कमळाच्या देठापासून कापड बनवण्याच्या हिच्या कल्पनेची पंतप्रधानांनीसुद्धा दखल घेतलीय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ यासारख्या योजनांचा उगम भारतात झाल्याने त्याला पुरक असे नवनवीन उद्योग आता भारतात सुरु होत आहेत. पुर्णपणे भारतीय बनावटीच्या वस्तूंना बाजारातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात प्रादेशिक साधनसंपत्तीचा वापर करून अनेक नवनविन संकल्पना आता पुढे येत आहेत.

यातीलच एक आहे कमळाच्या देठांपासुन धागेदोरे बनवून वेगवेगळे कापडी उत्पादनं बनवणे. बिजियाशांती टोंगब्रॅम यांनी ही संकल्पना सुरू केली आहे.

कमळाच्या देठापासून काढलेल्या सूताने बनविलेले स्कार्फ, स्टॉल्स, नेक टाय हे तुम्ही तरी कधी बघितलेय का? मणिपूर येथील २७ वर्षीय बिजियाशांती टोंगब्रॅम हेच उत्पादन त्यांच्या ग्राहकांना पुरवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यासह अनेकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे.

बिजियाशांती आता आपल्या कष्टाळु प्रक्रियेचा वापर करून सध्या सगळ्यात जास्त मागणी असलेले उत्पादन म्हणजेच फेसमास्क बनवण्याची तयारी करत आहेत.

ईशान्य प्रदेशातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव, लोकतक जवळ, थांगा टोंगब्रॅम खेड्यातील जॉयकुमार टांग्राम आणि सनाहल टोंगब्रॅम यांची मुलगी असलेल्या बिजियाशांती यांनी वनस्पती शास्त्रात पदवी घेतली आहे. बिजियाशांती टोंगब्रॅमचे वडील मणिपूरच्या मत्स्यपालन विभागात क्षेत्र सहायक आहेत. २०१४ मध्ये जीपी वुमेन्स कॉलेज, इम्फालमधून पदवी प्राप्त केल्यावर बिजियाशांती यांचं प्रारंभिक धोरण त्यांच्या क्षेत्रात कृषी पर्यटन स्थापन करण्याचे होते.

त्या म्हणतात की कमळाच्या औषधी मूल्याबद्दल त्यांना नेहमीच आकर्षण वाटले होते आणि कमळाची शेती सुरू करण्यासाठी जगभरातून विविध प्रकारच्या कमळांना गोळा करण्याची कल्पना त्यांच्या मनात होती. आर्थिक स्त्रोतांच्या अभावामुळे त्यांची ही कल्पना सत्यात उतरू शकली नाही.

यादरम्यान त्यांनी कमळाच्या औषधी गुणधर्मांचा प्रयोग चालूच ठेवला. उद्योजकता विषयक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर त्यांनी सुगंधी कमळाची चहाची पाने यशस्वीरित्या विकसित केली. बिजियाशांती त्यावेळी म्हणाल्या, “लोकतक तलावात वाढणार्‍या वेगवेगळ्या वनस्पतींच्या औषधी मूल्यांचा शोध घेण्याची मला नेहमी इच्छा होती. यातल्या काही प्रजाती तर इथल्या स्थानिक लोकांनाही माहीत नाहीत.”

स्वत:चा व्यवसाय तयार करण्याच्या धडपडीत, २०१८ मध्ये एका कौटुंबिक मित्राच्या सल्ल्याने त्यांचे सगळे आयुष्य पालटले. बिजियाशांती म्हणाल्या की म्यानमारच्या भूमीतील शेतकरी विणकामासाठी कमळाच्या कांड्यातून धागा कसा बनवतो याबद्दल त्यांच्या वडिलांच्या मित्राने त्यांना सांगितले होते.

“मी या कल्पनेवरच अडकले आणि स्वतःचं संशोधन करायला लागले. संपूर्ण २०१८ हे वर्ष मी फक्त संशोधनकार्य आणि प्रयोगात घालवले.”

मे २०१९ मध्ये त्यांनी आपल्या परिसरातील काही मूठभर महिलांच्या मदतीने कमळांच्या देठापासून सूत काढणे आणि नेकटाय, मफलर इ. विणणे सुरू केले. त्यानंतर, त्यांनी ‘सनाजिंग सना थंबल’ हा एक उद्यम स्थापित केला असून यामध्ये आता त्यांच्यासह दहा महिला आता कार्यरत आहेत.

‘सनाजिंग सना थंबल’ची नुकतीच ‘स्टार्ट-अप मणिपूर’साठी निवड झाली. २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘मन की बात’ मधील संबोधना दरम्यान याबाबतीत उल्लेख केला होता.

“त्यांच्या प्रयत्नांनी व कल्पनेने कमळ शेती व वस्त्रोद्योग क्षेत्रात नवा मार्ग खुला झाला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी देखील ट्वीट केले होते ज्यात त्यांनी, “#मनकीबातमध्ये, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूर येथील श्रीमती बिजयाशांती यांच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले ज्यांनी कमळाच्या देठांपासून धागा विकसित करण्यासाठी उद्योग प्रारंभ केला आहे, आणि त्यांचे प्रयत्न आणि नवकल्पनांनी कमळ शेती व वस्त्रोद्योग क्षेत्रात नवीन मार्ग शोधले आहेत.”

बिजियाशांती आता त्यांच्या जिल्हा बिष्णुपूर व इतर जिल्ह्यातील महिलांना प्रशिक्षण देत आहेत. पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केल्यानंतर प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक बचत-गटांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बिजियाशांती म्हणाल्या, त्यांना त्यांची उत्पादने खरेदी करण्यात रस असणार्‍या राज्याबाहेरील लोकांकडून संपर्कही साधण्यात आला होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार मनुष्यबळाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य नाही. सध्या कमळाचे देठ गोळा करण्यापासून, एक स्कार्फ तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात फायबर काढणे आणि नंतर ते विणणे या प्रक्रियेस सुमारे एक महिना लागतो.

उद्योगात काम करणाऱ्या विणकामगार अयिंगबी म्हणतात की कमळाचा धागा हा मुगाच्या रेशीमधाग्या सारखाच आहे. फरक आहे तो फक्त मजबूतीचा . “मुगा रेशीम कमळापेक्षा मजबूत आहे. पण अंतिम उत्पादन रेशमाइतकेच चांगले आहे.” असेही त्या म्हणतात. अयिंगबी, ज्या त्यांच्या पन्नाशीच्या उत्तरार्धात आहेत, आजही त्या पारंपारीक पद्धतीनेच विणकाम करत आहेत. “कमळाचा धागा नाजूक असल्याने मशीन वापरणे आतापर्यंत शक्य नाही. म्हणून आम्ही आजही पारंपारिक हातमाग वापरत आहोत.” असे त्या सांगतात.

उद्योगाचे प्रात्यक्षिक दाखवताना, २७ वर्षीय उद्योजक हातात मुठभर कमळाचे देठ घेऊन ते एका लाकडी ओंडक्यावर ठेवतात. हा ओंडका त्यांच्या वडिलांनी एका नावेच्या लाकडापासुन बनवलेला आहे. त्यानंतर देठाच्या भोवती चाकूने किंचित कापुन त्याचे धागे फुटू नयेत म्हणून हळूवारपणे धागे वेगळे केले जातात. त्यानंतर ते धागे हव्या असणाऱ्या आकारात हाताने रोल केले जातात, त्यानंतर सूताला यंत्रमागाच्या मदतीने हाताने विणले जाते.

निसर्गाचा यथोचित वापर करुन रोजगार निर्माण करण्याचं काम आज बिजियाशांती टोंगब्रॅम करत आहेत. मणिपुरसारख्या दुर्लक्षित राज्यात अशा अनेक भारतीय कल्पनांची गरज आज मणिपुरसारख्या काही राज्यांना आहे. अशा राज्यांतील महिलांसाठी आणि उद्योजकांसाठी बिजियाशांती एक प्रेरणेचा स्त्रोत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!