या अधिकाऱ्याचे शौर्य बघून लाल बहादूर शास्त्रींनी “जय जवान जय किसान”चा नारा दिला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


१९६५ च्या भारत-पाक युद्धात त्यांनी डोगरी रेजिमेंटचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची, पराक्रमाची आणि अप्रतिम नेतृत्व कौशल्याची दाखल घेत भारत सरकारने त्यांना महावीर चक्र प्रदान करून सन्मानित केले.

२६ नोव्हेंबर १९२८ त्यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील अँग्लो इंडियन होते. ते मुळचे भारतीय नसले तरी तिरंग्याबद्दलचे प्रेम त्यांच्या नसानसात भिनले होते.

त्यांच्या रेजिमेंटचे सिपाही त्यांना फक्त आपले सेनानायक म्हणूनच आदर करत असे नाही तर, त्यांच्या आदेशाला एखाद्या देवाच्या शब्दाचा मान होता.

या शूरवीराचे नाव होते लेफ्टनंट कर्नल डीस्मोंड इ. हायडे.

१९६५ साली भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या भीषण युद्धात लेफ्टनंट कर्नल डीस्मोंड इ. हायडे यांनी 3 जाट बटालियन या सैन्य तुकडीचे नेतृत्व केले. स्वातंत्र्योत्तर भारतातील हे दुसरे आणि सर्वात भीषण युद्ध होते असे म्हटले जाते.

या युद्धात त्यांनी ५५० सैनिकांच्या तुकडीसह पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. समोरील सैनिकांची संख्या त्यांच्यापेक्षा दुपटीने अधिक होती आणि त्यांच्याकडे टँक स्कॅड्रनसारखी आधुनिक हत्यारे होती तरीही लेफ्टनंट कर्नल हायडे यांनी डोगरी या लाहोर जवळील गावात घुसून कब्जा घेण्याचे नियोजन आखले. १९६५ सालच्या २१ सप्टेंबर पासून २३ सप्टेंबर पर्यंत हे युद्ध चालू होते.

या तीन दिवसात त्यांनी दाखवलेले शौर्य, कौशल्य आणि स्वतःबद्दलची खात्री या सगळ्या गुणांचे घडवलेले दर्शन भारतीय सैन्यासाठी नेहमीच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरेल. हातात असेल त्या शस्त्रानिशी ते शत्रूवर तुटून पडले.

प्रसंगी हातापाई करून एकमेकांना जबरी जखमी केले. शत्रूच्या बंकरसहित त्या गावातील रस्ते गल्लीबोळ इतकेच काय एक घर देखील त्यांनी सोडले नाही.

पण या युद्धासाठी त्यांना महावीर चक्र मिळाले नाही. तर, पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय आक्रमणापासून लाहोरचे संरक्षण करण्यासाठी इच्छोगील कॅनाल बांधले होते. ऑपरेशन रिडलच्या अंतर्गत ३ जाट बटालियनला हा कॅनाल फोडण्याचे आदेश देण्यात आले होते. जो लाहोरपासून अगदी जवळच्या अंतरावर होता.

६-७ सप्टेंबर रोजीच कर्नल हायडे आणि त्यांच्या सैनिकांनी डोगरी गावावर कब्जा मिळवण्याची तयारी केली होती. याच दिवशी त्यांनी डोगरीवर कब्जा मिळवलाही असता पण, संदेशवहनातील अडथळ्यांमुळे भारतीय सैनिकांकडून आवश्यक असलेली ज्यादा कुमक मिळू न शकल्याने त्यांना त्यादिवशी माघार घ्यावी लागली.

तरीही पुढील आदेश मिळेपर्यंत ते तिथेच तळ ठोकून राहिले.

६ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानच्या इच्छोगील कॅनालवर पहिला हल्ला करण्याचे योजण्यात आले. जाट बटालियनचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल हायडे यांनी शत्रूच्या तीव्र विरोधाला न जुमानता या कॅनालच्या पश्चिमेकडील भागावर कब्जा मिळवला.

त्यांच्या नेतृत्व गुणामुळे आणि सैनिकांना प्रोत्साहन देण्याच्या कौशल्यामुळे त्यांच्या बटालियनमधील एकही सैनिक माघारी फिरला नाही. आपल्या जागेवरून तसूभरही मागे सरकला नाही. शत्रूकडून जोरात आणि सातत्याने चोहोबाजूंनी दारूगोळ्यांचा मारा होत असूनही हे सैनिक हळूहळू पुढे-पुढेच सरकत राहिले. त्यांच्यावर जमिनीवरून, आकाशातून चोहोबाजूंनी हल्ले होतच होते.

९ सप्टेंबर रोजी शत्रू सैन्याने पॅटन आणि शर्मन टँकच्या सहाय्याने मारा सुरु केला. या बटालियनच्या सैनिकांनी शत्रूचे पाच टँक निकामी केले. या सगळ्या ऑपरेशनमध्ये जाट बटालियनने आपल्या अतुलनीय धैर्याचे आणि शौर्याचे प्रदर्शन केले.

लेफ्टनंट कर्नल डीस्मोंडे हायडे यांच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांनी सातत्याने आपल्या बटालियनच्या सैनिकांची हिंमत वाढवल्यानेच बटालियनला हे यश प्राप्त करणे शक्य झाले.

भारतीय सैन्य दल आणि जाट बटालियन यांच्यात वेळेत संवाद न झाल्याने लेफ्टनंट कर्नल हायडे आणि त्यांच्या सैनिकांना दोन आठवडे संतपुरा गावातच तळ ठोकावा लागला. हे गाव पाकिस्तानच्या अंतर्गत प्रदेशात येत होते. याठिकाणी उभे राहून ते डोगरीवर कब्जा मिळवण्याच्या आदेशाची वाट पाहत होते.

दोन आठवड्यात डोगरीमध्ये पाकिस्तानी सैन्याची संख्या वाढली. आधीच त्यांची एक बटालियन तिथे हजर असताना तिच्या मदतीसाठी त्यांनी आणखी एक बटालियन तिथे तैनात केली. या बटालियन सोबत स्कॅड्रन टँक देखील होते.

ही सगळी परिस्थिती कर्नल हायडे यांच्यासाठी प्रचंड प्रतिकूल आणि कठीण होती. परंतु २१ सप्टेंबर रोजी आपल्या सैनिकांना संबोधित करताना त्यांनी फक्त दोन गोष्टींवर भर दिला. तुकडीतील एकही सैनिक मागे हटणार नाही. दुसरी बाब म्हणजे कोणत्याही पद्धतीने जिवंत किंवा मुर्दा सगळ्यांनी आता डोंगरीत पोहोचायचेच.

फक्त दोनच दिवसात लेफ्टनंट कर्नल हायडे आणि त्याच्या ३ जाट बटालियनमधील सैनिकांनी डोगरीवर संपूर्ण कब्जा मिळवला. या लढाईत आपले ८६ सैनिक शहीद झाले परंतु त्यांनी पाकिस्तानच्या ३०० सैनिकांना यमसदनी धाडले होते.

लेफ्टनंट कर्नल हे एक सैनिक म्हणून प्रचंड पराक्रमी होतेच. पण, ते आपल्या तत्वांशीही तितकेच प्रामाणिक होते. शौर्य पुरस्कार प्रदान केलेल्या सैनिकांसाठी भारत सरकारच्या वतीने प्रवासासाठी मोफत तिकीट दिले जाते. त्यांना महावीर चक्र मिळाले असले तरी त्यांनी कधीही या सवलतीचा लाभ घेतला नाही. भारतीय सैन्यात रुजू झाल्याच्या पहिल्या दिवासांपासूनच ते अगदी मजबूत आणि कडक सैनिक होते.

जाट बटालियनने २३ सप्टेंबर १९६५ रोजी जो पराक्रम गाजवला त्याबद्दल या बटालियनला तीन महावीर चक्र, चार वीर चक्र आणि सात सेना पदके प्रदान करण्यात आली. अशा भीषण युद्धातही सैनिकांना अशी कोणती प्रेरणा मिळते की ते युद्धभूमीवर टिकून राहतात, असे विचारले असता लेफ्टनंट कर्नल हायडे यांनी उत्तर दिले,

“मेजर शेखावत लढतात कारण त्यांना त्याच्या माणसांच्या डोळ्यातील त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आणि त्याच्या गावातील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल जो आदर असतो, तो गमवण्याची त्यांना भीती असते. आपला आदर गमावण्याची भीती त्यांना मृत्यूच्या भीतीवर मात करण्यास कारणीभूत होती. मेजर शेखावत लढले म्हणूनच इतर सैनिकही त्यांच्या मागून लढत राहिले.”

लाल बहाद्दूर शास्त्री यांनी ३ जाट बटालियनला भेट दिली. या बटालियनला उद्देशून केलेल्या गौरवपर भाषणातच त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ ही प्रसिद्ध घोषणा दिली होती.

एमएफ हुसेन यांनी युद्धभूमीवर लेफ्टनंट कर्नल हायडे यांचे पोर्ट्रेट पेंट केले. निवृत्तीनंतर ब्रिगेडियर हायडे सातत्याने भारतीय जवानांची परिस्थिती सुधारण्यासाठी आवाज उठवत राहिले. जाट रेजिमेंटच्या माजी सैनिकांना ते मदत करत असत. आयुष्याच्या उत्तार्धात त्यांनी सैनिकांच्या असुविधा दूर व्हाव्यात आणि त्यांना अजून चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ते लढत राहिले.

आयुष्यभर प्रत्येक युद्धात जिद्दीने लढणारा आणि जिंकणारा हा योद्धा कॅन्सरच्या लढाईत मात्र जिंकू शकला नाही. २५ डिसेंबर २०१३ रोजी त्यांचे स्कीन कॅन्सरमुळे निधन झाले.

ब्रिगेडियर हायडे भलेही भारतीय वंशाचे नव्हते मात्र त्याच्या नसानसातून भारताबद्दलचे प्रेम अखेरपर्यंत वाहत राहिले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!