आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एकविसावं शतक हे तंत्रज्ञान आणि इंटरनेटचं आहे. तंत्रज्ञानात झालेली प्रचंड प्रगती म्हणजे तिसरी औद्योगिक क्रांती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून संदेशवहनाव्यतिरिक्त अनेक उपयुक्त कामं आज होत आहेत.
ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे इंटरनेटचेही काही फायदे-तोटे आहेत, रोजच्या बातम्यांतून आणि वर्तमानपत्रांतून आपल्याला त्याचे नमुने पाहायला मिळतात.
मागच्या काही वर्षांत ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला. घरबसल्या एका क्लिकवर आपण काहीही खरेदी अथवा विक्री करू शकतो. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी खूप कमी वेळात मोठी कमाई केली. ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या या देवाण-घेवाणीला ईकॉमर्स असेही संबोधले जाते.
आज ईकॉमर्स मार्केटची उलाढाल सुमारे २४.२८ ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. तर भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत या ईकॉमर्स सेक्टरमधील उलाढाल सुमारे १५००० कोटी इतकी आहे. थोडक्यात देशाच्या तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत ईकॉमर्स महत्वाची भूमिका बजावत आहे. कोविड आणि लॉकडाऊनच्या काळात तर ईकॉमर्सचं महत्व आणखी वाढलं. वस्तू आणि वेगवेगळ्या सेवांच्या व्यापारासाठी आज इंटरनेट हेच महत्वाचं साधन बनलंय.
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि शॉपीफाय या कंपन्यांचं प्रभुत्व आज अनेक प्रकारच्या वस्तूंच्या व्यापार क्षेत्रावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर भारतातील अर्बन कंपनी ही कंपनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सेवा पुरवते. पण प्रचंड आर्थिक बळ असलेल्या या ईकॉमर्स क्षेत्राची सुरुवात नेमकी कशी झाली याचं सविस्तर वर्णन करण्यासाठी हा प्रपंच.
खरंतर वर्ल्ड वाईड वेबची सुरुवात होण्याआधीच ईकॉमर्सची सुरुवात झाली होती. इतिहासात १९७९ या वर्षाला “ओरिजिन ऑफ ईकॉमर्स” म्हणून संबोधले जाते. इसवी सन १९६० मध्येच अनेक कंपन्यांनी आपली कामं कम्प्युटर नेटवर्कस्-च्या माध्यमातून सुरु केली होती. तर १९७९ मध्ये अमेरिकन नॅशनल स्टॅण्डर्ड इन्स्टिट्यूटने कागदपत्रांचा व्यवहार हा या नेटवर्क्सद्वारे सुरु केला होता.
१९७१-७२ मध्ये एम.आय.टी. आणि स्टॅंडफोर्डच्या विद्यार्थ्यांनी आर्पानेटद्वारे गांज्याची खरेदी-विक्री केली होती. पण या व्यवहाराची गणती ईकॉमर्स व्यवहारांमध्ये करता येणार नाही, याचं कारण म्हणजे हा बेकायदेशीर व्यवहार होता, तसेच या मध्ये इंटरनेटद्वारे अथवा कम्प्युटर नेटवर्क्सद्वारे कोणताही आर्थिक व्यवहार झालेला दिसत नाही.
गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध संशोधकाने टेलिव्हिजन आणि टेलिफोन जोडून खऱ्या अर्थाने ऑनलाईन शॉपिंगची सुरुवात केली. मायकेल अल्ड्रीच आणि त्याच्या वृद्ध पत्नीला वारंवार बाजारात जाऊन सामान आणणे कष्टप्रद होत असे, यावर उपाय म्हणून त्याने टेलिव्हिजन आणि टेलिफोन जोडून वस्तू मागवायला सुरवात केली.
यूजर्स आपल्या टेलिव्हिजन आणि टेलिफोनचा वापर करून घरबसल्या शॉपिंग करू शकतील अशी व्यवस्था त्याने केली आणि या व्यवस्थेला त्याने टेली-शॉपिंग असं नाव दिलं. टेली-शॉपिंगची सुरुवात १९७९ मध्ये झाली.
सन १९८२ साली फ्रांसमध्ये मिनीटेल या उपकरणाचा शोध लागला. यामध्ये ऑनलाईन बँकिंग आणि प्रवासी तिकीट आरक्षण अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. पण या सुविधा फक्त टेलिफोन सबस्क्रायबर्सना मिळत असत, कारण या व्यवस्थेत व्हिडिओटेक्स टर्मिनल आणि टेलिफोन यांचा संयुक्तपणे वापर करण्यात येत. १९९१ मध्ये वर्ल्ड वाईड वेबचा शोध लागल्यानंतर मिनीटेल बंद झाले. मिनीटेलला फ्रेंच-वाईड वेब असंही म्हटलं जातं.
१९८२ मध्येच बोस्टन कम्प्युटर एक्सचेन्ज या ईकॉमर्स कंपनीने पहिल्यांदाच कम्प्युटर्सची विक्री ऑनलाईन पद्धतीने सुरु केली, याच कंपनीला जगातील पहिली ईकॉमर्स कम्पनी म्हणून ओळखले जाते.
६ ऑगस्ट १९९१ रोजी पाहिलं वेब पेज सुरु झालं, आणि वर्ल्ड वाईड वेब हे सार्वजनिकरित्या उपलब्ध असल्याचं सिद्ध झालं. यानन्तर ईकॉमर्स क्षेत्राने भरारी घेतली.
सन १९९२ मध्ये बुक स्टॅक्स अनलिमिटेड या कंपनीने इंटरनेटद्वारे पुस्तकांची विक्री सुरु केली, पुढे याच कम्पनीला बोर्नस अँड नोबल या कंपनीने विकत घेतलं.
या नंतर ऑगस्ट १९९४ साली डॅन कोन याने ‘नेटमार्केट’ नावाची वेबसाईट सुरु करून संपूर्ण व्यवहार इंटरनेटद्वारे सुरु केला. ११ ऑगस्ट १९९४ रोजी फिलाडेल्फियामध्ये कोनने त्याच्या मित्राला एक सिडी ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून विकली, त्याच्या मित्राने १२ डॉलर्स आणि डिलिव्हरीची रक्कम असं पेमेंट त्याला केलं. या व्यवहारामध्ये क्रेडिट कार्ड नंबरसाठी डेटा इन्क्रिप्शन सॉफ्टवेअरचा उपयोग केला होता. अमेरिकेन सरकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने तो क्रेडिट कार्ड नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते जमलं नाही. नेटमार्केटची बातमी न्यू यॉर्क टाइममध्ये छापून आली होती.
या बातमीमुळेच ‘द इंटरनेट शॉपिंग नेटवर्क्स’ या दुसऱ्या वेबसाईटने नेटमार्केटच्या एक महिनाआधीच आम्ही कम्प्युटरच्या साधनांची विक्री सुरु केली असा दावा केला.
१९९५ मध्ये एस. एस. एल. म्हणजेच सिक्युर सॉकेट लेयरचा शोध लागला. एस. एस. एल.च्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण सुरक्षितरित्या पार पाडण्याचं आव्हान यशस्वीपणे पेलण्यात आलं. तर १९९८ मध्ये आर्थिक व्यवहार सुलभ आणि सुरक्षित व्हावा या साठी पेपाल या कंपनीने प्रयत्न केले.
नवद्दिच्या दशकात इबे, ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांचा उदय झाला आणि अर्थव्यवस्थेचं एक नवीन क्षेत्र म्हणून इकॉमर्स क्षेत्राने प्रचंड भरारी घेतली. २००५ मध्ये एटसी या कंपनीने हस्तनिर्मित वस्तूंची विक्री करण्यासाठी वेबसाईट सुरु केली. आज अशा अगणित ईकॉमर्स कम्पन्या आहेत.
आजमितीस आपण घरबसल्या आपल्याला हवं ते मागवू शकतो. पण तंत्रज्ञानाचा हा चमत्कार एका रात्रीत घडला नाही. त्यामागे अनेकांचे कष्ट आहेत. ईकॉमर्सद्वारे व्यवहार झालेली पहिली वस्तू कम्प्युटर असेल किंवा सीडी असेल किंवा गांजा, पण या क्षेत्राचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.