केवळ काश्मीरच नाही तर गुजरातमधील या भागांवरही पाकिस्तान आपला हक्क दाखवतोय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारत-पाकिस्तान दरम्यान असणारी कट्टरता आज सगळ्या जगाला माहीत आहे. याच कट्टरतेतुन होणाऱ्या राजकीय कुरघोड्या पाकिस्तान आजही करत आहे. याच कुरघोड्यांचा एक भाग म्हणजे नियमितपणे प्रदर्शित केला जाणारा पाकिस्तानचा प्रादेशिक नकाशा. देशाच्या भूभागाचा हिस्सा नसणारे प्रदेश नकाशात दाखवून राजकीय वर्चस्व दर्शविण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न तसा नवीन नक्कीच नाही.

मागच्या ७२ वर्षात पाकिस्तानने फक्त काश्मिरलाच आपल्या नकाशात दाखवलं आहे असं नाही. गुजरातमधील दोन मोठ्या शहरांनाही पाकिस्तान आपल्या नकाशात दाखवतं आहे. आणि हो, हे नकाशे कोणी साधारण व्यक्ती किंवा एखादी संस्था प्रकाशित करत नाही तर हा नकाशा प्रकाशित करण्याआधी तो महत्त्वाच्या पाकिस्तानी नेत्यांच्या आणि पंतप्रधानांच्या नजरेखालुन जातो. त्यामुळे या नकाशाच्या मागे पाकिस्तानचा कुरघोडी करण्याचा ऊद्देश स्पष्ट दिसतो.

गुजरातमधील महत्त्वाच्या २ ठिकाणांची नावे आहेत जुनागढ आणि माणावदर.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या कारणामुळे कित्येक वेळा तोंडघशी पडलेल्या पाकिस्तान सरकारला अजुनही धडा शिकता आलेला नाहीये.

या ठिकाणांचा भारतातील समावेश पाकिस्तानने कधी मान्यच केला नाही. अजुनही या ठिकाणांबाबत आपला हट्ट सोडण्यास पाकिस्तान तयार नाही. हे दोन्ही ठिकाण आता भारताचे अविभाज्य घटक आहेत. जुनागढच्या बाबतीत तर हातात आलेला घास भारताने हिसकावुन घेतला अशी पाकिस्तानची धारणा आहे. काही प्रमाणात ते खरं सुद्धा आहे.

राजकीय नेतृत्व आणि जुनागढच्या जनतेच्या जिवावर पाकिस्तानला आपलेच बोट आपल्याच तोंडात घालावे लागले ही बाब अजुनही पाकिस्तानच्या मनात सलत असेल एवढं नक्की.

जुनागढच्या या धोबीपछाडाची सल म्हणुनच की काय पाकिस्तानमध्ये कधीकधी जुनागढच्या नावे असलेले क्रमांक गाड्यांना दिले जातात.

एका ठिकाणासाठी एवढं सगळं करणारा पाकिस्तान असं का वागतो याचं उत्तर त्याला जुनागढच्या जनतेने दिलेल्या धोबीपछाडात आहे. या घटनेवर थोडासा प्रकाश टाकण्याचा आज आपण प्रयत्न करुयात.

काठियावाड राज्यांपैकी महत्त्वपूर्ण राज्य असलेले जुनागढ त्यावेळी तेथील नवाबामुळे १५ ऑगस्ट, १९४७ ला पाकिस्तानमध्ये सामील होणार होते. शासक मुस्लिम आणि बहुसंख्य जनता हिंदू अशी परिस्थिती इथे होती.

नवाबाचा कल आधीपासूनच पाकिस्तानमध्ये जाण्याचा होता. मोहम्मद अली जिना यांनी नवाबाला मोठमोठे स्वप्न दाखवून भूलविले होते.

२१ ऑगस्टला व्ही. पी. मेनन यांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तास पत्र लिहुन जुनागढमध्ये जनमत चाचणी घेतली जावी कारण तेथील जनता हिंदू असुन जुनागढ भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानशी जोडलेले नाही असे सांगितले. या पत्राला पाकिस्तान उच्चायुक्ताकडून उत्तर न आल्याने पुन्हा पत्र लिहिले गेले. पुन्हा उत्तर आले नाही.

तेव्हा १२ सप्टेंबर रोजी नेहरूंनी जनमत चाचणीच्या कोणत्याही निर्णयाचा भारत स्वीकार करेल अशी सुचना ‘लॉर्ड इस्मे’ यांच्याद्वारे कळवली.

पुढच्याच दिवशी पाकिस्तानने जुनागढ आपल्या राज्यात सामिल झाल्याची घोषणा केली. ही बातमी कळताच जुनागढमध्ये कल्लोळ माजला. जनआंदोलन सुरू झाले. जवळच्या राज्यांनीही या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. कारवाई करण्यासाठी भारत सरकारवर दबाव वाढत गेला. अशा वेळी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती.

तेव्हा भारताने आसपासच्या राज्यांची सेना जुनागढच्या सीमेवर तैनात केली. व्ही. पी. मेनन यांना जुनागढ पाठवून नवाबाकडे पुन्हा जनमत चाचणी घेण्याची मागणी केली.

नवाबाने आजारी असल्याचे नाटक करुन मेनन यांना भेटण्यास नकार दिला. त्याचवेळी जुनागढने ‘बाबरियावाड’ आणि ‘मांगरोल’वर आपला दावा ठोकला.

नवाबाने मांगरोलचा ताबा सोडावा म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानास पत्र लिहिले गेले. त्यावेळी पाकिस्तानने बाबरियावाड आणि मांगरोल यांच्या समावेशाच्या प्रक्रियेची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली. या दोन्ही प्रदेशांनी भारतात समावेश होण्याच्या पत्रावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

परिस्थिती हाताबाहेर जात होती. भारताने या दोन राज्यांचे प्रशासन भारतीय प्रशसकीय सेवेच्या हातात दिले. जुनागढवरील आर्थिक निर्बंध वाढवले. नवाब आधीच सगळा खजिना घेऊन कराचीला पळाला होता. जुनागढची परिस्थिती बिघडत चालली होती.

तिथल्या लोकांचा रागही वाढत चालला होता. २७ ऑक्टोबरला जुनागढचा दिवाण असलेल्या भुट्टोने जुनागढची आर्थिक परिस्थिती बघितली आणि स्वत:हून भारताकडे मदत मागितली. ५ नोव्हेंबरला एका राज्य समितीने जुनागढचे काम आपल्या हातात घेतले.

वाईट आर्थिक परिस्थिती आणि जनतेचा दबाव यामुळे दिवाण भुत्तो पूर्णपणे तुटला होता. याचवेळी ९ नोव्हेंबरला भारतीय सेनेने जुनागढमध्ये प्रवेश केला. नेहरूंनी औपचारिकता म्हणून याची सुचना लियाकत अली खान यांना दिली होती.

यावेळी लियाकत अली खानने-

“जुनागढ पाकिस्तानचा भाग असुन, पाकिस्तानने बोलवल्याशिवाय कोणालाही जुनागढमध्ये येण्याचा अधिकार नाही” असे प्रत्यूत्तर दिले होते. तसेच भारताने आपले सैन्य जुनागढमध्ये तैनात करुन आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

या आरोपाचे उत्तर देण्यासाठी लॉर्ड माऊंटबेटन यांनी मोहम्मद अली जिना यांना सांगितले की, “जुनागढच्या बाबतीत पाकिस्तानने केलेल्या कारवाया पूर्णपणे चुकीच्या आहेत.” या स्पष्टीकरणानंतर पाकिस्तान प्रशासन गप्प बसले. असेच उत्तर पाकिस्तानला नंतर माणावदर संस्थानाच्या वेळेसही भेटले होते.

शेवटी भारतीय सैन्याच्या सुरक्षेखाली २० फेब्रुवारी, १९४८ला जुनागढमध्ये जनमत चाचणी घेण्यात आली. एकुण २,०१,४५७ मतदारांपैकी १,९०,८७० लोकांनी आपले मत नोंदवले. यातील पाकिस्तानला पडलेल्या मतांची संख्या होती फक्त ९१. या चाचणीचा निकाल लागताच जुनागढ भारतात सामिल झाले.

माणावदर आणि जुनागढ या दोन्ही ठिकाणी भेटलेल्या मानहानीकारक पराभवाने पाकचे पूर्णपणे खच्चीकरण झाले होते. हा मुद्दा पाकिस्तानने कित्येक वेळा संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत मांडला आहे, प्रत्येक वेळी त्यांच्या हाती निराशाच आली आहे.

भारताचा मुख्य भाग असुनही पाकिस्तानचा हा बालहट्ट आता नकाशामार्फत पूर्ण केला जात आहे असंच दिसतंय. झालेल्या घटनांचा आदर करुन पराभव स्विकारण्याची पाकिस्तानची आजही तयारी नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!