युनेस्कोच्या बैठकीसाठी नेहरूंनी भारतातलं पहिलं “फाईव्ह स्टार हॉटेल” उघडलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झालेला भारत नुकताच उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. जागतिक पटलावर आपले स्थान निर्माण करण्यासाठी भारताची धडपड सुरु होती. ते साल होते १९५५चे. पॅरीसमध्ये युनेस्कोची परिषद भरली होती. या परिषदेला भारताच्या वतीने पंतप्रधान नेहरू देखील उपस्थित होते. या परिषदेत नेहरूंनी युनोस्कोची पुढली परिषद भारतात भरवण्याचा प्रस्ताव मांडला. नेहरूंच्या विनंतीला मान देत आयोजकांनी हा प्रस्ताव स्वीकारला.

१९५६ सालची युनेस्कोची परिषद भारतात भरवण्याचे निश्चित करण्यात आले. युनेस्कोसारख्या जागतिक संस्थेचे सदस्य भारतात येणार म्हणजे त्यांचा पाहुणचारही तशाच पद्धतीने व्हायला हवा, ही बाब तर ओघाने आलीच.

नेहरू परिषदेचे निमंत्रण देऊन तर आले मात्र भारतातल्या वास्तव परिस्थितीने ते थोडेसे हडबडले. कारण, तेव्हा परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासारखे एकही फाईव्ह स्टार हॉटेल भारतात नव्हते. पुढच्याच वर्षी युनेस्कोचे यजमानपद भारताला भूषवायचे होते. यासाठी त्यांनी सरकारी खर्चाने दिल्लीत एक मोठे फाईव्ह स्टार हॉटेल आणि कन्व्हेन्शन हॉल उभे करण्याचा निर्णय घेतला.

कामाला सुरुवात तर झाली. पण, निधी अभावी कामाची गती ढिली पडली. त्याकाळी सरकारी कामासाठीही निधीची तरतूद करणे हे एक जिकिरीचे काम होते.

भारतातील जी राजेशाही संस्थाने होती अशा संस्थानांच्या राजकुमारांना विनंती करून, त्यांच्या मदत केल्यावरच हे एवढे मोठे काम होणे शक्य होते. संस्थानाच्या देणगीतून आणि सरकारी तिजोरीतील पैशातून दिल्ली येथे भव्य, अलिशान हॉटेल अशोक उभे राहिले.

देशातील हे पहिले आणि तेही सरकारी फाईव्ह स्टार हॉटेल होते.

संस्थानांनी या हॉटेलसाठी पैसे द्यावेत असे पंडितजी म्हणाले आणि दिल्लीचे त्याकाळचे रियासतकार डॉ. करण सिंग यांनी हे मान्य केले. नेहरूंनी सरकारी जमीन द्यायचे मान्य केले आणि बांधकामासाठीचा खर्च रियासतकार करतील, असे ठरले.

रियासतकारांनी १० ते १२ लाख रुपये या बांधकामासाठी खर्च केले. पण, २५ एकर जागेतील या अलिशान हॉटेलचे बांधकाम तेवढ्या पैशात पूर्ण होते कठीण दिसत होते. तेंव्हा सरकारी तिजोरीतून २ कोटी रुपयांचा निधी या हॉटेलसाठी मंजूर करण्यात आला.

त्याकाळी या हॉटेलच्या बांधकामासाठी एकूण ३ कोटी रुपयांचा खर्च आला होता. सरकारचा निधी या हॉटेलच्या बांधकामात खर्च झाल्याने हे पहिले सरकारी मालकीचे फाईव्ह स्टार हॉटेल ठरले.

या हॉटेलचे बांधकाम आणि सोबतचा परिसर मिळून एकूण २५ एकराचा परिसर आहे. या हॉटेलच्या बांधकामात नेहरू स्वतः लक्ष घालत. बारीकसारीक गोष्टींकडे स्वतः लक्ष देत.
आज दिल्लीमध्ये यापेक्षा जास्त चांगले फाईव्ह स्टार हॉटेल्स उभे आहेत. पण, या पहिल्या फाईव्ह स्टार हॉटेलची त्याकाळची शान काही औरच होती.

आजही या हॉटेलसमोर उभे राहून याचे एकेकाळचे वैभव अनुभवता येऊ शकते. या हॉटेलचे बांधकाम सुरु असताना जवाहरलाल नेहरू स्वतः घोड्यावरून रपेट मारत येथे पाहणी करायला येत. परिसरात एक चक्कर मारत. छोट्यातल्या छोट्या गोष्टींकडे जातीने लक्ष देत. अगदी फुलझाडे कुठे लावायची, कोणती लावायची, याबाबतीतही ते स्वतः सूचना करत.

१९५६ साली होणाऱ्या युनेस्कोच्या नवव्या परिषदेसाठी हे हॉटेल सज्ज झाले. १९५६ साली इथे ही परिषद यशस्वी रित्या पार पडली.

हॉटेल अशोकाच्या आवारात पंडित नेहरूंनी स्वतः एक आंब्याचे झाड लावले होते. या झाडाला अजूनही आंबे लागतात. या हॉटेलमध्ये करण्यात येणारे लोणचे असो की जाम त्यासाठी याच झाडाचे आंबे आजही वापरले जातात.

या हॉटेलमध्ये ५५० रूम्स आहेत आणि १११ सूट्स. दिल्लीतील सगळ्यात मोठे आणि विनाखांबांचे कन्वेन्शन हॉल याच हॉटेलमध्ये आहे. अशोक हॉटेलचे बांधकाम पाहताना भारताच्या सुवर्णकाळाची झलक दिसून येते. यातील सूट देखील विशेष नावाने ओळखले जातात. नटराज सूट, काश्मीर सूट, राजपूत सूट, एक अध्यक्षीय सूट असे अलिशान सूट येथे पाहायला मिळतात.

थोर सम्राट राजा अशोकच्या नावावरून याला हॉटेल अशोक हे नाव देण्यात आले आहे.

भारतातील हे पहिले फाईव्ह स्टार हॉटेल मुघल स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
दिल्लीत अशोकसारखे एक प्रेक्षणीय हॉटेल उभे राहावे हे नेहरूंचे स्वप्न होते. हॉटेल पाहता क्षणीच भारताच्या त्याकाळाच्या कलाकृतीची झलक मिळते. याचे नमुनेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आपल्याला मोहात पाडते.

युनेस्कोच्या परिषदेनंतर याच हॉटेलमध्ये अनेक मोठमोठी परिषदे, चर्चासत्रे भरवण्यात आली. या परिषदांसाठी जगभरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहिली. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा देखील समावेश आहे.

सौदी अरेबियाचे राजदूत तर अशोकच्या अध्यक्षीय सूटमध्ये तीन वर्षांसाठी राहायला होते.

१९८० साली प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर विजेता चित्रपट गांधी, याचे चित्रीकरण देखील याच हॉटेलमध्ये करण्यात आले होते.

आज ६४ वर्षानंतर दिल्लीमध्ये एकापेक्षा एक खाजगी फाईव्ह स्टार हॉटेल आहेत. त्यांच्या भाऊ गर्दीत अशोक हॉटेलचे नाव काहीसे झाकोळून गेले आहे. एकेकाळच्या या दिमाखदार हॉटेलची चमक आज विझून गेली आहे. इतर सरकारी आस्थापनांप्रमाणेच मंत्री आणि त्यांचे चमचे यांच्या सरकारी सुविधा फुकटात मिळाली पाहिजे या अट्टाहासाने या हॉटेलची रया घालवली आहे.

लालफितीचा कारभार आणि हॉटेलच्या व्यवस्थापनासाठी अपुरा निधी यामुळे एकेकाळचे हे दिमाखदार हॉटेल आज अडगळीत फेकले गेले आहे. कधीकाळी ज्या हॉटेल मध्ये परदेशी पाहुण्यांनी भारतीय पाहुणचाराचा आनंद घेतला तिथे आज अगदीच मोजके लोक ये-जा करतात.

परंतु, या हॉटेलच्या भव्यता पाहून त्याच्या एकेकाळच्या समृद्ध इतिहासाची कल्पना येते. मात्र, ही भव्यता आणि त्याचा इतिहास याबद्दल आज कुणालाच अभिमान वाटत नाही एक दुर्भाग्यपूर्ण वस्तुस्थिती आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!