आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज आपण घरबसल्या कोणत्याही ठिकाणाची व्हर्च्युअल सैर करू शकतो, इतकी ताकद सतत विकसित होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाने आपल्याला प्रदान केली आहे. गुगल अर्थ आणि युट्युबमुळे आज हे शक्य होतं. गुगल अर्थ हे दुसरं तिसरं काही नसून सॅटेलाईट इमेजेस आहेत, म्हणजेच गुगल अर्थवर कोणतेही ठिकाण ‘थ्री-डी’मध्ये किंवा ‘टू-डी’मध्ये अगदी सहज दिसू शकतं. फक्त एक ठराविक ठिकाणच नाही तर त्या ठिकाणाच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी देखील दिसू शकतात. पण कोणत्याही देशामधील या प्रकारच्या सॅटेलाईट इमेजेस थेट ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवर टाकायच्या आधी तिथल्या सरकारची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे.
२००५ साली गुगलने गुगल अर्थ प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. कॅनडा, युरोप आणि अमेरिकेतून याचा श्रीगणेशा झाला आणि सर्वप्रथम ते ‘जीपीएस’शी कनेक्ट करण्यात आले. त्यानंतर विविध देशांमध्ये त्यांच्या भूभागाच्या सॅटेलाईट इमेजेस वापरण्याची मोहीम सुरु करण्यात आली. सप्टेंबर २००५ मध्ये दिल्ली, मुंबईसह अनेक मोठ्या शहरांच्या सॅटेलाईट इमेजेसदेखील त्यांनी गुगल अर्थवर आणल्या.
२००० नंतरचे दशक भारतासाठी अत्यंत असुरक्षित होते. सतत होणाऱ्या द*हश*तवादी ह*ल्ल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. २००१ मध्ये तर द*हश*तवाद्यांनी थेट भारतीय संसदेवर ह*ल्ला केला. याचबरोबर दिल्ली, मुंबई, हैद्राबादसारख्या शहरांमधून सतत बॉ*म्बस्फो*टाच्या बातम्या येत असत.
सुरक्षेचा हा प्रश्न लक्षात घेऊन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी गुगल अर्थने वापरलेल्या सॅटेलाईट इमेजेसबद्दल शंका व्यक्त केली होती. त्या इमेजेस द*हश*तवाद्यांच्या हाती लागल्या तर काय अनर्थ ओढावू शकतो याची त्यांना पुरेपूर कल्पना होती.
त्याआधीही भारत सरकारने गुगल अर्थवरील संवेदनशील ठिकाणांबद्दल गुगल अर्थवर आक्षेप नोंदवला होता आणि त्यांना अशा संवेदनशील ठिकाणांना संपूर्णतः ब्लॅक-आऊट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार गुगलने संवेदनशील ठिकाणे ब्लॅक आउट करण्याऐवजी अस्पष्ट किंवा ब्लर करण्याचे मान्य केले. पण गुगल इंडियाच्या प्रवक्त्यांनी अजून तसं काहीही ठरलं नसल्याचं सांगितलं होतं.
गुगल अर्थच्या इमेजेसची स्पष्टता मोजण्याचे एकक म्हणजे मीटर्स/पिक्सेल. म्हणजेच एका पिक्सेलमध्ये किती मीटर्सचे क्षेत्र दाखवणार. जगात सर्व ठिकाणी गुगल अर्थचे साधारण रिजोल्यूशन २०-२५ मीटर/पिक्सेल असते, पण भारत सरकारने त्यावेळी संवेदनशील ठिकाणी हेच रिजोल्यूशन १५ मीटर/पिक्सेल असावे अशी सूचना दिली होती.
सुरक्षेच्या कारणास्तव एखाद्या देशाच्या सरकारने गुगल अर्थवर आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण कोरिया आणि थायलंड या देशांनी गुगलला संवेदनशील ठिकाणांचे फोटोज ब्लर करण्याची मागणी केली आहे. यानंतर २०१६ साली सरकारने गुगल अर्थ आणि गुगल मॅप्सवरील स्ट्रीट-व्ह्यूवर देखील सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप नोंदवला होता. उच्च न्यायालयाने गुगल अर्थ आणि गुगल मॅप्सवरील स्ट्रीट-व्ह्यूवर २०१६ साली बंदी आणली होती, पण २०२२ साली ती बंदी हटवण्यात आली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.