ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी : भाग 3- घड्याळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आज स्त्री असो वा पुरुष, लहानमोठे, सगळ्यांच्याच मनगटावर घड्याळ हमखास दिसतेच. छोट्या डायलचे, मोठ्या डायलचे, वेगवेगळ्या डिझाईनचे घड्याळ आजकाल बाजारात उपलब्ध आहेत.

ब्रिटीश काळात भारतात लोकप्रिय झालेल्या गोष्टींपैकी आणखीन एक गोष्ट म्हणजे हे घड्याळ विशेषतः मनगटी घड्याळ.

घड्याळाचा शोध लागला १५व्या शतकात, जर्मनीमध्ये. एका “पिटर हेनलीन” नावाच्या गृहस्थाने घड्याळाचा शोध लावला. हे मेकॅनिकल घड्याळ होते. गावाच्या वेशीवर टांगलेले असायचे. दर तासाला घड्याळाला ठोके द्यावे लागायचे. शिवाय त्याला तेल घालणे, त्याची दुरुस्ती करून घेणे हेही काम असायचे. या कामासाठी एक माणूस नेमला जाई. त्यालाच वॉचमन म्हणत.

आता सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आलेत त्यामुळे आता वेळ बघायची तर आपण त्यातच बघू शकतो. पण तरीही मनगटी घड्याळालाच जास्ती प्राधान्य दिले जाते. आजकाल तर घड्याळ पण डिजिटल झालेत. या डिजिटल घड्याळात तुम्ही रोज किती चालता, ब्लड प्रेशर किती आहे, कोणाचा फोन आला आहे ते बघणे इत्यादी अनेक कामे त्या घड्याळाच्या माध्यमातून तुम्हाला करता येतात.

कुणाला भेटवस्तू द्यायची असेल तर घड्याळासारखा दुसरा उत्तम पर्याय सापडणे अवघडच. घड्याळासाठी प्रसिद्ध असलेला देश म्हणजे स्विझर्लंड. गेल्या अनेक वर्षांपासून इथली घड्याळं जगभरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.

टाटा ग्रुपनेही टायटन, मक्सिमा असे काही स्वदेशी घड्याळांचे पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. पण अगदी भारीतला लूक हवा असेल तर मात्र स्विसच्या महागड्या घड्याळाशिवाय पर्याय नाही

पूर्वी देखील भारतात घड्याळ स्विझर्लंडमधून यायचे पण ब्रिटीश काळात त्यावरही अनेक निर्बंध लादण्यात आले.

साधारण १८०० साली जेव्हा ब्रिटीशांनी जवळपास निम्म्या भारतावर कब्जा केला होता आणि उरलेलाही त्यांच्या ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते. तेव्हा जगात एकूण जितकी घड्याळे बनत होती त्याच्या निम्मी (जवळजवळ २ लाख) युकेमध्ये बनवल्या जात होत्या.

या घड्याळी हँडमेड असायच्या. यांचे उत्पादन लंडन, बकिंगहम, मेचेस्टर, ग्लास्गो या ठिकाणी व्यायचे. पुढे अमेरिका आणि स्विझर्लंडने आपल्या इथे घड्याळांचे उत्पादन वाढवले साहजिकच ब्रिटीश घड्याळांवर परिणाम झाला.

भारतात ब्रिटीश राज असल्याने घड्याळांचे मार्केटिंग गोरेच करत त्यामुळे साहजिकच अमेरिकन आणि स्विस घड्याळे फक्त श्रीमंत लोकांमध्येच राहिली.

पूर्वी म्हणजे साधारण १९२०पर्यंत पुरुष पॉकेट वॉच वापरायचे तर हे मनगटी घड्याळ स्त्रिया वापरायच्या. मनगटी घड्याळ वापरायची सुरुवात १५७१मध्ये झाली.

इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिला ड्युक ऑफ नॉर्थउंबरलँडने भेट म्हणून एक मनगटी घड्याळ दिले. त्यानंतर कित्येक वर्ष घड्याळ फक्त “रॉयल फॅमिली”मधल्या स्त्रियाच वापरायच्या. पुरुष मात्र पॉकेट वॉचची चेन हाताला गुंडाळून वापरायचे.

पुढे जेव्हा पहिलं महायुद्ध सुरु झालं तेव्हा सैनिकांना सोयीचं पडावं यासाठी त्यांना मनगटी घड्याळ देण्यात येऊ लागले. महायुद्ध संपल्यानंतर कमी किंमतीत ही घड्याळं सामान्य जनता पण विकत घेऊ शकली. तेव्हाच या “रिस्ट वाॅच”चा प्रसार होऊ लागला.

इंग्रजांच्या हातातील ते घड्याळ बघून आपल्यालाही त्याची उपयुक्तता लक्षात आली आणि हळूहळू भारतातही याचा प्रसार वाढू लागला. अगदी मोठमोठ्या नेत्यांच्या मनगटावर देखील हे घड्याळ दिसायचे. साहजिकच त्यांना बघून त्यांचे अनुयायीसुद्धा मनगटी घड्याळ वापरू लागले. १९२०च्या दशकात हा खप कितीतरी पटींनी वाढला जो आजतागायत वाढतोच आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एचएमटी ही घड्याळ कंपनी स्थापन झाली. जपानसोबत एकत्रित येऊन ही कंपनी स्थापित झाली. जपानकडे याचे तंत्रज्ञान होते आणि आपल्याकडे कच्चा माल. अगदी सर्वसामान्यांना परवडेल आणि दणकट अशा घड्याळी त्या काळात भारतीयांमध्ये लोकप्रिय होत्या.

नंतर मात्र टायटनसारखे नवीन ब्रान्ड आले आणि एचएमटीचा खप कमी झाला. हळूहळू कंपनी घाट्यात जाऊ लागली. २०१२ला तर कंपनीला तब्बल २४२ कोटीचा तोटा झाला होता. 

आता तर बाजारात कित्येक नवीन कंपन्या आल्या आहेत. जुने दणकट, वर्षानुवर्षे टिकणारे डिझाईन जाऊन नाजूक, थीम बेस्ड डिझाईन्स आलेत.

बघायला अगदी छोटी अशी ही गोष्ट आज आपल्या आयुष्याच्या वेळेचा एक अविभाज्य भाग बनलीये.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!