आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
हॉलीवुड आणि बॉलीवुड कलाकारांचा समाजमनावर मोठा प्रभाव असतो. त्याचं राहणीमान, ड्रेसिंग स्टाईल, चालण्या-बोलण्याची लकबीपासून अगदी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील लोकांना प्रभावित करतात. या गोष्टी लोक अंगीकारण्याचा प्रयत्नही करतात. मात्र, अनेकदा असं होतं की, हे कलाकार लोकांच्या आरोग्यासाठी घातक असणाऱ्या गोष्टींच्या जाहिराती करताना दिसतात.
भारतात अनेक कलाकारांनी पान मसाल्यासारख्या वादग्रस्त जाहिराती केल्या आहेत आणि वादातही सापडले आहेत. मात्र, एखादा हॉलीवुड अभिनेता पान मसाल्याची जाहिरात करून वादात सापडला तर? आणि तोही साधासुधा अभिनेता नाही तर ००७ म्हणून प्रसिद्ध असलेला जेम्स बॉण्ड!
आता तुम्ही म्हणाल हॉलीवुड अभिनेता कशाला भारतात जाहिरात करेल अन् तीही पान मसाल्याची! मात्र, ही गोष्ट एकदम १०० टक्के खरी आहे. जेम्स बॉण्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पियर्स ब्रॉस्नन या आयरिश अभिनेत्यानं भारतात एका पान मसाल्याची जाहिरात केलेली आहे.
जेव्हा २०१६ साली पहिल्यांदा ही जाहिरात माध्यमांमध्ये आली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पियर्स ब्रॉस्ननसारखा मोठा हॉलीवुड अभिनेता भारतीय पान मसाल्याची जाहिरात करतो ही नक्कीच मोठी गोष्ट होती. मात्र, या जाहिरातीनंतर पियर्स अडचणीत सापडला. व्यसनाधीनतेला प्रोत्साहन दिल्याच्या कारणावरून दिल्ली सरकारनं त्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. त्यानंतर काही काळसाठी ही जाहिरात काढून टाकण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतर ती पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली. पियर्स ब्रॉस्नन कोट्यवधी लोकांना प्रभावित करू शकणारा अभिनेता आहे. त्यानं पान मसाल्यासारख्या उत्पादनाचं समर्थन करणं योग्य नाही. त्यानं याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी दिल्लीच्या तंबाखू नियंत्रण कक्षाची भूमिका होती.
दिल्लीतून कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर पियर्स ब्रॉस्नननं त्याला उत्तर दिलं आहे. पान बहार कंपनीनं आपली फसवणूक केली आहे. जाहिरात करारावर सही करण्यापूर्वी कंपनीनं उत्पादनाचं घातक स्वरूप सांगितलं नव्हतं. पान बहार फक्त एक माऊथ फ्रेशनर असल्याचं सांगितलं होतं म्हणून आपण ती जाहिरात केल्याचं स्पष्टीकरण पियर्सनं दिलं.
आपला कंपनीसोबतचा करार संपुष्टात आला असून, दिल्ली सरकारला अशा जाहिरांतींविरोधात सहकार्य करण्यास तयार असल्याचं त्यानं म्हटलं होतं. याशिवाय, भविष्यात पान मसाला उत्पादनांच्या किंवा इतर हानिकारक उत्पादनांच्या जाहिराती तो करणार नसल्याचं लेखी आश्वासन देखील पियर्सनं दिलं होतं.
तंबाखु आणि इतर तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळं दरवर्षी १० लाख भारतीयांचा बळी जातो. भारतात तंबाखूच्या आणि इतर घातक पदार्थांच्या जाहिराती पाहून धूम्रपान किंवा तंबाखू चघळणाऱ्या युवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळं सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादन कायद्यातील (COTPA) कलम 5 अंतर्गत तंबाखू उत्पादनांचा प्रचार किंवा जाहिरात करण्यास बंदी आहे.
तंबाखू उत्पादक माऊथ फ्रेशनर, च्युइंग गम यासारख्या उत्पादनांच्या नावाखाली घातक उत्पादनं खपवून अतिशय हुशारीनं कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. याबाबत काही तज्ज्ञांनी भारतीय जाहिरात मानक परिषदेशी पत्रव्यवहार करून त्यांच्या कानावर हा प्रकार घातलेला आहे.
एखादी व्यक्ती किंवा कंपनी तंबाखूच्या वापरास प्रोत्साहन देताना दोषी आढळल्यास त्याला १ हजार रुपये दंड किंवा COTPA च्या कलम ५चं उल्लंघन केल्याबद्दल दोन वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. हाच गुन्हा पुन्हा केल्यास ५ हजार रुपये दंड आणि पाच वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतुद आहे.
गेल्या पाच वर्षांच्या काळात दिल्लीनं सरकारच्यावतीनं, हानीकारक पदार्थांच्या जाहिराती करणारे कलाकार, तंबाखू कंपन्या, मीडिया हाऊसेस आणि तंबाखू कंपन्यांनी पुरस्कृत केलेल्या कार्यक्रमांच्या आयोजकांविरोधात ५० पेक्षा जास्त नोटीसा दिल्या आहेत. अशा प्रकारच्या कारवाया करणारं दिल्ली एकमेव सरकार आहे.
काही महिन्यांपूर्वी बॉलिवुड अभिनेता शाहरूख खान आणि अजय देवगण दोघे एक पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये एकत्र दिसले होते. अजय देवगण गेल्या काही वर्षांपासून ही जाहिरात करतो मात्र, शाहरूख खान पहिल्यांदाच या जाहिरातीमध्ये दिसला. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शाहरूखच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पान मसाल्याची जाहिरात केल्यानं त्याला आदर्श मानणाऱ्या तरुणांमध्ये चुकीचा संदेश पोहचत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होत. त्यानंतर दिल्ली तंबाखु नियंत्रण मंडळानं अजय देवगण, शाहरूख खान आणि सनी लियॉनी या तीन कलाकारांना पान मसाल्याच्या जाहिराती केल्याप्रकरणी नोटीसा बजावलेल्या आहेत. मात्र, एखाद्या हॉलिवूड अभिनेत्याला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे पियर्स ब्रॉस्नननं स्वत: त्याला प्रतिसाद देत पुन्हा अशी चुक न करण्याची ग्वाही दिली.
पियर्स ब्रॉस्ननबद्दल सांगायचं झाल्यास तो आयरिश अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. जेम्स बॉण्डच्या भूमिकांसाठी तो जगभरात ओळखला जातो. त्यानं १९९५ ते २००२ या काळात बॉण्ड सिरीजमधील गोल्डन आय, टुमॉरो नेव्हर डाईज, द वर्ल्ड इज नॉट इनफ आणि डाय अनादर डे या चार चित्रपटांमध्ये मुख्य भुमिका केलेल्या आहेत. त्यामुळं जगभरात त्याचे अब्जावधी चाहते आहेत. अनेक लोक त्याला आदर्श देखील मानतात.
भारतात एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळं वादात सापडलेला ब्रॉस्नन २००१ पासून आयर्लंडचा युनिसेफचा दूत आहे. त्यानं युनिअसेफच्या ‘युनाइट फॉर चिल्ड्रेन’ आणि ‘युनाइट अगेनस्ट एड्स’ या मोहिमांची सुरुवात करण्यात विशेष प्रयत्न केलेले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक लोक कल्याणकारी कामे करत असूनही पियर्स ब्रॉस्नन पान मसाला कंपनीच्या जाळ्यात फसला. कंपनीनं आपल्याला पूर्व कल्पना दिली नसल्याचा आरोप त्यानं केला तर, कंपनीचं म्हणणं होतं त्यानं करारावर सही करण्यासअगोदर आम्ही दिलेली माहिती नीट वाचली नाही.
या सर्व प्रकरणावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कुठलीही वस्तू खरेदी करताना किंवा व्यवहार करताना सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. नाही तर आपला देखील ‘पियर्स ब्रॉस्नन’ होऊ शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.