आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्याकडे सकाळी न्याहारी म्हणजे पोहे, उप्पीट. काही ठिकाणी इडली तर कुठे पराठे किंवा भाकर वगैरे. पण बाहेर इतका साग्रसंगीत नाश्ता क्वचितच बघायला मिळेल. एखादा डोनट, ब्रेड सँडविच किंवा फळ असा काहीसा नाश्ता युरोप-अमेरिकेत बघायला मिळतो.
यातही सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे ब्रेड आणि न्यूटेला.
न्युटेला हे जगातलं सगळ्यात लोकप्रिय ब्रेडस्प्रेड आहे. पिडमाँटच्या अल्बा या शहरात 1964 साली जेव्हा पहिल्यांदा न्यूटेला विक्रीसाठी ठेवलं तेव्हा हे चॉकलेट स्प्रेड इतकं जगप्रसिद्ध होईल असे कोणाला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते.
पण या छोट्याशा बरणीत येणाऱ्या साध्याशा चॉकलेट स्प्रेडचा स्वतःचा एक इतिहास आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल.
१९५०च्या काळात दुसऱ्या महायुद्धामुळे इटलीमध्ये चॉकलेटचा तुटवडा निर्माण झाला होता. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून बेकर बनलेल्या न्यूटेलाच्या कर्त्याधर्त्या Michelle Ferrero ची यामुळे खूप मोठी पंचाईत झाली.
इटलीमध्ये सुरुवातीपासूनच हेझलनट मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. कोकोचा तुटवडा आणि वाढलेली किंमत यामुळे त्यांनी या क्रिममध्ये हेझलनटचा वापर करण्यास सुरुवात केली.
तसं बघायला गेलं तर हेझलनट चॉकलेट क्रिम हे Ferrero च्या आधीही इटलीमध्ये खाल्ले जात होते. १८०६ मध्ये नेपोलियनचे दक्षिण अमेरिकेसोबतच्या युद्धाच्या काळात देखील कोकोच्या बिया अव्वाच्या सव्वा भावाने विकल्या जात होत्या. या कारणाने तिथल्या चॉकलेट व्यापाऱ्यांचा धंदा ठप्प होण्याच्या मार्गावर होता आणि तेव्हाच खरी हेझलनट चॉकलेटची निर्मिती झाली.
Michelle चे वडील Pietro Ferrero यांनी १९४६मध्ये Ferrero कंपनी स्थापन केली. हेझलनट, साखर आणि थोडं कोको यांचं मिश्रण करून त्यांनी एक क्रिमी पेस्ट बनवली जेणेकरून ब्रेडसोबत खायला सोयीचे होईल. त्याला त्यांनी “Giandujot” असे नाव दिले.
याच रेसिपीवर थोडे अजून प्रयोग करून Michelle ने हेझलनट-कोको क्रिमचा पहिला जार बनवला आणि त्याला नाव दिलं Nutella.
इटलीमध्ये न्युटेला प्रचंड लोकप्रिय झालं. तिथून त्याचा जगाचा प्रवास सुरु झाला आणि ते जर्मनीत येऊन पोहोचले. जर्मन लोक या न्युटेलाच्या प्रेमातच पडले.तिथून फ्रान्स आणि नंतर संपूर्ण युरोपात घरोघरी पोहचल्यावर न्युटेलाची बरणी ऑस्ट्रेलियामध्ये येऊन पोहोचली आणि Lithgow, Sydney येथे युरोपबाहेरील पहिली न्युटेलाची फॅक्टरी उघडण्यात आली.
तिथून अमेरिका, आशिया खंड असे करत संपूर्ण जगभरात न्युटेलाची जादू पसरली आणि ब्रेड-न्युटेला सगळ्यात आवडता नाश्ता बनला.
न्युटेलाच्या बरण्या आजही सुरुवातीला बनलेल्या बरणीसारख्याच बनवल्या जातात आणि लगेच ओळखू येतात.
न्युटेलाची बरणी कोणी संपवली यावरून घरात, हॉस्टेल मध्ये तर भांडणं होतातच. पण या सगळ्यांच्या लाडक्या ब्रेडस्प्रेडवरून इटली-फ्रान्स मध्ये सुद्धा भांडण होता होता राहिलं होतं. झालं असं की २०१५साली फ्रान्सच्या पर्यावरण मंत्री रॉयल यांनी न्युटेला खाणं त्यांच्या नागरिकांसाठी आणि पर्यावरणासाठी चांगलं नाही आणि आपण ते खाणं बंद केले पाहिजे असे वक्तव्य केले होते.
यावरून इटलीच्या मंत्र्यांनी त्यांना हे खाणं तुम्ही बंद करून टाका आणि इटलीचे कुठलेच पदार्थ खाऊ नका, असे प्रत्युत्तर दिले.
रॉयल यांनी असे वक्तव्य करण्यामागचे कारण हे होते की, पॅरिस climate summit मध्ये त्यावेळी पाम तेलाच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवरून घमासान चर्चा उसळली होती. आणि न्युटेलामध्ये ते वापरले जात असल्याने ते योग्य नाही असे त्यांचे म्हणणे होते.
पुढे २०१७मध्ये पाम तेलाला शाश्वत उत्पादन म्हणून मान्यता मिळाली आणि न्युटेला खाणाऱ्यांच्या जीवात जीव आला.
Sara Rosso या न्युटेलाप्रेमी ब्लॉगरने न्युटेलासाठी एक खास दिवस असावा असे सुचवले आणि २००७ पासून ५ फेब्रुवारी न्युटेला दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो.न्युटेलाची लोकप्रियता इतकी जास्त आहे की, एका दाम्पत्याने आपल्या मुलीचे नावच न्युटेला ठेवले आहे. आता बोला!
२०१४ मध्ये आपल्या लाडक्या न्युटेलाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी Michelle Ferrero इटली मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. कितीही आर्थिक मंदी आली तरी त्याचा Ferrero कंपनीवर फारसा परिणाम झाला नाही.
नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल अशा न्युटेलाला पुढच्या वेळी ब्रेडला लावताना त्याचा हा इतिहास नक्की आठवा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.