गीताप्रेसचं पुस्तक देव्हाऱ्यात नाही असं घर भारतात शोधूनही सापडणार नाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


गीता प्रेस!

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये असणारं हे प्रकाशन देशातलं सर्वात मोठं धार्मिक पुस्तकांचं प्रकाशन म्हणून ओळखलं जातं. या प्रकाशनाला गीता मुद्रणालय या नावानेसुद्धा ओळखलं जातं. हिंदू संस्कृतीतील वेद, पुराण, भगवद्गीता, रामचरीतमानस, विविध स्तोत्र त्याच बरोबर संस्कारपुस्तकं, मोठमोठी अध्यात्मिक पुस्तकं अशा अनेक पुस्तकांचं प्रकाशन दरवर्षी गीता प्रेसद्वारे केलं जातं. सर्वाधिक ऐतिहासिक पौराणिक आणि त्याचबरोबर हिंदू धार्मिक पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून “गीता प्रेस” ही जगभर ओळखली जाते.

गेल्या ९० वर्षांपासून गीता प्रेसचं पुस्तक-ग्रंथ छपाईचं
काम सुरू आहे आणि आजही जितकी सात्त्विकता सुरुवातीच्या काळात जपली जायची तितकीच सात्विकता अजूनही या प्रेसद्वारे जपली जाते. ही प्रेस प्रसिद्ध असण्यामागं आणि देशातलं सर्वात मोठं धार्मिक पुस्तकांचं प्रकाशन गृह म्हणून ओळख असण्यामागे कारणही तसंच आहे.

गीता प्रेसची काही ठळक वैशिष्ट्ये-

गीता प्रेस कोणत्याही इतर संस्थांकडून किंवा सरकारकडून अनुदान घेत नसून एक संपूर्णतः स्वयंचलीत संस्था आहे.

गीता प्रेस नफ्यासाठी काम करत नाही आणि म्हणूनच गीता प्रेसमध्ये कुठल्याच “ब्रँड”च्या प्रिंटिंगची कामं केली जात नाही. इतर रोज जवळपास ५० हजार पुस्तकं छापले जातात.

आजपर्यंत गीता प्रेसने ५८ कोटी २५ लाख पुस्तके प्रकाशित केली आहेत.

इथे हिंदी, मराठी, संस्कृत, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड़, मल्याळम, गुजराती, बंगला, उडि़या, असमिया, गुरुमुखी, नेपाली आणि उर्दू इत्यादी भाषांमधल्या धार्मिक पुस्तकांचं प्रकाशन केल्या जातं. महत्वाची गोष्ट म्हणजे इतर प्रकाशनांच्या मानाने गीता प्रेसची पुस्तकं मुद्रणाच्या किंमतीपेक्षाही कमी किमतीत विकली जातात.

गीता प्रेसची स्थापना इ.स. १९२३ साली गीतातज्ज्ञ म्हणुन प्रख्यात असणाऱ्या जयदयाल गोयंका यांनी केली. त्यांच्यासोबत हनुमान प्रसाद पोद्दार आणि घनश्यामदास जलान यांनीही गीताप्रेसच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली होती. जयदयाल गोयंका हे गीता प्रेस बरोबरच गीताभवन आणि ऋषीकुल ब्रह्मचर्याश्रम यांचेही संस्थापक होते.

गीतेचा लाभ सगळ्यांना मिळावा अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी गीताप्रचाराचा संकल्प केला.

सर्वप्रथम त्यांनी कलकत्त्यातील एका मोठ्या प्रेसमार्फत पाच हजार पुस्तकं छापली. नंतर त्यांची मागणी इतकी वाढली की ती पाच हजार पुस्तकेही कमी पडली त्यामुळे जयदयाल यांनी आणखी सहा हजार पुस्तकांची छपाई याच प्रेसद्वारे करून घेतली. अशा प्रकारे पहिल्या अकरा हजार पुस्तकांची छपाई कलकत्त्यात करण्यात आली.

या छपाईतून काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या त्यांपैकी एक म्हणजे त्या पुस्तकांत होणाऱ्या शाब्दिक चुका. त्यांनी तसं प्रेसच्या मालकाला सांगितलं पण त्याचं म्हणणं असं पडलं की प्रत्येक वेळी ते पुस्तक काढून त्यात चूक आहे का नाही हे शोधत बसणं खूप अवघड काम आहे. त्यामुळे जयदयालांनी स्वतःची प्रेस उघडण्याचं ठरवलं आणि १९२३ साली जयदयाल गोयंका यांनी १० रुपये महिना असणाऱ्या भाड्याच्या जागेत भगवद्गीता छापण्यास सुरुवात केली.

आज गीता प्रेसला ९० वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला आहे, अजूनही इथे छापल्या जाणाऱ्या पुस्तकांची गुणवत्ता टिकुन आहे. मधल्या काळात गीता प्रेस बंद पडते की काय अशी परिस्थिती ओढवली होती. कामगारांनी केलेल्या संपामुळे हे प्रकरण तेव्हा चांगलंच गाजलं सुद्धा होतं. पण हे प्रकाशन पुन्हा चालू झालं, इतकंच नाही तर त्यानंतर गीता प्रेसने वीस कोटी रुपयांच्या मशिनरीसुद्धा विकत घेतल्या. एवढी वर्ष झाली तरीही या प्रेसवर कुठलं संकट, अडचण आली नाही.

सध्या या प्रेसमध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसोबतच करारस्वरूपी कर्मचारी देखील काम करतात.

आधुनिकतेच्या बाबतीतही गीता प्रेस अग्रेसर आहे. इथलं छपाईचं जास्तीत जास्त काम संगणकीकृत असून पुस्तकांच्या छपाईचं कामसुद्धा पुर्णपणे स्वयंचलीत आहे. एवढंच नाही तर, गीता प्रेसमध्ये पुस्तकांची बाईंडिंग करताना कुठल्याही केमिकल्सचा वापर केला जात नाही तर आजही तिथे बाईंडिंगचं काम हातानेच केलं जातं.

गीता प्रेसच्या बऱ्याच पुस्तकांनी देशविदेशात कोट्यवधीचा व्यवसाय केला त्यातील काही पुस्तकं म्हणजे रामचारीतमानस, महाभारत आणि भगवद्गीता.

गीता प्रेस प्रकाशनाच्या २१ शाखांद्वारे या पुस्तकांचा प्रसार आणि प्रचार केला जातो. त्याचबरोबर देशातल्या ४२ प्रमुख रेल्वे स्थानकांवरील पुस्तकांच्या दुकानाद्वारे आणि कित्येक पुस्तक विक्रेत्यांमार्फत विक्री केली जाते.

एवढेच नाही तर गीता प्रेस विविध नियतकालिकेही प्रकाशित करते त्यापैकीच एक म्हणजे “कल्याण मासिक”. या मासिकाचा पहिला अंक ऑगस्ट १९२६ साली मुंबईत प्रकाशित करण्यात आला. हे मासिक देशविदेशात अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत हे उपलब्ध आहे.

गीता प्रेसमुळे आज कितीतरी लोकांच्या हाताला काम मिळत असून या प्रकाशनामुळे गोरखपूरसारख्या छोट्या शहरालासुद्धा एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!