या मॅचमध्ये गावस्कर आऊट व्हावा यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत होते!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतात क्रिकेट हा एक धर्मच आहे. क्रिकेट हा भारतीय खेळ नसला तरी, भारतीयांचे क्रिकेट प्रेम मात्र जगावेगळे आहे. क्रिकेट मध्ये जिंकल्याचा आनंद म्हणजे भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी उत्साहाचा आणि उत्सवाचा क्षण असतो. त्यात जर मॅच पाकिस्तान विरुद्ध असेल तर भारतीयांना क्रिकेट म्हणजे धर्मयुद्धच वाटते. म्हणून जेंव्हा जेंव्हा पाकिस्तान विरोधात भारत मँच जिंकतो तेंव्हा तेंव्हा भारतात दिवाळीच साजरी होते. भारताच्या गावागावात क्रिकेटवेडे रसिक आढळून येतातच.

भारताच्या गावागावात अगदी गल्लीबोळातही क्रिकेट हा खेळ आवर्जून खेळला जातो. रोज संध्याकाळी मोकळ्या मैदानात क्रिकेटचे मॅचेस सुरु असलेल्या तुम्हाला हमखास दिसतील. क्रिकेट जिंकल्यावर उत्सव साजारा करणाऱ्या भारतावर जर कधी क्रिकेट हरण्याची वेळ आलीच तरी तितक्याच संतप्त प्रतिक्रियाही उमटतात. अगदी खेळाडूंचे पुतळे जाळण्याच्या घटनाही भारतात घडल्या आहेत. क्रिकेट हा भारतीयांसाठी फक्त खेळ नाही, असंख्य भारतीयांच्या भावना या खेळाशी जोडल्या गेल्या आहेत.

क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मानाचा मानला जाणारा वर्ल्डकपचा सामना पहिल्यांदा १९७५ साली खेळण्यात आला होता. क्रिकेटची पंढरी, लॉर्डसच्या मैदानावर हे सामने खेळले गेले होते. यात जगातील फक्त आठ संघ समाविष्ट झाले होते, ज्यात भारतीय संघाचाही समावेश होता.

या पहिल्या वहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सपशेल हार पत्करली होती. भारतीय खेळाडूंनी हा सामना असा काही खेळला होता सगळ्यांनीच भारतीय खेळाडूंची टिंगल केली होती.

त्यावेळी वर्ल्डकपच्या सामन्यात ६० षटक (ओव्हर) असायचे. एका दिवसात साठ षटक खेळून भल्या भल्या क्रिकेटवीरांनाही घाम फुटला होता. भारतीय संघाने या सामन्यावेळी अशी काही कामगिरी केली होती की, क्रिकेट रसिक त्याची आठवणही काढत नाहीत. या सामन्यात भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. क्रिकेट समीक्षकांनी तर हा पराभव म्हणजे राष्ट्रीय शरमेची बाब असल्याचे म्हटले होते. या संघातील खेळाडूवर चारी बाजूंनी टीकेची झोड उठली होती.

त्यात एक पठ्ठ्या तर असा होता ज्याने शेवटपर्यंत नॉटआउट राहूनही फक्त ३६ धावा केल्या होत्या. पहिल्या वर्ल्डकपमधील अपयशाचा शिल्पकार म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. या खेळाडूचे नाव ऐकल्यावर मात्र तुम्हाला जोराचा धक्का बसेल. पहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या अपयशाला कारणीभूत ठरलेला क्रिकेटवीर होता सुनील गावस्कर. भारतीय संघातील खेळाडू आपलाच गडी बाद व्हावा म्हणून प्रार्थना करत होते, तर इंग्लंडला मात्र हा खेळाडू शेवटपर्यंत टिकून राहावा असे वाटत होते.

या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा बॅटींग करून भारतासमोर ३३४ धावांचा डोंगर उभा केला होता. भारतीय संघासाठी धावांचा हा डोंगर पार करणे खूपच कठीण काम होते. भारताकडून पहिल्यांदा सलामीसाठी सुनील गावस्कर आणि एकनाथ सोलकर उतरले.

एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी भारताला वेगाने धावा काढणे गरजेचे होते. परंतु गावस्करांनी तर सगळा डावच उलटा करून टाकला. सुनील गावस्कर यांच्या खेळाचे चाहते जगभर आहेत. क्रिकेट जगतात एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आजही सन्मानाने पहिले जाते मात्र, या सामन्यात त्यांनी अगदी कासवाच्या गतीने धावा केल्या आणि भारताला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आणली. त्यांचा खेळ पाहून भारतीय खेळाडू चरफडत होते तर इंग्लंडचे खेळाडू मनातल्या मनात खुश होत होते.

१७४ चेंडूत गावस्करांनी फक्त ३६ धावा केल्या. ज्यात एक चौकार होता. भारतीय संघाने तीन विकेटवर १३२ धावा केल्या आणि ही मॅच २०२ धावांनी हरली. गावस्करांच्या या सुमार खेळामुळे भारतीय संघालाही आपसूकच या टीकेचे धनी व्हावे लागले.

गावस्करांच्या या खेळाबद्दल बोलताना इंग्लंडचे क्रिकेटर जॉफ्री बॉयकाट यांनीही खुमासदार शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, आम्हाला तर अगदी मनापासून वाटत होते की गावस्कर आउटच होऊ नयेत. त्यांनी एखादा कॅच जरी टाकला तरी, आम्ही तो मुद्दामहून सोडून देत होते. ज्यामुळे ते शेवटपर्यंत नॉटआउट राहिले. ते शेवटपर्यंत टिकून राहिले म्हणूनच आम्ही जिंकू शकलो. आजदेखील वर्ल्डकप क्रिकेटमध्ये हा सामना सर्वात सावकाश खेळला गेलेला खेळ म्हणून ओळखला जातो.

दुसऱ्यांदा जेंव्हा भारतीय संघ इस्ट आफ्रिकेच्या विरुद्ध खेळला तेंव्हाही गावस्कर संघात होते. मात्र यावेळी त्यांच्या बॅटिंगमध्ये बरीच सुधारणा झाली होती. या सामन्यात मात्र त्यांनी ८६ चेंडूत ६५ धावा काढल्या होत्या. भारताने हा सामना जिंकला पण त्यानंतर झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारत पुन्हा हरला.

इतक्या कमी गतीने खेळूनही त्या संपूर्ण सामन्यात भारतीय संघात गावस्करच सर्वाधिक धावा काढणारे भारतीय खेळाडू ठरले.

गावस्करांना आजही या सामान्याबद्दल विचारले असता ते काहीच उत्तर देत नाहीत. अर्थात सर्वच खेळाडूंनी या सामन्यात अत्यंत सुमार कामगिरी केली होती. पण, गावस्करसारख्या कसलेल्या खेळाडूनेही तोच कित्ता गिरवला किंबहुना जास्तच गिरवला हीच सर्वात शरमेची बाब होती.

७ जून १९७५ रोजी खेळला गेलेला हा सामना तसा वर्ल्डकपचा पहिलाच सामना म्हणून ऐतिहासिक आहे पण तरीही क्रिकेटप्रेमी त्याची आठवण काढणं टाळतात.

सर्वात पहिला खेळल्या गेलेल्या या वर्ल्डकप सामन्याची आणखीही काही गमतीदार वैशिष्ट्ये होती. यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे या सामन्यातील सर्वच संघांनी क्रिकेटची पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. आठच्या आठ संघांनी संपूर्ण पांढऱ्या रंगांचे ड्रेस घातले होते. प्रुडेन्शिअल या इंस्युरंस कंपनीने हा सामना प्रायोजित केला होता म्हणून याला सुरुवातीला प्रुडेन्शिअल कप म्हटले जात होते. नंतर याचे नामांतर वर्ल्डकप असे करण्यात आले. विशेष बाब म्हणजे यातील श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका या संघांना कसोटी संघाचा दर्जाही नव्हता. वेस्ट इंडीजच्या संघाने या पहिल्या वर्ल्डकपचा विश्वचषक जिंकला होता.

भारताने मात्र लाजीरवाणा पराभव पत्करून देशावर नामुष्कीची वेळ आणली, म्हणूनच आजही क्रिकेट रसिकांना या सामन्याच्या आठवणीही नकोशा वाटतात!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!