भटकंती : जाणून घ्या पुण्याच्या हृदयात दडलेल्या पाताळेश्वराचा इतिहास

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ते म्हणतात ना, ‘पुणे तिथे काय उणे’! या उक्तीचा अनुभव मला पुण्यात आल्यावर पदोपदी येत होता. पुण्यात आल्यावर किल्ले, लेण्या फिरायची सवय झाली आणि मग डोक्यात किडा वळवळायला लागला की एवढं ऐतिहासिक पुणे पण इथे लेण्या कशा नाहीत? जरा इकडे तिकडे शोधाशोध केली आणि बरंच काही गवसलं.

पर्वतीच्या लेणी, बाणेरच्या गुहा, चतुर्श्रुंगी आणि अर्थातच, जंगली महाराज रस्त्यावरचं पाताळेश्वर मंदिर!

तर आजचा हा लेख हा याच कातळशिल्पावर.

पुणे शहराचा इतिहास बघायला गेलं तर इथे अनेक राजवटी नांदल्या. त्यापैकी इसवीसनाच्या आठव्या शतकात पुणे परिसरावर राष्ट्रकूट राजवटीचा अंमल होता आणि साधारण त्याच कालावधीमध्ये भांबुर्डा गावठाणाजवळ (सध्याचे शिवाजीनगर, पूर्वी या भागाला भांबवडे म्हटलं जायचं, त्याचं नामांतर इंग्रजांनी भांबुर्डे केले आणि पुढे आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांनी शिवाजीनगर असं नामकरण झालं).

हे मंदिर जमिनीपासून साधारणपणे १.-२ मीटर खाली असल्याने कदाचित याला पाताळेश्वर असं नाव दिलं असावं.

‘या लेण्याचं सध्याचं स्थान म्हणजे जंगली महाराज रस्त्यावरचं, जंगली महाराज मंदिराच्या शेजारी’.

पाताळेश्वर

पुणे शहराच्या हेरिटेज कमिटीने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यादीत याचा समावेश जरी केला असला तर या मंदिराची सध्याची दुरावस्था बघता, वेळीच जर लक्ष दिले नाही तर हा वारसासुद्धा काही वर्षांनी नष्ट होईल हे सांगायला काही वेगळ्या पंडिताची गरज नाही.

या लेण्यात जाण्यासाठी खडक फोडून पायऱ्या तयार केल्या आहेत. त्या उतरून गेल्यावर आपल्यासमोर येतो तो प्रांगणातील नंदीमंडप. साधारण ४ मीटर उंचीच्या आणि १२ जाडजूड खांबांवर, गोलाकार छत असलेला हा मंडप बांधलेला आहे. नंदी मोठ्या आकाराचा असून त्याच्या मानेभोवती नाग कोरलेला दिसतो. तसेच गळ्यामध्ये घंटांची माळ सुद्धा दिसते.

या प्रांगणात डाव्या कोपऱ्यावर एक ओसरीवजा बांधकाम दिसतं आणि त्याच्या पुढ्यात एक पाण्याचं टाकं आहे. या गुहेचे दोन खांब पुढे आणि मागे एक खोली अशी एकूण रचना आहे.

या ओसरीच्या दाराशीच एक खोदलेले शिल्प दिसतं अर्थात फार निरखून पाहिल्यावर काही अंदाज लावता येतात. प्रख्यात लेणी अभ्यासक जेम्स फर्गुसन याने या लेण्यांबद्दल काढलेल्या अभ्यासपूर्ण टिप्पण्यांमध्ये ही लेणी आठव्या शतकात (राष्ट्रकूट राजाच्या कालावधीमध्ये) तयार झाली असावी असा निष्कर्ष नमूद केला आहे.

पाताळेश्वराची मुख्य लेणी पाहण्यासारखी आहे. मुख्य लेणीच्या पायऱ्या चढून जाताना उजव्या हाताला वरती एक अस्पष्ट होत चाललेला शिलालेख नजरेस पडतो. हा लेख देवनागरीमध्येच असला तरी तो पूर्ण वाचता येत नाही. पहिल्या ओळीतली ‘श्री गणेशायनमः’ ही अक्षरं तेवढी वाचता येतात. अनेक वर्ष झीज झाल्यामुळे उरलेली अक्षरं अस्पष्ट झाली आहेत.

या पायऱ्या चढून गेल्यावर तीन गर्भगृहे कोरलेला गाभारा आहे. यापैकी मधल्या गाभाऱ्यात भोलेनाथ विराजमान आहेत. अत्यंत देखणे असे ते शिवलिंग पाहून मन प्रसन्न होते! तिन्ही गाभाऱ्याच्या  प्रवेशद्वारापाशी गदाधारी द्वारपाल आहेत. मात्र त्यांचे तपशील मिळत नाहीत.

उजवीकडे नंतर बसवण्यात आलेली एक देवीची मूर्ती आहे आणि डावीकडील गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती आहे. या तिन्ही गाभाऱ्यांना प्रदक्षिणा मारायला एक ओबडधोबड असा दगडी मार्ग आहे. मागे उजवीकडे अर्धवट खोदलेल्या ओवऱ्या आहेत. काही भिंतींवर पानाफुलांची नक्षी आहे.

मुख्य मंडपातील पहिल्या दालनात उत्तरेकडे दोन खांबांमधील भिंतीवर शिवाची आणि विष्णूची शेषशायी मूर्ती खोदलेली आहे. शेषाच्यावर काही मानवी आकृती कोरलेल्या दिसतात. मात्र ही सारीच शिल्पे खराब अवस्थेत आहेत किंवा ती अपूर्ण असावीत. काही अभ्यासकांच्या मते या तिन्ही गाभाऱ्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची स्थापना करून याला देवस्थानाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असावा.

त्यामुळे जरी आज फक्त शिव-पार्वती आणि गणेश विराजमान असले तरीही पूर्वी येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अस्तित्व असेल ही बाब नाकारता येत नाहीत.

पूर्वी हे ठिकाण गावाच्या बाहेर होते परंतु नंतर गावाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याने गावाच्या अगदी मध्यभागी आले. आजमितीला याचा उपयोग केवळ फिरायला जायचे ठिकाण म्हणून केला जातो.

थोडीफार मानसिकता बदलली आणि असलेल्या अवशेषांचे जतन केले तर पुणे शहराच्या पर्यटन विकासाला हे ठिकाण फार महत्वाचा हातभार लावू शकेल.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!