरी तिच्या वाट्याला देखील तिच्या कृत्याचेच फळ आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!