आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
नील आर्मस्ट्राँग हे नाव मानवी इतिहासात स्वर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलेलं एक पाऊल मानवी इतिहासातील एका अभूतपूर्व अशी घटना होती. अपोलो ११ या नासाच्या यानात नील आर्मस्ट्रॉंग, एल्विन ऑल्ड्रीन आणि मायकल कॉलिन्स या तीन अंतराळवीरांनी चंद्रवारी केली होती.
चंद्रवारी करून परतलेल्या नील आर्मस्ट्रॉंगचे जगभरात गौरव करण्यात आला होता. अनेकांनी त्याला आपला रोल मॉडेल मानले होते. नील आर्मस्ट्रॉंगच्या चंद्रावारीची जितकी चर्चा जगभरात केली जाते तितकी त्याच्या रहस्यमय मृत्यूची करण्यात येत नाही.
नील आर्मस्ट्रॉंगचा अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये २०१२ साली मृत्यू झाला. मृत्यू होण्याच्या दोन आठवडे अगोदर त्याची हार्ट सर्जरी करण्यात आली होती. त्याच्या मृत्यूनंतर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आर्मस्ट्रॉंगच्या चाहत्यांनी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. पण नील आर्मस्ट्रॉंगच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही.
नील आर्मस्ट्रॉंगच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराला मोठा फायदा झाला होता. न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार ८२ वर्षांच्या आर्मस्ट्राँगच्या निधनानंतर त्याच्या परिवाराने फार संदिग्ध प्रतिक्रिया दिली होती.
त्याच्या दोन मुलांनी हॉस्पिटल व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नील आर्मस्ट्रॉंगचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला होता. हेल्थ फेयरफिल्ड हॉस्पिटलच्या विरोधात त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले होते.
आर्मस्ट्रॉंगच्या मुलांनी आरोप करताना म्हटले होते की हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याची योग्य ती काळजी घेण्यात हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी हालगर्जीपणामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाला. सुरुवातीला हॉस्पिटलच्या वतीने हे आरोप फेटाळण्यात आले. परंतु नंतर हॉस्पिटलने त्याच्या परिवाराला ६ मिलियन डॉलर म्हणजेच ४१ कोटी रुपये देऊ केले होते व हे प्रकरण मिटवण्याची गळ आर्मस्ट्राँगच्या परिवाराला घातली होती.
नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, हॉस्पिटलने सुरुवातीला ज्यावेळी आरोप फेटाळले, त्यावेळी नील आर्मस्ट्राँगच्या मुलांनी कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली होती, यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन पाण्याखाली जाईल, या भीतीने त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी त्याच्या मुलांना चर्चेला आमंत्रित केले.
४१ कोटी रुपयांच्या मोबदल्यात हे प्रकरण त्याकाळी दाबण्यात आले. अत्यंत गुप्तपणे हा व्यवहार करण्यात आला होता.
नील आर्मस्ट्रॉंगला छातीत होणाऱ्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याठिकाणी त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशननंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, तो हिंडताफिरता झाला होता, अशी माहिती त्यांच्या बायकोने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला दिली होती. सर्वकाही सुरळीत असताना हॉस्पिटलच्या स्टाफमधील एका नर्सने आर्मस्ट्रॉंगच्या शरीरातील पेसमेकर काढून घेतला. यामुळे त्याच्या हृदयाजवळील भागात रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली.
यानंतर मात्र त्याची तब्येत खालावत गेली व २५ ऑगस्ट २०१२ रोजी त्याचा मृत्यू झाला.
न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये नील आर्मस्ट्रॉंगच्या मृत्यूविषयी आणि त्याच्या मुलांनी हॉस्पिटलशी केलेल्या सौदेबाजीबद्दल संपूर्ण माहिती प्रकाशित केली होती, यानंतर एकच गदारोळ उडाला होता. याच रिपोर्टमध्ये माजी अमेरिकन राष्ट्रध्यक्ष बिल क्लिंटन यांचे प्राण वाचवणाऱ्या डॉ. क्रेग स्मिथ यांनी म्हटले होते की ऑपरेशन झाल्यानंतर पेस मेकर काढावं लागतं. पण पेसमेकर काढायच्या वेळी रक्तस्त्राव देखील होतो, म्हणून हे काम ऑपरेशन थिएटरमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचे असते, पण आर्मस्ट्राँगच्या बाबतीत कुठलीच काळजी घेतली गेली नाही आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला होता.
चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून जगभर ख्याती असलेला, चंद्रावर आपल्या पावलाचे ठसे असलेला हा मानव एका हॉस्पिटलमधील नर्सने केलेल्या निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडला होता, हे खरंतर फार दुःखद होतं. परंतु त्यावेळी त्याच्या मुलांनीच पैशांसाठी बापाच्या मृत्यूचे गूढ जगासमोर येऊ दिले नाही, हे त्याहून अधिक दुःखद आहे.
नील आर्मस्ट्रॉंगने आज जरी देह ठेवलेला असला व ते आपल्यात नसले तरी चंद्रावर पाउल ठेवणारा पहिला माणूस म्हणून तो अजरामर झाला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.