इतक्या ‘अडचणी’ येऊनही लैलाच जॉर्ज फर्नांडीसच्या शेवटच्या दिवसात सोबत होत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


एकाच क्षेत्रात काम करत असताना अनेक प्रेमकथा सुरु होतात. त्यातल्या काही आयुष्यभर टिकतात तर काही अर्धवटच राहतात. बॉलीवुडमध्ये तर अशा अनेक प्रेमकहाण्या आहेत पण, राजकारणाच्या क्षेत्रात मात्र अशा प्रेमकहाण्या जरा कमीच सापडतात. सापडल्या तरी त्यातील प्रसिद्ध अशा कहाण्या अगदीच कमी आहेत.

अशीच एक गाजलेली प्रेमकहाणी होती ती जॉर्ज फर्नांडिस आणि लैला कबीर यांची. दोघांच्याही राजकीय वलयामुळे आणि कहाणीत आलेल्या चढ-उतारामुळे ही प्रेमकथा त्यावेळी भरपूर गाजली.

सगळ्याच प्रेम प्रकरणांप्रमाणेच जॉर्ज आणि लैला यांच्या प्रेमप्रकरणाची सुरुवातसुद्धा फारच गोडीगुलाबीने झाली. या प्रेमकथेची सुरूवात झाली ती कोलकत्ताच्या विमानतळावर. कोलकत्त्यावरुन दिल्लीला प्रवास करताना दोघांची भेट झाली. त्यावेळी लैला रेडक्रॉस या स्वयंसेवी संस्थाबरोबर काम करत होत्या. युद्धात काम करुन घरी जात असताना जॉर्ज फर्नांडिस यांची नजर लैला कबीर यांच्यावर पडली. ओळखीच्या वाटल्याने त्यांनी बोलायला सुरुवात केली. चर्चा करताना लक्षात आले की हे दोघे आधी एकदा भेटले होते. दिल्लीला समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या घरी त्यांची पहिली भेट झाली होती.

या दुसऱ्या भेटी वेळी त्यांच्यात भरपूर गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्या. जॉर्ज लैलाजींना घरी सोडण्यासाठी सुद्धा जात असत.

एका महिन्यातच जॉर्ज यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला. लैला यांनी संयमाने निर्णय घेऊन लग्नाला होकार दिला. कोलकत्त्याच्या भेटीला ३ महिने होत नाहीत तर यांनी २२ जुलै, १९७१ ला लग्न केले.

जॉर्ज फर्नांडिस त्यावेळी भारतीय राजकारणातील एक महत्त्वपूर्ण नेता बनले होते. ५०-६० च्या दशकात संघ राजकारणात त्यांच्यासारखा दुसरा नेता नव्हता. १९६७ ला मुंबई लोकसभा निवडणुकीत त्यांनी एस के पाटील यांना हरवले आणि त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली. कॉंग्रेस विरोधी राजकारणाचे ते प्रणेतेच बनले.. लैला यांच्याशी ओळख झाली तेव्हा ते खासदार तर होतेच पण त्याच बरोबर समाजवादी पक्षाचे संयुक्त सचिव सुद्धा होते.

लैला कबीर आणि जॉर्ज फर्नांडिस १३ वर्षे एकत्र राहिले. १३ वर्ष काही फार आनंदात गेले असे नाही. २५ जुन, १९७५ ला जेव्हा इंदिराजींनी आणीबाणी घोषित केली तेव्हा जॉर्ज उडीसामध्ये लैलाजी आणि आपल्या अडीच वर्षाच्या मुलाबरोबर सुट्टीसाठी गेले होते. आणीबाणीची सुचना आल्यावर ते लगेच तिथून निघाले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करुन आपली सुटका करुन घेतली.

या २२ महिन्यात त्यांची लैलाशी भेट झाली नाही. बोलताही आलं नाही. लैला यांना जॉर्जच्या ठावठिकाण्याबद्दल काहीच माहीत नव्हतं.

लैला आपल्या छोट्याशा मुलाला सोबत घेऊन अमेरिकेत भावाकडे गेल्या. आणीबाणी संपुष्टात आल्यावर जॉर्ज त्यांना घेऊन परत आले. सत्तेत आल्यामुळे जॉर्जमध्ये आता बदल होत होता. राजकारणातील वाढता वरदहस्तामुळे त्यांचा वैवाहिक जीवनातील रस कमी होत गेला. त्यातूनच पुढे संसारात विघ्न निर्माण झाले.

जनता पक्षाचे सरकार असताना जॉर्ज फर्नांडिस ज्या खात्यात मंत्री होते त्याच खात्याचे सचिव अशोक जेटली होते. अशोक यांच्या पत्नी जया आणि जॉर्ज यांची जवळीक वाढत गेली. जया आणि अशोक एकत्र कॉलेजमध्ये शिकले होते. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. जयाचे वडील जपानमध्ये भारताचे पहिले राजदूत होते.

या जवळीक वाढण्याच्या खबरींनी लैला जास्त विचलीत होत होत्या.

१९७९ मध्ये केंद्रातील वातावरण वेगाने बदलत होतं. जॉर्ज फर्नांडिस यांनी राजीनामा देऊन मोरारजी देसाई सरकारचा शेवट केल्याच्या चर्चा रंगत होत्या. चरण सिंघ यांना पाठिंबा देण्यासाठी जॉर्ज यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले होते. जॉर्ज यांना चरण सिंघ सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार ही गोष्ट पक्की होती.

त्याच वेळी लैला यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशा बातम्या येत होत्या.

चरण सिंघ त्यांना भेटायला दवाखान्यात गेले. दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची यादी जाहीर झाली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मंत्रीपद नक्की असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांना मंत्रीपद मिळाले नव्हते. इकडे लैलाजींनी चरण सिंघ यांना जॉर्जने त्यांच्याबरोबर केलेल्या गैरवर्तनाबद्दल सांगितल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

त्यानंतर १९८४ मध्ये लैला जॉर्ज यांना सोडून गेल्या. त्यांची जागा जया यांनी घेतली. दोघांचा अधिकृतरीत्या कधी घटस्फोट झाला नाही. पण लैला जॉर्जपासून वेगळ्या राहत होत्या.

२५ वर्षानंतर अचानकच लैला पुन्हा जॉर्जच्या आयुष्यात आल्या. जॉर्ज आजारी होती. त्यांची देखभाल आणि काळजी योग्य रीतीने घेण्यासाठी परत आल्याचे कारण त्यांनी दिले. २००९ च्या आसपास जॉर्जची तब्येत बिघडत चालली होती. पार्किन्सनमुळे त्यांची स्मरणशक्ती सुद्धा कमी होत चालली होती.

२०१० मध्ये लैलाजी आपला मुलगा सुशांतो फर्नांडिस याला घेऊन जॉर्जच्या घरी आल्या. त्यावेळी त्यांनी जया यांना बाहेर तर काढलेच आणि पुन्हा जॉर्जला भेटायला येऊ नका असेही ठणकावून सांगितले.

८८ वर्ष वय असताना जॉर्ज यांनी २९ जानेवारी, २०१९ रोजी शेवटचा श्वास घेतला. शेवटच्या ८ वर्षात तर अर्धांगवायू झाल्याने ते अंथरुणातच होते. त्यांची स्मरणशक्ती जवळ जवळ नष्ट झाली होती.

“जॉर्जच्या आयुष्यात परत येण्याचे एकच कारण होते आणि ते म्हणजे त्याला माझी गरज होती”, असे लैलाजी यांनी त्यावेळी सांगितले होते. वेगळे राहत असतानासुद्धा जॉर्ज प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लैलाच्या घरी जात असत. घटस्फोटाच्या कागदांवर सही करण्यासाठी कागद पाठवले असता जॉर्जने सही न करता त्या कागदाबरोबरच आपल्या आईच्या सोन्याच्या बांगड्या पाठवल्या होत्या असं लैलाजीनी एका मुलाखतीत सांगितले होते.

आज जॉर्ज फर्नांडिस आणि लैला कबीर यांचा मुलगा अमेरिकेत मोठा बँकर आहे.

प्रेमाची सुरुवात नेहमी उत्साही असते. परंतू ते शेवटपर्यंत तसं टिकवणं सगळ्यांनाच जमत नाही. अशा वेळी, “वो अफ्साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा..!” ही साहिर लुधियानवी यांची ओळ आठवते. जॉर्ज आणि लैला यांची कहाणी सुद्धा अशाच एका पूर्ण होऊ न शकणाऱ्या प्रवासाची कथा होती हेच खरं..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!