मुहम्मद पैगंबरांनी अरबस्तानात फिरणाऱ्या रानटी टोळ्यांना ‘धर्म’ दिला

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब


मुहम्मद पैगंबराच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षे अरबस्तानावर रोमन आणि इराणी साम्राज्याची सत्ता होती. इतरत्र ठिकठिकाणी ज्यू, ख्रिश्चन जमातींच्या वसाहती होत्या. भटकणाऱ्या अरब टोळ्यांचे तांडे पसरलेले होते. मुहम्मद पैगंबरांचा जन्म होण्याआधी अरबस्थानमधील लोकांना ज्यू आणि ख्रिश्चन धर्माची माहिती होती. पण, त्यांनी यापैकी एकही धर्म स्वीकारला नव्हता.

त्याच्या देवाने अजून त्यांच्यासाठी खास कोणताही प्रेषित पाठवला नसल्यामुळे त्यांना अधिकृत धर्म नाही असा त्यांचा विश्वास होता. काही अरबांना असे वाटत असे की, देवाने त्यांच्यासाठी खास असे कोणतेही सुक्त, मंत्र किंवा सुरा सांगितलेली नाही.

परंतु, ६१० साली रमजानच्या १७व्या रात्री मुहम्मद यांच्याशी देवाने बोलणी केली. मुहम्मद यांना देवाने पहिली पवित्र सुरा ऐकवली. डोंगरातील एका गुहेत झोपले असताना देवाने जिब्राइलच्या रुपात देवाचे दर्शन झाले. जिब्राइलने मुहम्मदांना ईश्वरी संदेश वाचण्याची अज्ञा केली. तेंव्हापासून त्यांच्या मुखातून उत्स्फूर्त अशी वाणी बाहेर पडत असे.

ज्या दिवशी जिब्राइलने मुहम्मदांना ही आज्ञा केली त्या रात्रीला इस्लाममध्ये लैलात-अल-कद्र असे म्हणतात.

इतर प्रेषितांप्रमाणेच मुहम्मददेखील स्वत:ला यासाठी सक्षम समजत नसत. देवाचा पहिला पवित्र शब्द हा सामान्य लोकांप्रमाणे अरब भाषेतीलच होता. त्यांनी वदलेली ही वचने कुराणमध्ये संग्रहित करण्यात आली. कुराणचा शब्दशः अर्थ आहे मोठ्याने वाचणे.

मुहम्मद यांचा जन्म ५७०मध्ये मक्का शहरात झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षातच त्यांचे मातृ-पितृ छत्र हरपले. त्यांचे काका अबू तालिब यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनी खादिजा या विधवेशी विवाह केला. त्यांना चार मुली होत्या, उम्म कुल्थूम, रुकय्या, झैनब आणि फातिमा.

खादिजा ही इस्लाम धर्म स्वीकारणारी पहिली व्यक्ती होती. यासाठी इस्लाममध्ये तिचा विशेष आदर दिला जातो.

मुहम्मदांचा कार्यकाळ दोन भागात विभागला जातो. पहिला– मक्का येथील काळ (६१०-६२२) आणि दुसरा मदिना येथील काळ (६२२-६३२). ६२२मध्ये मुस्लीम समूहाच्या छोट्याशा गटाने मक्काहून मदीनेला स्थलांतर केले. या स्थलांतराला हिज्रा म्हटले जाते. इस्लामच्या विकासातील हा एक मोठा बदल होता.

मुस्लीम धर्माच्या कॅलेंडरमधील ६२२ हे पहिले वर्ष होते. इस्लाममध्ये मक्का या शहराला पवित्र स्थळ समजले जाते. मदिना आणि जेरुसलेम या शहरांना देखील इस्लाममध्ये पवित्र मानले जाते. मुहम्मद यांच्या काळात त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अल्लाच्या संदेशामुळे फक्त त्यांच्या जमातीचेच नाही तर जगभरातील लोकांना एकत्र आणले.

करेन आर्मस्ट्रॉंग हिने आपल्या मुहम्मद या पुस्तकात लिहिले आहे :

कोणत्याही महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाप्रमाणेच आपण मुहम्मद यांचा विचार केल्यास, ते एक असामान्य बुद्धीमत्तेचे अलौकिक व्यक्तिमत्व होते. एका उत्कृष्ट साहित्याची निर्मिती करणे, एका धर्माचा पाया रचणे आणि एका जागतिक शक्तीचा शोध लावणे या गोष्टी काही साधारण किंवा सामान्य कोटीतील नाहीत. परंतु, त्यांच्या अलौकिक शक्तीचे मूल्यमापन करायचे झाल्यास त्यांच्या जन्माच्या वेळचा त्यांचा आजूबाजूचा समाज कसा होता हेही पहावे लागेल. अल्लाचे म्हणणे सांगण्यासाठी मुहम्मद जेंव्हा हिरा पर्वतावरून खाली आले तेंव्हा खरे तर ते एक अशक्य वाटावी अशी कृती करणार होते.

परंतु मुहम्मद यांनी अरबांमध्ये फक्त २३ वर्षांत हा अमुलाग्र बदल घडवून आणला.

मुहम्मदांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आणि दैवी होते. त्यांनी कधीही स्वतः देव असल्याचे सांगितले नाही. उलट ते स्वतःला देवाचा दूत मानायचे. मृत माणसाला जिवंत करण्यासारखे कुठेलीही चमत्कार त्यांनी केले नाहीत. पुढल्या दहा वर्षात त्यांनी संपूर्ण अरबस्तान इस्लाम धर्माखाली आणला.

प्रेषित यांना कुराण एकेका प्रकरणातून माहित झाले असा मुस्लिमांचा विश्वास आहे. ही प्रकरणे त्यांच्या आकारावरून रचलेली आहेत. आकाराने छोटे प्रकरण सर्वात आधी आणि मोठे प्रकरण सर्वात नंतर. छोटी किंवा लहान सुरा या मक्केच्या वास्तव्यातील आहेत.

६३०मध्ये मुहम्मदांनी मक्केच्या विरोधात आपली शक्ती पहिल्यांदा वापरली. ६३० ते ६३२ या दोन वर्षात इतर अरब टोळ्यांनी देखील इस्लाम धर्माचा स्वीकार केला. मुहम्मदांच्या शिकवणीने मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्या या टोळ्यांचे आयुष्य पूर्णतः बदलून गेले.

मुहम्मदांनी आपल्या शिकवणीतून जगावर एक अमिट ठसा उमटवला. कित्येक शतकाच्या मानवी इतिहासच त्यांनी बदलून टाकला.

कुराण हे त्यांनी मागे ठेवलेले एक गोड फळ आहे ज्यावर आजही लाखो लोकांच्या आत्म्याचे भरणपोषण होते. इस्लाम हा एकेश्वरवादी धर्म आहे. ख्रिश्चन आणि ज्यू धर्मातील काही शिकवणुकीचा प्रभाव आजही मुस्लीम धर्मावर दिसून येतो. आदम, नोहा, इसाक, जोसेफ, मोझेस, डेव्हिड, सोलोमन, जोनाह, आणि जॉन ही न्यू टेस्टामेंटमध्ये आढळणारे काही प्रेषित कुराणमध्ये देखील आढळतात.

कुराण, हदीस, इज्मा कियास आणि इज्तिहाद यांना इस्लाममध्ये मार्गदर्शनाचे स्त्रोत समजले जाते. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला शहादाह, सलात, जकात, रोजे, हज यात्रा या पाच गोष्टी बंधनकारक आहेत.

मक्का येथील काबा मशीद प्रत्येक मुस्लिमासाठी पवित्र स्थळ आहे. रोजचा नमाज पढताना त्यांना या मशिदीच्या दिशेने तोंड करावे लागते. मदिना येथील मस्जिद-अल-नबी हेदेखील मुस्लीम धर्मातील एक पवित्र धर्मस्थळ आहे.

मदिना येथील सुरुवातीच्या दिवसात इस्लाम धर्म हा एकेश्वरवादी कल्पनेवर आणि मोहम्मद हेच आपले प्रेषित असल्याच्या धारणेवर आधारलेला होता. इस्लाम धर्मातील शरिया ही कुराणवर आधारित इस्लामी कायद्यांची संहिता आहे. तर उलेमा या ग्रंथात प्रेषिताच्या संदेशाचा अर्थ उलगडून सांगण्यात आला आहे.

अवघ्या काही दशकातच इस्लामचा प्रभाव जगभर दिसून येऊ लागला. आज उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मोरोक्कोपासून पूर्वेकडे पाकिस्तानपर्यंत अनेक राष्ट्रे इस्लाम धर्मीय आहेत. शिवाय तुर्कस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया हेही इस्लामी देश आहेत. रशिया, चीन, भारत या देशांतही मुस्लीम लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!