मराठा आरमाराचा वारसा सांगणाऱ्या गोपाळगडाच्या दरवाजाला कुलूप का?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

खाजगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५/१७ वर्षे सतत चर्चेत असलेला अंजनवेलचा गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाल्याचे घोषित झाले. या पार्श्वभूमीवर नुकतीच किल्ल्याला भेट दिली असता किल्ल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावले असल्याचे निदर्शनास आल्याने घोर निराशा झाली.

पश्चिमेकडील आणखी एक दरवाजाही ग्रील आणि काट्या-कुट्या टाकून बंद केलेला आढळला. यामुळे शासनाने हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करताना नेमके कोणते ‘तांत्रिक’ निकष लावले?

याबाबत पुन्हा एकदा इतिहासप्रेमींच्या मनात प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचा ‘संरक्षित स्मारक’ असा बोर्ड लागलेला असताना तिथे ‘टाळे’ पाहायला मिळणे अत्यंत वेदनादायी आहे. मी स्थानिक नागरिक दीपक वैद्य, चिपळूणचे सर्पमित्र अनिकेत चोपडे यांच्यासमवेत बहुचर्चित किल्ले गोपाळगडला (दि. २३ जुलै २०१९) भेट दिली.

साधारणतः १५ वर्षांपूर्वी सतीश झंजाड आणि बबन कुरतडकर या गिरीमित्र प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गोपाळगडची शासन दरबारी विक्री झाल्याच्या विरोधात आवाज उठवला होता.

अलीकडच्या काळात स्थानिक शिवतेज फौंडेशननेही या किल्याच्या संरक्षणार्थ दखलपात्र काम केले आहे. शिवतेज फौंडेशनच्या मनोज बारटक्के यांनीही याबाबत नापसंती व्यक्त केली.

याबाबत फौंडेशन पुन्हा आवाज उठवेल अशी प्रतिक्रिया दिली. या किल्याच्या संवर्धनासाठी यापूर्वी शिवतेज फाऊंडेशन, ऍड. संकेत साळवी, सत्यवान घाडे, सुहास जोशी, गिरीमित्र डोंबिवलीचे मंगेश कोयंडे, खेडचे वैभव खेडेकर, दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर, अजित राणे, आदी अनेकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वास्तू, स्मारके, किल्ले संरक्षित केले जातात.

या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारके म्हणतात. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत केले जाते. संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये यासाठी ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा येथेही लागू करण्यात आला आहे. तरीही गोपाळगडावर ‘टाळे’ लावलेले का आहे? हे अनुत्तरित आहे.

महाराष्ट्रातील विविध राजवटींनी सह्याद्रीत गडपरंपरा निर्मिली. एकापेक्षा एक ताकदीचे, देखणेबुलंद सागरीदुर्ग निर्मिले गेले. शिवकाळात तर या दुर्ग परंपरेला तेज प्राप्त झाले.

कोकण किनारपट्टीवर ताठ मानेने स्वतःची ओळख जपून असणारा याच परंपरेतील अंजनवेलचा गोपाळगड अलीकडेच राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला.

दुर्ग आणि इतिहासप्रेमी, स्थानिकांच्या आग्रही मागणीनंतर शासनाने गोपाळगडला न्याय दिला. प्राचीन काळात वाशिष्ठी नदीतून चिपळूण ते दाभोळ बंदरपर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे.

या मार्गावर नजर ठेवण्यासाठी वशिष्ठी खाडीच्या उगमाच्या आणि संगमाच्या मुखाजवळ दोन किल्ले उभारण्यात आले. यात अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड यांचा समावेश होतो.

हे दोन्ही किल्ले वाशिष्ठीचे पहारेकरी म्हणून ओळखले जातात. यातल्या गोपाळगडावर अनेक राजवटी नांदल्या. विविध कालखंडात गडाची पुनर्बांधणी होत राहिली. गडाचे आजचे स्वरूप हे शिवकालीन आहे.

सन १६६० दरम्यान गोपाळगड स्वराज्यात आला. त्याचा गोपाळगड झाला. स्वातंत्र्यात गोपाळगडाला खासगी मालकीचे ग्रहण लागले.

गडात कलमी आंब्याची बाग फुलविण्यात आली. किल्ल्याची तटबंदी कोसळून, खंदक बुजवून दरवाजा करण्यात आला. दरवाजाला ग्रील बसविण्यात आले. या ग्रीलावरून उड्या मारून आत जाऊन शिवप्रेमी हा किल्ला पाहत असत. मात्र आता किल्ला राज्य संरक्षित झाल्यानंतर तिथे ‘टाळेबंदी’ का आहे? हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

पूर्वी या गडावर ‘खाजगी मालमत्ता’ असे लिहिलेला बोर्ड असायचा. तो बोर्ड शिवप्रेमींना अवस्थ करायचा. गडकोट ही राज्याची मिळकत असताना तिथे खासगी मालकी आलीच कशी? हा पूर्वीचा मूळ मुद्दा आजही अनुत्तरीत आहे.

गोपाळगडावर अनधिकृत बांधकाम, गडातली वडाची झाडे तोडली गेली आहेत. किल्ल्यावरील धान्य कोठारे, बुजवलेल्या विहिरी पुन्हा सुस्थितीत यायला हव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या सागरी आरमाराचा गोपाळगड हा महत्त्वाचा घटक आहे.

गोपाळगडाची अभेद्य तटबंदी तोडून त्या ठिकाणी लोखंडी प्रवेशद्वार बनवले आहे. किल्ल्यात बांधकाम करण्यात आलेले असून हा सारा प्रकार वेदनादायी आहे.

शासनाने ऑगस्ट २०१६ मध्ये ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. स्वातंत्रप्राप्तीनंतरच्या दस्ताऐवजामध्ये सरकारी कातळ अशी नोंद होऊन हा गोपाळगडाचे अस्तित्व नाहीसे झाले होते.

सन २०१५ मध्ये स्थानिकांच्या १८ हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले होते.

तीन बाजूंनी खंदक, २० मीटर लांबीची तटबंदी असलेला गोपाळगड किल्ला १ हेक्टर ५.८३ आरमध्ये विस्तारलेला आहे. किल्ल्याजवळील पठारापर्यंत आजही गाडीने जाता येते. किल्ला एका छोट्या टेकाडावर बांधलेला आहे. टेकडीवरुन दोन बाजूंनी भक्कम तटबंदी समुद्राच्या दिशेने खाली नेलेली दिसते. सर्वात खालच्या भागाला पडकोट आहे. तीन बाजूंनी समुद्र असलेल्या ह्या किल्ल्यावर जमिनीकडून आक्रमण झाल्यास संरक्षणार्थ खोल खंदक आहेत.

जमिनीकडील बाजूला किल्ल्याच्या तटाला १५ बुरुज आहेत. बुरुजांवर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत. गडाला पूर्वेकडे व पश्चिमेकडे दोन प्रवेशद्वारे आहेत.

पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोनही बाजूस देवड्या आहेत. किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, धान्य व दारु कोठारे त्याजवळील बांधीव तलाव, घरांची जोती, तीन विहीरी असे अवशेष दिसतात.

७ एकर क्षेत्रफळ असलेल्या ह्या किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजून शाबूत आहे. तटावर इ.स १७०७ मध्ये फारसी भाषेत कोरलेला एक शिलालेख होता जो आता अस्तित्वात नाही. विजापूरच्या आदिलशाही राजवटीमधे सोळाव्या शतकात गोपाळगड बांधण्यात आला.

शिवाजी महाराजांनी इ.स. १६६० च्या दाभोळ स्वारीवेळी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, याचे पुनरुज्जीवन केले.

या ठिकाणी मराठ्यांच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली. किल्ल्याचे गोपाळगड असे नामकरण करण्यात आले. इ.स १६९९ मध्ये जंजिर्‍याचा सिद्दी खैरातखान याने किल्ला जिंकला. याच काळात त्याने किल्ल्याचा पडकोट बांधला. १७४५ साली हा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकून घेतला.

सन १७५५ च्या पेशवे आंग्रे करारानुसार आंग्रेनी हा गड पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुढे १८१८ पर्यंत तो स्वराज्यात राहिला. १७ मे १८१८ मधे इंग्रज कर्नल केनेडीने हा किल्ला जिंकून घेतला.

हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक व्हावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहे.

गोपाळगड खाडीपातळीपासून सुमारे ३०० फूट उंचीच्या डोंगरावर उभा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या गडाच्या दक्षिण दिशेला मोठी दरी आहे. हा गड किती भक्कम होता? हे तटबंदी पाहताच लक्षात येते. या किल्ल्याची दुरवस्था थांबविण्यासाठी, त्याबाबतचा निश्चित निर्णय होण्यासाठी अजूनही प्रयत्न आवश्यक आहेत.

===

लेखक : धीरज वाटेकर
(साहित्य चपराक दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)

===

या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!