शाहजहानने पोरीच्या शॉपिंगसाठी चांदणी चौक वसवलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


स्त्रियांचा सगळ्यात आवडता छंद कुठला असे जर एखाद्याला विचारलं तर तो काय सांगेल? मला तरी असं वाटतं की खरेदी हेच नाव सर्वानुमते येईल.

पुण्यात तुळशीबाग आहे, मुंबईत फॅशन स्ट्रीट आहे, सुरतला तर मोठा कापडबाजार आहे. कुठलाही बाजार महिलांना भुरळ पडल्यावाचून रहात नाही. बाजारपेठांची संस्कृती फार जुनी आहे. यांची सुरुवात कशी झाली हे कोणालाच माहिती नाही.

असाच एक बाजार म्हणजे दिल्लीत असणारा चांदणी चौकातला बाजार. पण हा बाजार शहाजहानने केवळ त्याच्या मुलीला खरेदी करता यावी म्हणून तयार केला होता हे आपल्याला माहिती आहे का?

thepostman

त्या काळात वसवलेला हा बाजार आजही एवढा का प्रसिद्ध आहे? हा बाजार कसा चालू झाला? इथे काय काय मिळतं? याची आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती घेऊया.

चांदणी चौक हा बाजार मुगल काळापासून दिल्लीत आहे. हा चौक तेव्हापासून आहे जेव्हा दिल्लीत शहाजहानचे राज्य होते. आपल्या काळात शहाजहानने दिल्लीच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. बऱ्याच नवीन वास्तूंची निर्मिती केली त्यातीलच एक हा चांदणी चौकाचा बाजार.

शहाजहानचा आपली मुलगी जहांआरा बेगमवर खूप जीव होता. तिच्या आनंदासाठी शाहजहान कुठल्याही थराला जायला तयार असायचा. जहांआरा खरेदीची प्रचंड आवड होती. ती जिथे पण जायची तिथून नवीन गोष्टी खरेदी करून आणायचीच. शहाजहानला एक दिवस आपल्या मुलीची ही आवड कळली. तेव्हा शहाजहानने दिल्लीतच असा बाजार तयार करण्याचा निर्णय घेतला की जिथे जहांआराला सगळं काही एकाच जागेवर उपलब्ध होईल.

ज्या ठिकाणी जहांआराला सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळतील असा बाजार तयार करा असा शहाजहानने हुकूम सोडला त्यासाठी त्याने जगभरातून मोठमोठ्या व्यापाऱ्यांना दिल्लीला पाचारण केले. १६५० साली हा बाजार तयार करण्याचे काम चालू झाले. या बाजाराची रचना अत्यंत वेगळी करण्याचं ठरवण्यात आलं जेणेकरून या बाजाराचं नाव सर्वत्र पोहचेल.

हा बाजार चौकोनी आकाराचा होता. याच्या चारही बाजूस दुकानांसाठी जागा ठेवण्यात आली होती. मधला भाग यमुना नदीसाठी सोडण्यात आला होता. थोड्याच दिवसांत कारागिरांनी या बाजाराची संपूर्ण रचना केली आणि हा बाजार तयार झाला.

त्या काळात बाजारच्या मधून वाहणारी यमुना नदी ही चांदणी चौकाच्या बाजाराचं मुख्य आकर्षण होतं आणि चांदणी चौक या नावाच कारण सुद्धा.

चंद्राचं प्रतिबिंब रात्रीच्या वेळी जेव्हा नदीच्या पाण्यावर पडायचं तेव्हा तो खूप सुंदर नजारा असायचा. हळूहळू हाच नजारा या बाजाराची ओळख बनत गेला व या चौकाचं नाव चांदणी चौक असं केलं पडलं.

बाजार चालू झाला तसे इथे व्यापारी येऊ लागले. हा बाजार प्रचंड आकर्षक होता. सुरवातीला इथे फक्त लहान लहान व्यापारी होते पण हळूहळू मोठे व्यापारीसुद्धा या बाजारात आपले दुकान लावू लागले.

पुढे चांदणी चौक हा दिल्लीतला नव्हे तर भारतातला एक प्रसिद्ध बाजार झाला. इथे लोकांची गर्दी वाढत गेली. जहांआरासाठी वसवलेल्या या बाजारात आता सामान्य लोक सुद्धा खरेदीसाठी यायला लागली होती. बरेच लोकं चांदणी चौकाच्या बाजाराकडे आकर्षित व्हायला लागले.

thepostman

असं म्हणतात की, इथे सुरवातीला चांदीचा व्यापार खुप जोरात चालत असे. पूर्ण देशभरातून चांदीचे व्यापारी या चौकात चांदी विक्री करण्यासाठी यायचे.

कित्येक लोकांना असं सुद्धा वाटायचं की इथे चांदीचा व्यापार केला जातो म्हणून या बाजाराला चांदणी चौकाचा बाजार असे म्हटले जात असावे.

दिवसेंदिवस इथे आता देशातीलच नाही तर विदेशातूनसुद्धा व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी येत होते. तुर्की, चीन, हॉलंड या देशातून कितीतरी व्यापारी इथे आले होते. त्या काळात दरीबा कला रस्ता हा खूप प्रसिद्ध होता. या बाजारात अत्तर, मोती, सोनं, चांदी अशा महागड्या वस्तू विकल्या जायच्या. खरेदीसाठी लोकं कित्येक मैलांवरून येत असत.

त्या काळात चांदणी चौकाच्या बाजाराला कुठलाही ग्राहक स्वर्ग समजायचा. या एकाच जागेवर ग्राहकाला त्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. हेच कारण आहे की चांदणी चौक जगप्रसिद्ध होता.

सुरुवातीला एकत्र असलेला हा बाजार नंतर उर्दू बाजार, जोहरी बाजार,अशरफी बाजार व फतेहपुरी बाजार अशा ४ बाजारात विभाजित करण्यात आला. हे चारही बाजार वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होते. सुमारे दीड किलोमीटर पसरलेल्या या बाजारात पंधरा हजारांपेक्षा जास्त दुकाने होती.

चांदणी चौकाचा बाजार हा तयार तर एका मुगल राजाने केला होता पण नंतर हा सर्वधर्मीयांसाठी आवडता बाजार बनला व इथे आज आपल्याला प्रत्येक धर्माची ओळख दिसते.

इथे असणारं दिगंबरलाल मंदिर असेल किंवा गौरी शंकर मंदिर असेल, आर्य समाजाच दिवाण सभागृह असेल किंवा मग सेंट्रल बाप्टीस्ट चर्च असेल, इथला शीश गंज साहिब गुरुद्वारा असेल किंवा फतेहपुरी मशीद असेल हे सगळे आपल्यासमोर सर्वधर्म समभावाचे उदाहरण आहेत. फक्त इतकंच नाही तर इथे सर्व धर्माचे व्यापारी सुदधा राहत असायचे. इथे आपल्याला विविधतेत एकात्मता दिसेल.

आज चांदणी चौकतला बाजार बराच बदलला आहे. आधी केवळ चांदीसाठी ओळखणारा बाजार आता सगळ्याच गोष्टींचा होलसेल मार्केट बनला आहे. जुन्या बाजाराची जागा आता नव्या बाजाराने घेतली आहे. इथला चांदणी चौक चोर बाजार सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. अस म्हणतात की इथे चोरीचं बरच सामान विकलं जातं.

१७ व्या शतकापासून आज सुद्धा चांदणी चौकाचा बाजार हा महिलांचा सगळ्यात आवडता बाजार म्हणून टिकून आहे. त्याच कारण म्हणजे इथे महिलांच्या खरेदीसाठी असणारी दुकाने पाहून आपण चक्रावून जाताल.

thepostman

आपला देश हा जगभरात मसाल्यांकरिता प्रसिद्ध देश म्हणून ओळखला जातो. त्याच प्रमाणे खारी बावली हे सुद्धा प्रसिद्ध मसाल्याचं मार्केट म्हणून ओळखलं जात. इथे एवढ्या प्रकारचे मसाले मिळतात की तुम्ही फक्त नाव घ्या, मसाला हजर असेल. हेच कारण आहे की सतराव्या शतकानंतर आजसुद्धा हे मसाल्याचं प्रसिद्ध मार्केट म्हणून ओळखलं जातं.

या सगळ्या बाजारांसोबत इथे किनारी बाजार, मोती बाजार आणि मीना बाजार सारख्या सुद्धा काही जागा आहेत ज्या सुद्धा बऱ्याच प्रसिद्ध आहेत. या बाजारांत असणाऱ्या वातावरणामुळेच आपल्याला असा बाजार दुसरीकडे कुठे पहायला मिळत नाही.

तर आपल्या सुरवातीपासूनच प्रसिद्ध असलेला हा चांदणी चौकाचा बाजार आजही तितकाच प्रसिद्ध आहे आज सुद्धा या बाजारात एवढी गर्दी असते की पाय ठेवायला सुद्धा जागा मिळत नाही. भारतात खूप सारे बाजार आहेत पण चांदणी चौकाच्या बाजाराची गोष्टच काही वेगळी आहे. दिल्लीत गेल्यावर केवळ देशातीलच नाही तर परदेशातील नागरिक सुद्धा चांदणी चौकाच्या बाजाराला भेट देतात. जर तुम्ही कधी दिल्लीला गेले तर या बाजाराला नक्की भेट द्या व खरेदीचा आनंद घ्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!